( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

कृष्णकांतच्या, त्याच्या व्यवसायामुळे सिनेक्षेत्र, नाट्यक्षेत्र,मोठमोठय़ा ध्वनी मुद्रण करणाऱ्या कंपन्या,टीव्ही चॅनेल्स, इत्यादी क्षेत्रात ओळखी होत्या.

संधी मिळताच त्याने मधुराला वाव दिला असता.

कुणाच्याही पाठिंब्याशिवाय मी नाव कमवीन अशी राँगनंबरची जिद्द होती.माझी शिफारस तिने मान्य केली असती असे नाही.

तिला संधी देण्यासाठी मला कदाचित डावपेच आखावे लागणार होते.मी एवढा प्रयत्न  करीत होतो.परंतु मधुराला मी कसा वाटतो त्याचा मला पत्ताच नव्हता.        

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच वेळी मधुराला फोन केला.

मधुराने लगेच फोन उचलला.जशी कांही ती माझ्या फोनची वाटच पाहत होती.एकदम विषयाला हात घालण्याऐवजी मी थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याचे ठरविले.

"हॅलो तुम्ही माझ्या फोनची वाटच पाहत होता वाटते?"  

~तसे कांही नाही फोन जवळच होता तुमचा नंबर व नाव दिसले उचलला.~

"माझे नाव तुला दिसले?मी तर अजून तुम्हाला नाव सांगितले नाही."

~नाव दिसले म्हणजे तुमचा नंबर ज्या नावाने सेव्ह केला आहे ते नाव दिसले.~  

"माझा नंबर तुम्ही काय नावाने सेव्ह केला आहे?"

~तुम्ही मला पुन्हा पुन्हा तुम्ही कां म्हणता?मला तूच म्हणत जा.तुम्हीने मला कसेसेच होते.~

"असे कसे आपण परक्याना तुम्हीच म्हणत नाही काय" 

~आपण आता परके कुठे राहिलो आहोत.प्रत्यक्षात भेट झाली नसली तरी फोन मैत्री झाली आहे.मित्राला आपण कधी अहो जाहो करतो का?~

"हेच मी तुझ्या बाबतीत म्हणू शकेन.तू मला अहो जाहो करतेस की.यापुढे तूही एकवचनी उल्लेख करीत जा.तुझ्या आज्ञेप्रमाणे मी लगेच दुरुस्ती केली आहे  " 

~ठीक आहे आपण आता मित्र आहोत.तू अजून तुझे नाव सांगितले नाही.मग तुझ्या नावाने कसे सेव्ह करणार?~  

"ते बरोबर आहे तू मला माझे नाव कुठे विचारलेस?नाव माहीत होईपर्यंत तर कांहीतरी नावाने सेव्ह केले असशीलच"

~अजूनही तू तुझे नाव सांगितले नाही.माझे नाव, पत्ता, छंद, मात्र सर्व शोधून काढले.मला मात्र तुझ्याबद्दल कांहीच माहिती नाही~

"तुझ्याबद्दल मला इंट्रेस्ट निर्माण झाला.खरे सांगायचे म्हणजे तुझ्या आवाजाने मला मोहित केले. खरे सांगायचे म्हणते मी चारी मुंडय़ा चीत झालो.हा आवाज जन्मभर ऐकायला मिळावा असे वाटले.त्यामुळे मी थोडीशी गुप्तहेरगिरी केली.तू तसे कां केले नाहीस?"

~मी तुला लिफ्टमध्ये तेव्हांच ओळखले होते.तुझ्याच पध्दतीने मी राहात असलेल्या सोसायटीपासून तुझा पाठलाग करावा असे माझ्या मनात होते. मला चांगली संधी होती.तू माझा पाठलाग करीत माझ्या निवासापर्यंत आला होतास.~

"मग माशी कुठे शिंकली?"

~मी तुझा पाठलाग सुरू करणार एवढय़ात माझे बाबा समोरून आले.त्यांच्या देखत मला परत फिरता येणार नव्हते.त्यानंतर मला संधीच मिळाली नाही.आता तरी तुझे खरे नाव सांगणार का?~

"सांगतो ना माझे नाव मधुकर परांजपे आता सांग माझे नाव कसे सेव्ह केले आहे?"

~खरं सांगू ?~

"मी तुला खोटं सांग असे कसे म्हणेन? चल सांगून टाक"

~मी तुझे नाव राँग नंबर म्हणून सेव्ह केले आहे.~

"अरे व्वा काय योगायोग आहे मीही तुझे नाव तसेच सेव्ह केले आहे."

~पण माझे तर नाव तुला माहीत होते?~

"पण मला आपले तुझे नाव राँग नंबर म्हणून सेव्ह केलेले आवडते. हा नंबर  कोणाचा आहे ते कुणाला कळत नाही."

~मी तर तुझे नाव ओळखतच नव्हते तेव्हा ते तसे कसे सेव्ह करणार?मला राँग नंबर म्हणूनच सेव्ह करावे लागले. ~

"आता तर तुला माझे नाव माहीत आहे.आता कसे सेव्ह करणार?"

~मी राँग नंबर तसेच ठेवणार आहे.कारणही तू  दिले तेच आहे.कुणी पाहिले तरी कोण आहे ते कळत नाही.~

" मी तुझे नाव तसेच सेव्ह केलेले ठेवणार आहे.अर्थात  <राँग नंबर> ऐवजी <करेक्ट नंबर>ठेवायला हरकत नाही.तुझे काय मत आहे ते मला माहीत नाही"

~इश्यsss~

"तुझे -इश्य- इतके गोड आहे की ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते."

~इश्यsss~  

"बरे तुला मालिनीबाई काटदरे भेटल्या का?"

~नाही ना त्या फोन उचलत  नाहीत.~   

"तुझा नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसेल.कांही जण जर नंबर अनोळखी असला तर रिस्पॉन्स देत नाहीत.तुला त्या कशासाठी हव्या होत्या."

~आमच्या शिक्षिका बाई म्हणाल्या त्यांचा मुलगा ध्वनिमुद्रक आहे.त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे.त्याच्या या क्षेत्रात अनेक ओळखी असणार .मालिनीबाई स्वभावाने फार चांगल्या आहेत.त्यांना गाण्याचा कान आहे.जर तुझे गाणे त्याना पसंत पडले ते तुझी शिफारस त्यांच्याकडे करतील.त्यांची पूर्वनियोजित भेट घे.त्यांना तुझी समस्या सांग त्यांना गाणे ऐकव. तुझे काम होईल~   

"मग तुझ्या बाई मालिनीबाईंची व तुझी भेट कां घडवून आणीत नाहीत."

~आमच्या बाईंच्या मतानुसार मालिनीबाईना अशी कुणाची तरी शिफारस पसंत नाही.मी प्रत्यक्ष भेटले तर काम होईल म्हणून त्यांनी त्यांचा नंबर दिला.परंतु त्या फोन घेत नाहीत.मी दोन तीनदा प्रयत्न करून पाहिला.~  

"परंतु तुला तर कुणाचीही शिफारस नको होती.तुला तुझ्या स्वतःच्या गुणावर या क्षेत्रात प्रस्थापित व्हायचे होते."

~अहो शिफारस याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला नाही असे वाटते.या क्षेत्रात पुढे येण्यासाठी तडजोडी करतात.मी त्यातली नाही.असे मला म्हणायचे होते.मला माझ्या गुणांवरच प्रस्थापित व्हायचे आहे. मालतीबाईंच्यामार्फत कृष्णकांतकडे जाणे हा भाग वेगळा आणि तशी शिफारस हा भाग वेगळा  ~

"मी तुझी व मालिनीबाई काटदरे यांची भेट घडवून आणू शकतो.एवढेच काय पण त्यांचा मुलगा कृष्णकांत प्रसिध्द ध्वनिमुद्रक यांचीही भेट घडवून आणू शकतो."

~एवढ्या  छातीठोकपणे तुम्ही कसे काय सांगता?~

"तुझी भेट घडवून आणली मग तर झाले?कृष्णकांत हा माझा आतेभाऊ आहे.मालिनीबाई या माझ्या आत्या.आता कांही समस्या आहे का?"

~अय्याss खरं की काय?आता कांहीच समस्या नाही.~

"त्याला फोन करतो. त्याची अपॉइंटमेंट घेतो आणि नंतर तुला फोन करतो." 

~ठीक आहे .मला फोन करून केव्हां अपॉइंटमेंट आहे ते सांग.मात्र माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण येईल.तुमचे आभार कसे मानावेत ते कळत नाहीत.~

"बघ पुन्हा तू तुमचे म्हणालीस,आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात असे मी म्हटले तर तुला राग येणार नाही ना?"

~आपल्या माणसाला आपले म्हटले तर त्यात राग कशाला येईल? तरीही मी तुमचे आपले तुझे आभार मानते.~

बोलण्याच्या ओघात आपण काय बोलून गेलो ते तिच्या एकदम लक्षात आले. ती मला आपले माणूस म्हणाली होती.ती तीन चार क्षण  स्तब्ध राहिली.

~हॅलो तुम्ही फोनवर आहात ना?~

"आहेना मी तुझ्याच उत्तराची वाट पाहत आहे."

~तू अपॉइंटमेंट घे आपण भेटायला जाऊ.~        

"मी तुला फोन करीन.आणखी एक सांगू का?"

~बोल ना~

"तुझे अय्या,इश्य इतकेच गोड आहे. शुभ रात्री स्वीट ड्रीम्स  "  

~माझा राँग नंबर इतका करेक्ट लागेल असे मला वाटले नव्हते.आपल्यालाही शुभ रात्री मेनी मेनी थँक्स स्वीट ड्रीम्स.~

राँग नंबर बरीच धीट झाली होती.तशी प्रत्यक्ष भेट न होऊनही ती दाट मैत्री असल्यासारखी बोलत होती.  माझी शिफारस घेईल की नाही अशी मला उगीचच शंका वाटत होती.आता सर्व कांही सोपे झाले होते.मी कृष्णकांतला फोन लावला.तो जरी माझ्याहून पंधरा वर्षांनी मोठा असला तरी आमचे संबंध मित्रासारखे होते.मी त्याला कुशा म्हणून संबोधित असे.मी त्याला माझ्याबद्दल व मधुराबद्दल सविस्तर सर्व कांही सांगितले.त्यावर तो एवढेच म्हणाला,"दोन्ही बाजूंना सारखीच आग लागलेली दिसते."मी म्हणालो पाहूया थोडय़ाच दिवसांत उलगडा होईल.

मी मधुरा व तिची मैत्रीण अशी तिघे पूर्वनियोजित भेट ठरवून कृष्णकांतच्या स्टुडियोमध्ये गेलो.प्रथम भेट झाली.त्याने मधुराला  निरनिराळ्या प्रकारची चार गाणी गायला सांगितले.त्यातले एक गाणे त्याने निवडले.त्याच्या चार पाच वेळा रिहर्सल झाल्या.नंतर ते   ध्वनिमुद्रित झाले.तिचा आवाज एका चित्रपट निर्मात्याला आवडला.त्याच्या चित्रपटात दोन गाणी गाण्याची संधी तिला मिळाली.प्रेक्षकांनाही पार्श्वगायिका म्हणून तिचा आवाज पसंत पडला.

आमच्या या निमित्ताने वारंवार भेटी होत होत्या.तिच्याबरोबर मी स्टुडिओमध्ये जात होतो. सुरुवातीला तिची मैत्रीण बरोबर येत असे.नंतर आम्ही दोघेच जाऊ लागलो.प्रत्येक रेकाॅर्डिंगच्या वेळी,रिहर्सलच्या वेळी मी शक्यतो तिच्यासोबत जात असे.

आमच्या बाहेरही भेटी होऊ लागल्या.फोन कॉल तर रोजच होत होता.दोघांनाही एकमेकांशी बोलल्याशिवाय चैन पडत नसे.रोज रात्री एकमेकांना शुभरात्री स्वीट ड्रीम्स म्हटल्याशिवाय झोप येत नसे.अर्थात ड्रीम्स कुठची पडत असतील ते आपण ओळखले असेलच.

मिस राँग नंबर सर्वच अर्थाने करेक्ट नंबर ठरली.

माझ्या आईवडिलांनी व तिच्या आईवडिलांनी आम्हा दोघांचा करेक्ट नंबर म्हणून स्वीकार केला. 

आता ती प्रस्थापित गायिका म्हणून स्थिर झाली आहे.आपणही तिचे नाव ऐकले असेलच.   

*आता मधुरा माझी पत्नी आहे.*

*आम्ही दोघेही एकमेकाना -मधू- म्हणून हांक मारतो.कोण मधू ते अर्थातच परस्परांना कळते.*

*केव्हां केव्हां गमतीत कुणीही कुणालाही राँग नंबर म्हणून (अर्थातच दुसरे कुणीही नसताना)  हांक मारतो.*

*एखादे वेळी दोघेही एकदम <राँग नंबर> म्हणून(अर्थातच दुसरे कुणीही नसताना)  हांक मारतो.त्यावेळी एकच हशा पिकतो*

*अजूनही आमच्या दोघांच्याही फोनवर एकमेकांचे नंबर <राँगनंबर> म्हणूनच सेव्ह केलेले आहेत!!* 

(समाप्त)

१५/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel