(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

कथा जुन्या काळातील आहे .सुमारे शंभर वर्षे झाली असावीत .त्या काळी स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती.हल्लीं स्त्री स्वातंत्र्य  बऱ्याच प्रमाणात जरी वाढले आहे असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात किती प्रगती झाली आहे याबाबत मी साशंक आहे .मी विशिष्ट आर्थिक स्तर ,विशिष्ट जात,विशिष्ट धर्म,विशिष्ट  प्रदेश या बाबतीत बोलत नसून सर्वसाधारणपणे स्रियांच्या परिस्थितीबद्दल बोलत आहे . त्या काळात विवाह लहान वयात होत असत .आठ दहा वर्षांच्या मुलीचा विवाह ही सामान्य बाब होती.मुलांचे वय मात्र चौदा सोळापासून चौर्‍याऐशीपर्यंत काहीही असे .हल्लीही मुलीचे लग्न चौदा ते सोळा या वयात करण्याची बर्‍याच  समाजात प्रथा आहे.मुलगी फार लहान व मुलगा वयाने खूप मोठा अशा परिस्थितीत मुलीवर कोणकोणते प्रसंग ओढवू शकतील याची अापण सहज कल्पना करू शकतो.

दोन्ही घरची मंडळी समंजस असतील .एकत्र कुटुंब पद्धती असेल , तर मुलीचे हाल थोडे कमी होण्याचा संभव राहील.  

गोदावरीचा विवाह ती दहा वर्षांची असताना जगन्नाथशी झाला.मुलगी जरी सणवारासाठी मधूनमधून सासरी जात असली तरी तिचे एकूण वास्तव्य माहेरी असे .मुलगी शहाणी झाल्यावर तिला सासरी पाठवण्यात येत असे.

जगन्नाथ त्याच्या वयाच्या मानाने लवकर वयात आला होता.त्याचे वय केवळ चौदा होते.गोदी सासरी आलेली असताना किंवा जगू सासरी गेलेला असताना जेव्हां जेव्हां शक्य होई तेव्हां तेव्हां तो गोदेच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करीत असे .गोदेला त्याच्या अशा वागण्याचा अर्थ कळत नसे.ती आपली,नवरा म्हणून सर्व सहन करीत असे .एकत्र कुटुंब जुनी व्यवस्था त्यामुळे गोदा जगूपासून  वाचली होती. असे फार काळ चालणे शक्य नव्हते.

गोदावरी शहाणी झाली.तिला सासरी समारंभपूर्वक पाठविण्यात आले .सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर तिला व जगूला एकाच खोलीत झोपण्याची परवानगी मिळाली. मुलगी शहाणी झाली म्हणजे ती खऱ्या अर्थाने वयात आली असे होत नाही.शहाणी होणे  ही तर तिच्या इंद्रियांच्या  विकासाची सुरुवात असते.पुढील काही वर्षांत उमलत्या कळीचे पूर्णपणे उमललेल्या फुलात रूपांतर होते.

तिला पुरुषाच्या सहवासाची ओढ लागली पाहिजे .ती मीलनासाठी अांतून आतूर झाली पाहिजे .यासाठीच कायद्याने मुलीचे वय अठरा केलेले आहे .ते सोळा असावे असेही काही जणांचे मत आहे.

तर वय वर्षे केवळ बारा असताना गोदावरीला जगन्नाथच्या खोलीत पाठविण्यात आले.सभोवतालच्या विशिष्ट परिस्थितीमुळे हल्ली मुले मुली त्या अर्थाने  लवकर शहाणी होत असावीत .त्याकाळी तसे नव्हते. तिला लग्न म्हणजे काय याचा अर्थच कळत नव्हता.त्या रात्री गोदावरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली . तिला त्याने पूर्णपणे चुरगळून टाकले.त्या उद्ध्वस्त अनुभवाने गोदा पूर्णपणे बदलून गेली .पुरुष जातीबद्दल, शरीरसंबंधाबद्दल तिला अतोनात घृणा निर्माण झाली.

जगन्नाथच्या स्वभावात हळुवारपणा, कोमलता, प्रेम,माया, सहानुभूती,  सहसंवेदना, यांचा लवलेशही नव्हता.क्रौर्य, धसमुसळेपणा, आडदांडपणा, आडमुठेपणा, रानटीपणा, त्याच्या नसानसात  ओतप्रोत ठासून भरलेला होता .

बिचारी गोदावरी समोर जगन्नाथ दिसला की थरथर कापू लागे.त्याचा आवाज ऐकला तरी तिच्या तोंडचे पाणी पळे.तिला बिचारीला आपल्या मनातील व्यथा कुणालाही सांगता येत नव्हती.रोज तिला त्या प्राणसंकटाला  तोंड द्यावे लागे.कधी तो प्रेमाचे दोन शब्द बोलला नाही .कधी त्याने तिची तुला काही हवे आहे का ?तुला काही त्रास आहे का?तुझी तब्ब्येत कशी आहे?घरातील माणसे  तुझ्याशी नीट वागतात ना ?कुणी कांही रागावते का?  म्हणून साधी चौकशी सुद्धा केली नाही .  आपली वासना भागविण्याचे एक यंत्र म्हणून तो तिच्याकडे पाहात असावा .

अशातच निसर्गाने  आपले काम केले .तिला दिवस राहिले . ती इतकी भांबावलेली होती की तिला ना त्याचे सुख होत होते, ना त्याचे दुःख होत होते.ती सुन्न झाली होती .डोहाळे जेवण बायकांनी चिडवणे कशाचाही तिला आनंद होत नव्हता.सगळ्या भोगाला ती नाईलाजाने तोंड देत होती .रोज रात्री तिला यमयातनाना तोंड द्यावे लागत असे. तिला मैत्रीण नव्हती.अंतरींची व्यथा तिला कोणालाही सांगता येत नव्हती .दुःख सांगितल्याने कमी होते सुख सांगितल्याने द्विगुणीत होते इथे तिला तिचे दुःख कमी करण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता.ती जेव्हां माहेरी जाई तेव्हा तिला तिची आई  तिचा चेहरा तिची दशा बघून तिला खोदून खोदून सर्व काही ठीक आहे ना म्हणून विचारीत असे .आपल्याला दुःख भोगावे लागत आहे.ते कमी थोडेच होणार आहे ?आपला त्रास मरेपर्यंत असाच चालू राहणार आहे मग उगीच आईला त्रास कशाला म्हणून ती सर्व काही अलबेल आहे असे दाखवीत असे .तिच्या आईला गोदावरीचे कुठेतरी काहीतरी बरोबर नाही असे जाणवत असे .गोदावरीने सर्व काही ठीक आहे असे सांगितल्यावर, तिची आई मायेपोटी प्रेमापोटी , गोदावरीला काहीतरी व्यथा आहेत असे आपल्याला उगीचच भास होतात, अशी मनाची समजूत करून घेई.

बाळंतपणासाठी दोन तीन महिने आपल्याला माहेरी जाता येईल आणि आपली  रोजच्या नरकयातनातून सुटका होईल अशी तिला आशा होती .माहेरी चांगले प्रसुतीगृह नाही येथे चांगले प्रसुतिगृह आहे या सबबीखाली  तिला माहेरी पाठवण्याचा बेत रद्द करण्यात आला .दिवस राहिल्यानंतर काही महिन्यानंतर स्त्रियांना शरीरसंबंध नको असे वाटते.शेवटच्या दोन तीन महिन्यांमध्ये तर त्याचा खूपच त्रास होतो .त्या नराधमाने तिला नवव्या महिन्यातही सोडले नाही.

अशा त्रासदायक परिस्थितीत ती जिवंत कशी राहिली तिचा गर्भपात कसा झाला नाही ही एक  आश्चर्याचीच गोष्ट मानावी लागेल .बाळंतपणानंतर दोन महिन्यानी ती परत आली.पूर्वीचेच चक्र पुन्हा सुरू झाले.

नको असलेला शरीरसंबंध हा एक त्रास झाला. वारंवार येणारी बाळंतपणे हा दुसरा त्रास. मातृत्त्व  ही जरी आनंददायी गोष्ट असली तरी लादलेले मातृत्व, वारंवार होणारी बाळंतपणे, आणि मुलांची उस्तवार, हे नक्कीच तिला अतोनात त्रास देत होते .

त्या राक्षसाचा एवढाच त्रास नव्हता .जेवणाच्या त्याच्या रोजच्या फर्माईश असत.अमुक कर तमुक करू नको असे तो सांगत असे .आणि त्याप्रमाणे तिला ते ते पदार्थ सर्व सांभाळून करावे लागत असत.कितीही मन लावून सैपाक केला तरी कधीही त्याच्या तोंडातून गोड शब्द बाहेर पडत नसत .हे असे पाहिजे होते, ते तसेच पाहिजे होते, असे म्हणून तो तिच्या स्वयंपाकाला सतत नावे ठेवीत असे.

जगन्नाथची बदली दुसऱ्या गावी झाली.त्याने स्वतंत्र बिर्‍हाड केले.  त्याच्यावर अगोदरपासूनच कोणताही अंकुश नव्हताच आता तर तो पूर्णपणे वाटेल तसे वर्तन करायला मोकळा झाला .जगन्नाथ घरी आला म्हणजे   कसायापुढे  पुढे जशी गाय  विकलांग, घाबरलेली, मजबूर, दीनवाणी, असे तशीच गोदावरी असे.

लहान सहान गोष्टीवरून जगन्नाथ आता केवळ तोंड न चालवता हातही चालवू लागला होता.हाताने,काठीने, लाटण्याने, पळीने,कशानेही तो मारीत असे . मारण्यासाठी ,तो काही ना काही सबबी शोधून काढीत असे .एखादी वस्तू फेकून मारणे हे तर रोजचेच झाले होते . मीठ कमी पडले,जास्त पडले ,पदार्थ जास्त  तिखट झाला,कमी तिखट झाला ,थोडा वाढला, जास्त वाढला, नासला, फुकट गेला,हात मोकळा करण्यासाठी तो कारणे शोधीत असे.

तिच्या आईची प्रकृती नाजूक होती .तिला उगीच त्रास नको म्हणून ती माहेरी काहीही सांगत नसे .ती माहेरी निघून आली असती तर तिच्या पाठच्या बहिणींची लग्ने होण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या .हेही माहेरी  न येण्यासाठी कारण होते. जरी ती माहेरी आली असती तरी तो राक्षस तिला जशी कसायाने गाय न्यावी त्याप्रमाणे फरफटत ओढत घेऊन गेला असता.माहेरची मंडळी मध्ये पडली असती असे नाही .लग्न झाले म्हणजे मुलीशी असलेला आपला संबंध संपला,आता ती आणि तिचे नशीब , असा एकूण मामला होता.

मारहाणीमध्ये कधी तिचा हात मुरगळलेला असे.कधी फेकून मारलेले लाटणे पायाच्या नडगीवर बसल्यामुळे ती लंगडत असे .कधी कपाळावर टेगूळ असे.एकदा तर उकळते पाणी अंगावर टाकल्यामुळे ती कितीतरी भाजली होती .त्या कसाबाच्या करणीमुळे तिच्या शरीराची नस अन् नस दुखत असे .तिच्या अंगावर त्याच्या करणीमुळे एखादी तरी  जखम नाही असे क्वचित होत असे .

इतक्या हालअपेष्टा  सोसून ती जिवंत कशी राहिली हेही एक आश्चर्यच.ती पळून कशी गेली नाही,तिने जीव कसा दिला नाही ,तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यात पाटा घालून त्याचा जीव कसा घेतला नाही ,याचा आपल्याला उलगडा करता येत नाही .

एखादा मनुष्य इतका त्रास कसा देऊ शकतो असे एखाद्याला वाटणे शक्य आहे.एखादी मुलगी इतक्या यातना कशा निमुटपणे सहन करते असेही वाटण्याचा संभव आहे .जगात अकल्पित अतार्किक गोष्टी असतात .काही वेळा सत्य हे कल्पनेक्षा अद्भुत असते.आजच्या जगातही बर्‍याच स्त्रिया या ना त्या प्रकारे कमी जास्त  शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करीत असव्यात असे मला वाटते 

प्रत्येक गोष्टीला शेवट असतो त्याप्रमाणे यालाही शेवट होताच .असेच काही तरी झाले,

भाजीत एक केस सापडला . जगन्नाथ भडकला. 

रागाच्या भरात उठून त्याने जवळच पडलेली कात्री हातात घेतली.

थांब तुझे सर्व केस कापून टाकतो म्हणजे अन्नात केस सापडणार नाही असे म्हणत ,तिचे केस पकडून ते वेडे वाकडे कापण्याला सुरुवात केली.

गोदावरीच्या केसांना ताण बसत होता .कात्रीची टोकेही तिच्या डोक्याला कुठे कुठे बोचत होती . 

*ती सोडा सोडा म्हणून ओरडत होती. विव्हळत होती .जगन्नाथाने तिचे डोके भिंतीवर जोरात आपटले.*

* ती तात्काळ बेशुद्ध पडली . रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला .*

*तिची सर्व यमयातनातून  कायमची सुटका झाली.*

***********************         

पोलिसांनी त्याला अर्थातच अटक केली .

खुनाचा आरोप सिद्ध झाला.

त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली .

त्याची मुले आजोळी व काकांकडे आश्रितासारखी वाढू लागली.

जगात असंख्य माणसे असंख्य प्रकारचे मानसिक व शारीरिक क्लेश भोगत असतात.

त्यातील एका प्रकरणाचा अंत झाला .

मुलांचा काहीही दोष नसताना त्यांना अनाथ जीवन जगावे लागले .

१९/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel