( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

रविवार होता.नुकताच मी एक अभिजात(क्लासिकल) मराठी सिनेमा बघितला होता.त्या सिनेमाच्या वातावरणामध्ये, मूडमध्ये, मी होतो.एवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजू लागली.ट्रू कॉलर सत्यभामा विचारे असे नाव दाखवीत होता.माझ्या स्मरणाप्रमाणे या नावाच्या कोणत्याही बाई माझ्या ओळखीच्या नव्हत्या.अननोन अनोळखी नंबर होता.मी कामाच्या धांदलीत असलो तरी अनोळखी नंबर बऱ्याच वेळा उचलतो . शक्यता आहे की चुकून नंबर लावला गेला असेल.त्याचबरोबर अशीही एक शक्यता असते की कुणाचे तरी माझ्याजवळ कांहीतरी  महत्त्वाचे काम असणार आणि म्हणून त्याने किंवा तिने फोन केला असणार.फोन न घेतल्यामुळे कदाचित माझे नुकसान होईल कदाचित फोन करणार्‍याचे नुकसान होईल.कदाचित दोघांचेही नुकसान होईल.एखाद्या लहान कृत्यासाठी कुणाचे तरी नुकसान कशाला असा माझा दृष्टिकोन असतो.

समजा चुकून नंबर लावला गेला असेल तर राँग नंबर म्हणून विषय संपवता येतो.कांही लोक जर नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसेल तर फोन उचलत नाहीत.असा दृष्टिकोन मला रुचत नाही.

तर सत्यभामा विचारे हे नाव ट्रू कॉलर दाखवीत होता.या बाई माझ्या ओळखीच्या नसूनही मी माझ्या स्वभावाप्रमाणे फोन उचलला.पलीकडून मंजुळ, गोड, मधुर,स्वरात कुणीतरी विचारीत होते.कोण बोलत आहे?तो आवाज इतका मंजुळ, मधुर, गोड, ऐकावा ऐकावा असा वाटणारा होता कि मी त्या आवाजाच्या मोहिनीत आकंठ बुडालो.मी फोन तसाच ठेवून देऊ शकलो असतो.किंवा राँग नंबर असे म्हणून बंद करू शकलो असतो.  माझे नावही सांगू शकलो असतो. परंतु असे कांहीही न करता मी त्या आवाजाला विचारले,

"फोन तुम्ही केला आहे.नांव सांगण्याची जबाबदारी तुमची आहे.कोण बोलत आहे ते मला कळेल का?"

~  सॉरी सॉरी क्षमा करा मी माझे नाव सांगायला पाहिजे होते.मधुरा देशपांडे बोलत आहे. ~

"ठीक आहे परंतु ट्रू कॉलर   तर सत्यभामा विचारे असे दाखवीत आहे त्याचे काय?"

~फोन माझा असला तरी नाव माझ्या मावशीचे आहे.मी तिच्याकडे राहते.सिमकार्ड तिच्या नावाने आहे ~

तिचा मंजुळ स्वर  ऐकून मी घायाळ झालो होतो.तिला जितका वेळ बोलत ठेवता येईल तितके मला ठेवायचे होते.

"ते ठीक आहे परंतु तुम्ही फोन कां केला होतात."

~मला मालिनी काटदरे यांच्याशी बोलायचे होते.~

येथे कुणीही त्या नावाची व्यक्ती राहत नव्हती.राँग नंबर मी म्हणू शकलो असतो.परंतु तसे न म्हणता मी म्हणालो.

"त्यांच्याशी तुमचे काय काम आहे?"

~तुम्ही त्यांचे गार्डियन आहात का?तुमच्या परवानगीशिवाय त्या बोलू शकत नाही का?आमच्या बाई तर त्या एकट्या राहतात असे म्हणाल्या होत्या.तुम्ही त्यांचे कोण?~

ती जरा फणकाऱ्यात म्हणाली.

आता खरेच पंचाईत आली होती.मी इथे  काटदरे राहात नाहीत राँग नंबर असे म्हणालो असतो तर माझे इम्प्रेशन वाईट झाले असते.मी उगीचच चांभारचौकशा करणारा माणूस आहे अशी माझी प्रतिमा झाली असती.त्या आवाजाची मालकीण कशी आहे हे मला माहीत नसले तरी माझे इम्प्रेशन वाईट व्हावे असे मला वाटत नव्हते. अगोदरच तिला माझा राग आला होता.या आवाजाशी,या आवाजाच्या मालकिणीशी आपले दीर्घकालीन नाते जुळावे असे मला वाटत होते.मी सर्वकांही खरे बोलून टाकायचे ठरविले.

"मला माफ करा.तुम्ही मला माफ केल्याशिवाय मला बरे वाटणार नाही."

पुढे मला काही बोलू न देता ती म्हणाली,

~तुम्ही माझी माफी कां मागत आहात?तुम्ही तर माझा कांहीच गुन्हा केला नाही.~

"नाही कसा मी मोठा गुन्हा केला आहे.येथे मालिनी काटदरे या नावाची व्यक्ती राहात नाही.मी प्रथमच तुम्हाला तसे सांगायला हवे होते.परंतु तुमच्या गोड मंजुळ आवाजाच्या मोहात मी इतका पडलो की तो पुन्हा पुन्हा ऐकत राहावा असे मला वाटत होते.तुम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवावे आणि तो आवाज ऐकत राहावा यासाठी मी तसे बोलत राहिलो."

~इश्यss तुमचे आपले कांहीतरीच.इतका कांही माझा आवाज मंजुळ नाही.~

"ते तुम्ही कसे काय ठरवता?ऐकणाऱ्याला ते ठरवू दे.हे म्हणजे लता मंगेशकरने माझा आवाज मंजुळ नाही असे म्हणण्यासारखे आहे."

~इश्यsss त्या थोर गायिका लता बाई कुठे आणि मी कुठे?मी त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही.~

"असे कसे लता त्या लताच हे खरे.अशी गायिका पुन्हा होणे नाही.केवळ दैवी आवाज.आमचे दैव थोर म्हणून त्या या भूतलावर आल्या.परंतु तुम्हीही कांही कमी नाही.निदान तुमचा तिसरा नंबर तरी लावायला हरकत नाही."

~दुसरा नंबर कोणाचा?~

"अर्थात आशाबाईंचा"

~हे मात्र खरे लता त्या लता व आशा त्या अाशा~

"म्हणून तर मी तुमचा तिसरा नंबर लावला."

~गाणे ऐकल्याशिवाय ?~

"हो मला गाण्याचा चांगला कान आहे असे माझे मित्र म्हणतात.तुमचे गाणे ऐकले नाही तरी तुमचा आवाज ऐकून मी छातीठोकपणे सांगतो.तुम्ही गात असणार."

~मित्र म्हणतात?तुमची पत्नी काय म्हणते?

"अजून माझे लग्न झाले नाही.लग्न ठरलेही नाही.परंतु लग्न झाल्यावर माझी पत्नी माझ्या मित्रांच्या म्हणण्याला,मला गाण्याचा चांगला कान आहे याला,दुजोरा देईल एवढे मात्र नक्की."

बोलता बोलता मी तिला माझे लग्न झाले नाही हे सांगून टाकले होते.तीही बोलताना तिच्याबद्दल कांहीतरी बोलेल अशी मला आशा होती.  

~माझा आवाज मधुर आहे असे माझ्या मित्रमैत्रिणी नातेवाईक सर्वच जण म्हणतात.~

"ते सर्व ठीक,कुणीही तसेच म्हणणार, परंतु तुम्ही गाता कि नाही ते सांगितलेच नाही."

~मी गाते.मी गाणे शिकत आहे.शिक्षणाला कधी अंत नसतो.त्या संदर्भातच मला मालिनी काटदरे यांच्याशी बोलायचे होते.~  

"मी जरा तुमच्या खाजगी गोष्टीत बोलत आहे याबद्दल माफ करा.मला राहवत नाही म्हणून विचारतो.मालिनीबाईंशी तुमचे काय काम होते?"

~कांही हरकत नाही.ती गोष्ट तशी कांही खासगी नाही.मालिनीबाईंची रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये ओळख आहे.त्या माझे गाणे ऐकून रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये शिफारस करतील असे आमच्या मधुर संगीत विद्यालयाच्या बाई म्हणाल्या.~

"ओके,तुम्हाला मालिनीबाई भेटोत.तुमचे काम होवो.अशी मी मनःपूर्वक इच्छा प्रगट करतो.मी तुम्हाला कांही मदत करू शकत असेन तर तसे मला सांगा.तुमच्या अंगात दैवी कला आहे."

~पण त्यालाही पैलू पाडावे लागतात.मधुर संगीत विद्यालयात त्यासाठीच मी जाते.~

"अगदी बरोबर परंतु पैलू पाडलेला अस्सल हिराही जव्हेरी बाजारात आल्याशिवाय त्याची प्रसिद्धी होत नाही किंमत ठरत नाही."

~त्यासाठीच तर मी मालिनीबाईना फोन करीत होते.आणि चुकून तुमचा नंबर लागला.कुठेतरी नंबर लावण्यात चूक झाली असावी.~

अज्ञात मधुरा देशपांडे नावाच्या मधुरभाषिणीने.राँग नंबर आहे असे कळल्याबरोबर फोन बंद करायला हवा होता.परंतु तसे न करता ती बोलतच होती.त्याअर्थी तिलाही माझ्याशी बोलायला आवडत होते.

"जे होते ते चांगल्यासाठी.राँग नंबर लागला नसता तर तुमच्याशी माझी ओळख कशी झाली असती?"

~आपली ओळख कुठे झाली आहे?~

"प्रत्यक्ष नाही परंतु फोनवर तर झाली आहे.उद्या प्रत्यक्ष होईल."

~उद्या ती कशी काय बुवा~

"अहो उद्या म्हणजे अगदी उद्या नाही परंतु लवकरच"

~लवकर तरी कशी काय?~ 

"मला खात्री आहे.प्रत्येक घटना पूर्वनियोजित असते.फक्त केव्हां केव्हां आपण त्याला योगायोग म्हणतो.तुमचा राँग नंबर लागला नसता तर तुमचा मधुर, मंजुळ,  ऐकावा ऐकावा असा वाटणारा आवाज मला ऐकायला कसा मिळाला असता?"

~तुमचे आपले कांहीतरीच.तुम्हाला दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चांगले चढविता येते.~

"मी कुणालाही हरभऱ्याच्या झाडावर चढवीत नाही.मला जे वाटते ते मी स्पष्ट बोलतो.कित्येकवेळा कटू असले तरीही स्पष्ट बोलतो असे माझे मित्र व नातेवाईक म्हणतात."

~तुमचाही आवाज ऐकत राहावा असे वाटणारा आहे.तुम्हाला गाण्याचा कान आहे हे मला कळले आहेच.तुम्हाला गाण्याचा गळा आहे का?सहज कुतूहल म्हणून विचारते.~

"नाही दुर्दैवाने मला गोड गळा नाही.मला फक्त चांगला कान आहे. लहानपणी माझा आवाज चांगला होता.वयाच्या सोळाव्या वर्षी आवाज फुटला की काय म्हणतात ते झाले."

~मी तुम्हाला एक सांगू तुम्ही  त्या वयात नेटाने रियाज करत राहिला असता तर तुमचाही आवाज चांगला राहीला असता.~

"हो पण त्याचा आता काय उपयोग?गेलेली वेळ आणि गमावलेली संधी  पुन्हा परत येत नाही.मला त्या वेळीही बरेचजण म्हणत होते रियाझ चालू ठेव.परंतु अभ्यास आणि आवाज फाटल्यामुळे आलेली उदासीनता यामुळे मी रियाज चालू ठेवला नाही."  

~ तुम्ही वाईट कशाला   वाटून घेता.इतके मायूस होऊ नका. रुचीने, चवीने, जेवणारा असल्याशिवाय रुचकर जेवणाची काय किंमत?~

"आहे तुमच्याही बोलण्याला अर्थ आहे.खर्‍या कलावंताला कलासक्ताशिवाय कोण ओळखणार ?"

~हे थोडे अहो रूपम् अहो ध्वनि: यासारखे होत नाही काय?~

* "मुळीच नाही मी नेहमी खरे बोलतो.खरे बोलण्याला डर कुणाची? तुमच्या मधुरा देशपांडे या नावाप्रमाणेच तुमचे बोलणे मधुर आहे.तुमचा आवाज मधुर आहे. तुमच्या आईवडिलांनी तुमचे नाव इतके बरोबर कसे काय ठेवले असेल?त्यांना तुमचे भविष्य कळले असणार "*

*आमचे बोलणे पुढे चालूच राहिले.बहुधा मला व मधुराला आपले बोलणे कधी संपूच नये असे वाटत होते .*

(क्रमशः)

१३/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel