( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

मी एमई इंजिनिअरिंग उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.मला लहानपणापासून शिक्षक पेशाची आवड होती.मराठी शाळेतील शिक्षकापासून ते विश्वविद्यालयातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक होण्यापर्यंत कोणताही शिक्षकी पेशा मला चालला असता.शिकत गेलो. चांगले गुण मिळत गेले. बाबा शिकवत गेले. शेवटी मी एंजिनीअर झालो.मी एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये अर्ज केला.मला लगेच त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी मिळाली.असेच एक वर्ष गेले.लग्न कर म्हणून आई मागे लागली होती.मी विषय टाळत होतो.मला लग्न करायचे नव्हते असेही नाही आणि होते असेही नाही.जीवनात अमुकच एक करायचे असे कधीच ठरविले नव्हते.जे काही व्हायचे असते, ते आपोआप घडत असते, यावर माझा कसा कोण जाणे, ठाम विश्वास होता.प्रयत्न करून मनासारखे घडून येईलच असे नाही.आणि प्रयत्न न करता आपोआपच मनासारखे घडून येणारच नाही असेही नाही.मी दैववादीही नाही आणि प्रयत्नवादीही नाही.दैवात असेल तर प्रयत्न होतील, दैवात असेल तर प्रयत्न यशस्वी होतील किंवा होणार नाहीत,असे माझे सर्वसाधारण तत्त्वज्ञान होते.

आमच्या शिक्षण संस्थेने समुद्रकिनाऱ्यावरील एका प्रसिध्द शहरात इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्याचे ठरविले.त्या शिक्षणसंस्थेच्या आजन्म सभासदांपैकी एका सीनियर सभासदाची कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून नेमणूक झाली.मला त्या कॉलेजात जाणार का म्हणून विचारण्यात आले.नाहीतरी मी जन्मापासून पुण्यात राहून कंटाळलो होतो.मलाही बदल हवा होता.मी लगेच माझी अनुमती देऊन टाकली.संमती देण्याचे आणखी एक जबरदस्त कारण होते.लहानपणी मी केव्हांतरी बाबांबरोबर कोकणात गेलो होतो. बाबांचे मित्र त्यावेळी समुद्रकिनारी असलेल्या एका गावात राहत होते.त्या लहान वयात समुद्र बघून मी भारावलो होतो.किनाऱ्यावरची पांढरीशुभ्र मऊ वाळू,समुद्राच्या येणार्‍या लाटा,मऊ वाळूवर धावाधावी खेळताना येणारी मजा,समुद्राच्या पाण्यात उभे राहिल्यावर पायाखालची सरकणारी वाळू आणि त्यामुळे पडणारा खड्डा,वाळूचा बांधता येणारा किल्ला,वाळूमध्ये बोगदा करून त्यातून हात घालून एकमेकांचा हात पकडल्यावर होणारा आनंद, वाळूवरून तुरुतुरु धावणारे खेकडे,मऊशार पांढर्‍याशुभ्र वाळूमध्ये पायात कांही घातल्याशिवाय चालताना पायाला होणार्‍या गुदगुल्या,समुद्रामध्ये दोन बाजूला डोंगरांचे गेलेले सुळके,क्षितिजावर पाणी कुठे संपले आणि आकाश कुठे सुरू झाले ते न ओळखता येणे,सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर आकाशातील ढगांवर सूर्याचे पडणारे किरण आणि त्यावर होणारा रंगांचा खेळ,सकाळी किंवा संध्याकाळी क्वचित दिसणारे इंद्रधनुष्य,समुद्रातून दूरवरून जाणार्‍या बोटींचा आकाशात जाणारा धूर आणि त्यामुळे काळवंडलेले आकाश,सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात आकाशात चमचमणार्‍या चांदण्या,मासे पकडण्यासाठी समुद्रात गेलेल्या लहान मोठय़ा होडय़ा,त्यांनी समुद्रात फेकलेली जाळी,रापण(एक प्रकारचे खूप मोठे जाळे)समुद्रातून बाहेर काढल्यावर त्यात सापडलेले सूर्य किरणांमध्ये चमचमणारे व तडफडणारे मासे, किनाऱ्यावर फिरायला आलेली विविध प्रकारची लहानमोठी माणसे,किनार्‍यावर खेळणारी असंख्य लहान मुले,समुद्राचे निळेशार पाणी,समुद्राची भव्यता,भरतीच्या वेळी गरजणारा समुद्र,कधी जोरात तर कधी मंदपणे, संध्याकाळी समुद्रावरून व सकाळी जमिनीवरून वाहणारा वारा,चांदण्या रात्री व काळोख्या रात्री समुद्राचे दिसणारे विलोभनीय रूप,समुद्रात स्नान करताना कधीच बाहेर येऊ नये असे वाटत असताना आणखी एक लाट आणखी एक लाट असे करीत कितीतरी तास समुद्रात डुंबणे,रात्रीची समुद्र किनार्‍यावर लाट येऊन फुटल्यावर त्यातून असंख्य चमचमणारे पाण्याचे लहान मोठे बिंदू,समुद्र किनार्‍यावरील सुरूची झाडे,त्यापाठीमागे नारळी पोफळींच्या एकामागून एक रांगा, समुद्रावरील डोंगरावर फिरायला गेल्यानंतर तिथून दिसणारा समुद्राचा नजारा,खडकांमध्ये पडलेल्या घळीमध्ये समुद्राचे पाणी घुसताना येणारा आवाज आणि उडणारी कारंजी,जवळ गेल्यास अंगावर उडणारे असंख्य तुषार,समुद्रावरून आल्यावर ओठांवरून जीभ फिरवत असताना हवाहवासा वाटणारा खारटपणा, पायाला चिकटणारी वाळू,तेथील आतापर्यंत कधीही न ऐकलेली हेल काढून बोलली जाणारी विशिष्ट बोली,ओहोटीच्या वेळी समुद्रात उभे राहिले तर आत खेचले जाणे,भरतीच्यावेळी समुद्रात किनाऱ्यावरून कोणतीही तरंगणारी वस्तू फेकली तरी ती येऊन वाळूवर पडणे,या सर्वांनी मी भारावून गेलो होतो.माझ्या  मन:पटलावर या सर्व गोष्टी कोरल्या गेल्या होत्या.नंतर समुद्रकिनारी पुन्हा जावे असे अनेकदा वाटले असतानाही तसा योग आला नव्हता.संस्थेने विचारल्या बरोबर व महाविद्यालय समुद्रकिनारी आहे असे कळल्याबरोबर मी लगेच होकार दिला.                      

अशाप्रकारे मी या समुद्रकाठच्या शहरात प्राध्यापक म्हणून रुजू झालो.प्राध्यापकांसाठी क्वार्टर्स बांधल्या होत्या.विवाहितांसाठी स्वतंत्र छोटे ब्लॉक होते.अविवाहितांसाठी हॉस्टेल सारखी व्यवस्था होती.प्राध्यापकांसाठी व्यवस्था असल्यामुळे आणि संस्था नामवंत असल्यामुळे, प्रत्येक खोली स्वतंत्र होती.एक शयनगृह वजा दिवाणखाना व कमोडसह न्हाणीघर खोलीत होते.अविवाहितांसाठी   अशी हॉस्टेलची रचना होती.फॅन होता एसी नव्हता.गिझर होता. वाटल्यास ज्याचा त्याने एसी बसवून घ्यावा.

दोन तीन दिवस कॉलेज परिसराशी ओळख करून घेण्यात,  आम्हाला दिलेल्या हॉस्टेलमधील रुममध्ये सामान लावण्यात व स्थिरस्थावर  होण्यात गेले.संधी मिळताच मी समुद्रकिनार्‍यावर जाण्यासाठी निघालो.आमचे कॉलेज गावापासून दूर उंचावर होते.मूळ गांव समुद्रकिनार्‍यालगत वसलेले होते.नवीन शहर मूळ गांवापासून दूर उंचावर सडय़ावर(डोंगर माथ्यावरील सपाटी) वसलेले होते.किनाऱ्यावर जाण्यासाठी एक छोटीशी घाटी उतरून जावे लागत होते.रस्ता वळणावळणाचा होता.सुमारे तीन चार किलोमीटर अंतर असावे.पुण्याहून मी माझी स्कूटर घेऊन आलोच होतो.तिचा उपयोग मला मूळ गांवात जाण्यासाठी, समुद्रावर जाण्यासाठी, जवळपास कोकणात फिरण्यासाठी  होणार होता.

संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.सूर्यास्ताला अजून  दीडतास अवधी होता.मला समुद्रकिनारी बसून बराच वेळ घालवण्यात येणार होता.स्मृती पटलांमध्ये असलेल्या गोष्टींचा पुनर्अनुभव मला घ्यायचा होता.बऱ्याचवेळा आपल्या मनामध्ये कांही गोष्टींचा ठसा विशिष्ट प्रकारे असतो.पुन्हा त्या गोष्टींचा अनुभव घेताना विरस होण्याचा संभव असतो.यावेळी तसे कांहीही झाले नाही.किनाऱ्यावर बसून सर्व सौंदर्य उपभोगताना आणखी आनंद मिळाला.त्यावेळी दृष्टीतून सुटलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.अर्थात लहानपणी ज्या गोष्टींचा आनंद मी घेऊ शकत होतो त्याचा आनंद आता या वयात घेणे शक्य नव्हते.वयाबरोबर तुमची दृष्टी व आनंद स्थाने बदलत जातात.कांही वेळा करावे असे तुम्हाला वाटूनही वयामुळे तसे करता येत नाही.उदाहरणार्थ वाळूचा किल्ला करणे,वाळूमध्ये बोगदा खणून एकमेकांचे हात पकडणे,कवड्या शंख वगैरे गोळा करणे. या गोष्टीतील लहानपणची मजा आता येवू शकत नव्हती.लहान असतानचा अानंद,त्या वेळी केलेली मजा,त्यावेळची निरागसता, मन निबर झाल्यावर घेता येत नाही.तर पूर्वी नजरेतून सुटलेल्या कित्येक गोष्टी आता नजरेत येतात.सृष्टीसौंदर्याचा आस्वाद आता जास्तच उत्कटतेने घेता येत होता.

सागराची ओढ, सागरावरील प्रेम वाढतच गेले.जेव्हां जेव्हां वेळ मिळेल तेव्हां तेव्हां मी संध्याकाळी व सकाळी समुद्रावर जाऊन बसत असे.समुद्राचे सौंदर्य निरनिराळ्या वेळी व निरनिराळ्या ऋतूमध्ये निरनिराळे असते.पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र,या वेळी व त्याचप्रमाणे पावसाळा,उन्हाळा, हिवाळा,अशा बदलत्या ऋतूमध्ये सागराचे सौंदर्य अनुभवणे व त्यामध्ये तल्लीन होणे  यातील आनंद खरा रसिकच जाणतो.    

समुद्रावर गेल्यावर मला समुद्राबरोबरच समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या,तेथे येऊन बसणार्‍या  माणसांबद्दलही कुतूहल असते. कांही मंडळी आपला व्यवसाय करण्याच्या हेतूने तेथे आलेली असतात.त्यांना समुद्राशी कांही देणे घेणे नसते.कांही जणांसाठी अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था असते.कांही मंडळी केवळ सागराचा आस्वाद घेण्यासाठीच येतात.सागराचा आस्वाद घेण्याबरोबरच कित्येक मंडळी तेथे मिळणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचाही आस्वाद घेत असतात.कांही तर हातगाड्यावरील वस्तूंचा आस्वाद घेण्यासाठीच येतात.त्यांना समुद्राशी काही देणे घेणे नसते.जिथे हातगाड्या असतील तिथे ते असतील अशी स्थिती असते.कांही मंडळींचा केवळ भरभर चालून व्यायाम करण्याकडे कल असतो.कांही मंडळी समुद्रावर फिरायला येणाऱ्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात!हौशे गवशे नवशे अशा अनेक मंडळींचा राबता किनार्‍यावर असतो. कांहीजण चोरीच्या उद्देशाने, भीक मागण्याच्या उद्देशानेही आलेले असतात.एकूण शहरांतील समुद्र किनारा ही सर्वांगाने अनुभवण्याची गोष्ट असते. 

मला शहाळ्याचे पाणी खूप आवडते.खेकडा भजी सोडली तर मला आणखी कांही वस्तू विशेष आवडत नाहीत.खाणे पिणे हा माझा उद्देशच नसतो.माणसे वाचण्यात जरी गंमत असली,तरी मला निर्मनुष्य किनार्‍यावर, केवळ सागराचा आस्वाद घेण्यात, सौंदर्य अनुभवण्यात, जास्त आनंद मिळतो.

मी समुद्रावर जायला लागल्यापासून एका मुलीने माझे लक्ष वेधून घेतले होते.

कधी तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी असत तर कधी नसत.

असलीच तर एखादीच मैत्रीण बऱ्याच वेळा असे.

ती एकटी असे त्यावेळी आपल्यातच गुंग होऊन बसलेली असे.  

*ती ठराविक ठिकाणी वाळूत येऊन बसलेली दिसत असे.* 

*तिच्यात कांही खास असे पाहण्यासारखे नाही, चारचौघींसारखीच ती आहे असे एखाद्याचे मत पडले असते.*

* परंतु माझे मत वेगळे होते.*

*मला तिच्यात कांहीतरी खास वाटत होते.तिने माझे लक्ष वेधून घेतले होते.*

*ती जरी माझ्या मनात  भरली असली,तरी तिचे माझ्याकडे लक्ष आहे असे दिसत नव्हते.*

(क्रमशः)

१९/६/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel