( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

दशरथ एका कारखान्यात साधा कामगार म्हणून काम करीत होता.त्याचा विवाह झाला आणि त्याची पत्नी कौसल्या  घरात आली.तीही अशीच एका कारखाना कामगाराची मुलगी होती.तिची आई लोकांकडे धुणीभांडी करून पैसा मिळवीत असे.तेवढीच तिच्या वडिलांच्या उत्पन्नाला मदत होत असे.सर्वच लोक कमी जास्त प्रमाणात पितात.परंतु झोपडपट्टीतील बरेच  लोक त्याच्या आहारी जाताना दिसतात.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची धुळधाण होते.कौसल्या अशाच वातावरणातून आली होती.तिची आई कमवीत असे आणि तिच्या उत्पन्नावरच घर बरेचसे चालत असे.वडिलांचा पैसा बऱ्याच प्रमाणात पिण्यात जात असे.मध्यम आणि श्रीमंत वर्गातील लोक पितात परंतु प्रमाणात पितात असे वाटते.पिण्यामुळे कुटुंबाची धुळधाण झाली असे क्वचितच दिसते.   

दशरथ मालवणजवळील एका  खेडेगावातून शहरात आला होता.त्याचे आईवडील ग्रामीण भागात शेतमजूर होते.त्यांची स्वतःची अशी शेती नव्हती. तिथे पुरेसे काम मिळत नसल्यामुळे तो शहरात आला.आणि इथेच हळूहळू रमला.एका झोपडपट्टी दादाने झोपडपट्टी उभारली होती.त्याने जागा घेतली.त्यावेळी सुरुवातीला तो पीत नसे.नंतर कधीतरी श्रमपरिहारार्थ, केव्हां तरी गंमत म्हणून,कधी कधी मित्र आग्रह करतात म्हणून,त्याने पिण्याला सुरवात केली.कुणीतरी  म्हटलेच आहे पिनेके लिये बहाना चाहिए.तो केव्हां त्याच्या आहारी गेला त्याचे त्यालाच कळले नाही.

तो पीत नव्हता तेव्हांच त्याचे लग्न झाले होते.कौसल्येची आई तिच्या संसाराची पिण्यामुळे झालेली वाताहत पाहात होती.म्हणून तिने न पिणारा मुलगा तिच्या मुलीसाठी,कौसल्यासाठी पाहिला.लग्नानंतर कांही दिवस व्यवस्थित गेले.कौसल्येला दिवस राहिले.दशरथ त्याचवेळी गंमत,टाईमपास म्हणून पिऊ लागला.हळू हळू तो त्याच्या आहारी गेला.कौसल्या पहिल्यापासूनच धुणीभांडी करीत होती.एकदा तिच्या मालकिणीने तिला पोळ्या करते का म्हणून विचारले.तिने केलेल्या  पोळ्या  सगळ्यांनाच आवडल्या.धुणी भांडी झाडूपोचा यावरुन तिची बढती झाली.दोन चार घरी ती पोळ्या करी एका घरी इतर स्वयंपाकही करी.घर तिच्या उत्पन्नावर चालत असे.

तिने दशरथचे पिणे कमी व्हावे म्हणून खूप प्रयत्न केला.विशेष कांहीच उपयोग झाला नाही.शेवटी तिने त्याचा नाद सोडून दिला.तिला दोन मुलगे झाले.राम व लक्ष्मण.या दोघांचे रामायणातील राम लक्ष्मण यांच्याप्रमाणे प्रेम असावे अशी इच्छा होती.ती इच्छा सफल झाली.दोघांनी आपले नाव सार्थ केले.कोसल्येने कौतुकाने दोघांनाही शाळेत घातले.शाळेत फी नव्हती.पुस्तके वह्या शाळेतून फुकट मिळत असत.राम अभ्यासात हुशार होता.त्याने आपला पहिला नंबर कधीही सोडला नाही.लक्ष्मणचे डोके अभ्यासात विशेष कांही चालत नसे.

चौथी झाल्यावर त्याने शाळा सोडून दिली.मिळेल ते काम करण्यास सुरूवात केली.दिवस जात होते.रामला स्कॉलरशिप मिळत होती.मागासवर्गीय म्हणून अनेक सुविधा मिळत होत्या.त्याची आई कौसल्या त्याला जिथे कमी पडत असे तिथे आर्थिक बळ पुरवीत असे.त्याने अनेक परीक्षा दिल्या. केंद्राची शासकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची निवडही झाली.प्रशासकीय अधिकारी म्हणून तो काम करू लागला.त्याची नेमणूक दुसर्‍या राज्यात झाली तिकडे तो रुजू झाला.हल्ली तो मध्य प्रदेशमध्ये होता.त्याला तशीच उच्चशिक्षित पत्नी मिळाली.तीही नोकरी करीत असे.तिला दागिन्यांची खूप आवड होती.मोजकेच परंतु ठळक दागिने ती कामावर जातानासुद्धा घालत असे.विविध डिझाइन्स असलेले  नेकलेस,कानातल्या टॉप्सच्या जोड्या,तिच्याकडे असंख्य होत्या.रोज ती निरनिराळे टॉप्स नेकलेस घालत असे.निरनिराळ्या डिझाइनची मंगळसूत्रेही होती.एरवी ती जीन्स व टॉप,सलवार खमीज वापरीत असे.लग्नकार्य असेल तर तिचा थाट बघण्यासारखा असे.शालू ,पैठण्या, उंची साड्या दागिने हे तिला मनापासून आवडत. तिचे दागिने खोटे क्वचितच असत.  रामच्या बायकोचे नाव अर्थातच सीता होते.रामची आई कौसल्या अजुनही दुसऱ्यांकडे स्वयंपाक करीत असे.आपल्या आईने आता दुसर्‍यांकडे स्वयंपाकाचे काम करु नये असे त्याचे मत होते.आहेत ते दिवस सुखाने आपल्याकडे राहावे असे तो म्हणत होता.त्याच्या आईने जमेल तितके दिवस काम करीन नंतर तुझ्याकडे यायचेच आहे असे त्याला सांगितले.इथे माझ्याजवळ लक्ष्मण आहेच तो माझी सर्व सेवा करील.तू काळजी करू नकोस असेही सांगितले.तो आईच्या नावाने दर महिन्याला कांही पैसे पाठवित असे.लागले तर सांग आणखी पाठवीन असे तो फोनवर सांगे. 

लक्ष्मण प्रथम रस्त्यावर भाजी विकायला बसत असे.त्याने मिळाली तेव्हां कारखान्यात नोकरीही करून बघितली.नोकरी तात्पुरती होती.जेव्हा गरज पडे तेव्हा त्याला बोलावण्यात येई.त्याने फेरीवाल्याचा व्यवसायही करून बघितला.काम मिळवण्यासाठी एका तिठ्यावर कांही लोक उभे राहत असत तिथे जाऊन तो उभा राहत असे.थोडक्यात तो जे मिळेल ते काम करीत होता.परंतु त्याचा जम कशातच बसत नव्हता.तो थोडाबहुत अधांतरीच लटकत होता.मध्यंतरी दशरथचा त्याच्या वडिलांचा, अति प्याल्यामुळे कावीळ झाली आणि त्यातच मृत्यू झाला.राम त्यावेळी एकटा होता तो येऊन गेला.त्या वेळीही त्याने आईला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला होता.आईने नेहमींचेच उत्तर दिले होते.

रामशी तुलना करता लक्ष्मणची परिस्थिती खूपच हलाखीची व गरिबीची होती.केंद्र सरकारमध्ये राम मोठा अधिकारी होता.त्याची बायकोहि तशीच उच्चशिक्षित व मोठ्या पगाराच्या नोकरीवर काम करीत होती.तर लक्ष्मण कुठेही स्थिर नोकरी करीत नव्हता.जमेल तसे काम मिळेल ती नोकरी करून पोट भरत होता.एकूणच त्याची परिस्थिती हलाखीची होती.तो अर्थातच झोपडीत आईबरोबर राहत होता.यथावकाश त्याचे लग्न झाले.अशीच एका झोपडपट्टीतील गरीब मुलगी त्याला मिळाली.त्यांच्या लग्नात राम सीता आली होती.त्यांनी आपला मुक्काम एका हॉटेलात ठोकला होता.झोपडीत येऊन राहणे त्यांना शक्यच नव्हते.उच्च सुखसोयींची सवय झाल्यामुळे त्यांना झोपडीतील वातावरणाशी सुविधांशी जुळवून घेणे शक्य नव्हते.कधीही ते मुंबईत आले की उंची हॉटेलमध्येच उतरत असत.अाईला येऊन भेटून जात.

राम लक्ष्मण या बंधूंची मैत्री,प्रेम,पुराणातील रामलक्ष्मण याप्रमाणेच होते.लक्ष्मणला राम तू माझ्या तिकडे ये मी तुला चांगली नोकरी मिळवून देतो असे सांगत असे.परंतु लक्ष्मण मी आहे तिथे ठीक आहे असे म्हणून जात नसे.

लक्ष्मणच्या पत्नीचे नाव अर्थातच उर्मिला होते.सर्व तिला  उमा म्हणत असत.उर्मिलाचा  स्वभाव अतिशय विचित्र होता.कां कोण जाणे तिला दुसऱ्या कुणाचे सुख बघवत नसे.दुसऱ्याच्या सुखात दुसर्‍याच्या आनंदात सुख मानणारी आनंद मानणारी माणसे असतात.तसेच कांहीजणांना दुसऱ्याचे सुख, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचे वैभव, पाहवत नाही. या दुसऱ्या प्रकारातील ही उर्मिला होती. ज्यांच्याशी आपला कांहीही संबंध नाही अशाचा उत्कर्ष झाला तर आपण तिकडे दुर्लक्ष करतो.ती गोष्ट कुणी मनावर घेत नाही.त्याबद्दल असूयाही वाटत नाही.परंतु जो आपल्या पातळीवरचा आहे त्याचा उत्कर्ष झाला तर कमी जास्त प्रमाणात कुठे तरी असूया स्पर्श करून जाते.ही गोष्ट कांहींच्या लक्षात येते कांहींच्या येत नाही.परंतु हे वाईट आहे योग्य नाही म्हणून मनुष्य ते कळत नकळत दूर करतो.

परंतु कांही माणसे अशी असतात की ज्यांना आपल्या पातळीवरील मनुष्याचा उत्कर्ष मुळीच सहन होत नाही.अशा माणसातील उर्मिला एक होती.असूया द्वेष तिच्या नसानसात भरला होता.ही असूया हा द्वेष तिला कोणत्या टोकापर्यंत नेत असे ते तिचे तिलाही कळत नव्हते.राम व लक्ष्मण हे जुळे भाऊ.राम मोठा अधिकारी.उच्चशिक्षित त्याची बायकोही तशीच उच्चशिक्षित, श्रीमंत घरातील पैसेवाली, त्यामुळे तिला दोघांबद्दलही असूया वाटत असे.प्रत्यक्षात राम व सीता यांची श्रीमंती त्यांचे वैभव तिने पाहिले नव्हते.नाहीतर ती अक्षरशः जळून मेली असती.दोघेही परराज्यात त्यांच्या कामात मग्न होती.कधीतरी त्यांचे फोनवर संभाषण होत असे तेवढेच.ती फक्त त्यांच्याबद्दल सासूच्या तोंडून नवऱ्याच्या तोंडून त्यांचे वैभव ऐकत होती.

ज्या गोष्टी आपण ऐकून असतो त्याबद्दल आपल्याला तीव्र भावना निर्माण होत नाही.परंतु जी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघतो अनुभवतो त्याबद्दल तीव्र संवेदना स्वाभाविकपणे निर्माण होतात.

उर्मिलेने राम व सीता यांना तिच्या लग्नात फक्त बघितले होते. लग्नसमारंभाच्या गडबडीत ते तिला तेवढेसे आठवत नव्हते.नंतर त्यांची भेट झाली नव्हती.लक्ष्मणला आपल्या बायकोचा विचित्र, थोडाबहुत खुनशी,असूयेने भरलेला स्वभाव माहीत होता.कारणाकारणाने राम त्यांना आपल्याकडे बोलवत असे.परंतु लक्ष्मण जाणीवपूर्वक तिकडे जाण्याचे टाळत असे.त्यांचे वैभव, त्यांचा उत्कर्ष, त्यांचे सामाजिक स्थान, उर्मिलेला बघवणार नाही, सहन होणार नाही,त्यातून ती आपल्याला बोलून बोलून त्रास देईल याची त्याला कल्पना होती. ती आणखीही कांही भलतेच करून बसेल याची खात्री लक्ष्मणला होती. 

अशीच वर्षे चालली होती.मध्यंतरीच्या काळात कौसल्याचा त्यांच्या आईचा मृत्यू झाला.त्यावेळी फक्त राम येऊन गेला.लक्ष्मणला दोन मुली झाल्या.उर्मिलेला मुलगे पाहिजे होते.निदान एक तरी मुलगा पाहिजे होता.दोन्ही मुली झाल्यामुळे ती खूप रंजीस होती.

इकडे रामला दोन मुलगे  झाले.प्रत्येकवेळी फोनवर बोलताना राम,लक्ष्मणला त्याच्याकडील हालहवाल सांगत   असे.रामला दोन्ही मुलगे झाल्यामुळे उर्मिला त्याच्यावर आणखीच जळू लागली होती.स्वभावाला औषध नाही हेच खरे.

उर्मिला सतत चिडचिड करीत असे.ती आपला राग  मुलींवर काढीत असे.

लक्ष्मण दारू पीत नव्हता.तसा तो निर्व्यसनी होता.त्याच्या परीने तो पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असे.परंतु दुर्दैवाने त्याला विशेष यश मिळत नसे.

स्वतः उर्मिलाही धुणीभांडी झाडूपोचा करून पैसे मिळवित असे.

*कांहीतरी करून अकस्मात आपल्याला धनलाभ व्हावा अशी तिची इच्छा होती.*

*तिचा भाऊ अशा कामांमध्ये तरबेज होता.*

*त्याच्या मदतीने वाट्टेल ते करून प्रसंगी एखाद्या लहान मुलाचा किंवा मुलीचा बळी देऊन आपण आपले ईप्सित साधावे,असा ऊर्मिलेचा विचार होता.*

*लक्ष्मणचा भाऊ राम याला बळी पडेल अशी कोणाचीच कल्पना नव्हती.*  

(क्रमशः)

२२/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel