( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
त्या झाडावर सुमित्रेने आपला मुक्काम ठोकला होता.
तिची इच्छा कशी पूर्ण होणार होती?
ती आपली इच्छा कशी पूर्ण करून घेणार होती?
अपूर्ण इच्छा असताना ती पुढील गतीला जाणार होती का?
कांही चमत्कार होऊन ती पुन्हा मानवरूपात येणार होती का?
त्यावेळी तिची सरांशी भेट होणार होती का?
तिच्या इच्छा आकांक्षा कशा पूर्ण होणार होत्या?
तिच्या जगात ती सराना घेऊन जाणार होती का?
ती नंदिनीला सरांबरोबर संसार करू देणार नव्हती का?
जे मला मिळत नाही ते मी तुलाही मिळू देणार नाही अशा हट्टाला ती पेटणार होती का?
या जगात असताना ती चांगली,सत्प्रवृत्तीची,सद्गुणी,
सज्जन,सुस्वभावी,मुलगी होती.भूतयोनीतही ती तशीच होती का?
का तिच्या स्वभावात या जगात आल्यावर कांही विष मिसळले होते?
त्यामुळे सरांच्या संसारावर अशुभाची, गडद छाया पसरणार होती का?
असे अनेक प्रश्न होते.भविष्यकाळच त्याचे उत्तर देणार होता.
भविष्याच्या पोटात काय दडले आहे ते कुणालाच माहीत नव्हते.
चिंचेच्या झाडावर सुमित्रेला करमत नव्हते.जरी ती अमानवी अस्तित्वात होती तरी तिला दिवसा किंवा रात्री कुठेही फिरण्याला आडकठी नव्हती. सुमित्रापुढे कांहीही उद्देश किंवा ध्येय नव्हते.ना तिला कुणाचा सूड घ्यायचा होता.ना तिला कुणावर मेहरबानी दाखवायची होती.ना तिला कुणाचे रक्षण करायचे होते.तिचे अस्तित्त्व आशुतोष सरांसाठी होते.आशुतोष सर अगोदरच विवाहीत आहेत हे कळल्यावर तिचा जो मूड गेला तो गेलाच.ती कॉलेजच्या परिसरात फिरत असे.आशुतोष सरांचे लेक्चर चालू असताना ती वर्गात बसत असे.अर्थातच तिचे अस्तित्व कुणालाही जाणवत नसे.सरांचे बोलणे तन्मयतेने ऐकणे आणि सरांकडे टक लावून पाहणे हाच तिचा एकमेव उद्योग होता.ती कॉमन रूममध्ये येऊन सरांकडे पाहात बसत असे.सरांभोवती मुलींचा गराडा पडला तरी तिला राग येत नसे.सर त्यातल्या कुणालाही जास्त जवळीक करू देणार नाही याची तिला खात्री होती.एकेकाळी अशा घोळक्यामध्ये गराडय़ामध्ये तीही होती.
तिची एकच इच्छा होती आणि ती म्हणजे सरांबरोबर संसार करणे.सरांबरोबर सर्व अर्थाने तन्मय होणे.दुधात साखर जशी मिसळून जाते तसे आशुतोष सरांच्या संसारात विरघळून जाणे. ते या जन्मात शक्य नाही हेही तिला माहीत होते.मनुष्य जन्मात तर ते शक्य नव्हते.याही जन्मात ते शक्य नव्हते.ती सरांना तिच्या भूतयोनीत आणू शकत होती.परंतु सरांच्या मनाविरुध्द त्यांना या जगात आणून काय उपयोग होता?तिचे सरांशी मीलन शक्य नव्हतेच.बहुधा ती अशीच अधांतरी लटकत राहणार होती.तिची इच्छा अतृप्त राहिली म्हणून ती या योनीत आली होती.सरांभोवती अदृश्य स्वरुपात फिरत राहणे, त्यांना पाहत राहणे, याशिवाय ती कांही करू शकत नव्हती.ती पुढे गतीला केव्हा जाणार होती?तिच्या नशिबात काय लिहिले आहे ते कुणालाच माहीत नव्हते. अजून त्यांच्या पत्नीला तिने पाहिले नव्हते.
ती त्यांच्या घरी जाऊ शकत होती.त्यांच्या खोलीत जाऊ शकत होती.त्यांच्याकडे टक लावून पाहत राहू शकत होती.परंतु त्यांच्या घरी जावे असे तिला कधीच वाटले नाही.त्यांच्या घरी जायचे तर त्यांची पत्नी म्हणून ती गेली असती.ते शक्य नाही असे समजल्यावर तिला तिथे जाण्यात काहीही रस नव्हता.तिला पोहण्याची आवड होती.मनुष्य जन्मात ती या नैसर्गिक तलावावर पोहायला अनेकदा आली होती.आता ती त्याच तलावाच्या काठावरील एका चिंचेच्या झाडावर होती.चिंचेच्या झाडाच्या तलावावर आलेल्या फांदीवरून तलावात सूर मारण्याची तिची सवय अजूनही तशीच होती.दिवसा व रात्रीतून ती निदान पाच पंचवीस वेळा तरी तलावात सूर मारीत असे.
असेच चार पाच महिने गेले.नंदिनीचा एक वर्षाचा परदेशातील कोर्स पुरा झाला.ती मायदेशी आपल्या घरी परतली. नंदिनीचा फोटो सुमित्रेने पाहिला होता.तिला लगेच सुमित्रेने ओळखले.तिच्याबद्दल सुमित्रेला असूया जरूर वाटली.तिचे कांही अहित घातपात करावा असा विचार तिच्या मनात आला नाही असे नाही परंतु ती तसे करणार नव्हती.ती मनुष्यजन्मात सज्जन सुस्वभावी होती आणि या योनींतही,या जन्मातही ती तशीच राहणार होती. सरांबरोबर नंदिनीला फिरताना ती पाही.दोघांचा जोडा छान दिसतो असेच ती मनात म्हणे.सरांशेजारी ती स्वत:ला पाही.यापलीकडे तिची मजल जावू शकत होती परंतू तिचा सुस्वभाव तिला जाऊ देत नव्हता.
नंदिनी शास्त्र विषयात पदवीधर होती.त्यातच पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती परदेशात गेली होती.तिला संशोधनात रस होता.एका स्थानिक प्रयोगशाळेत ती काम करीत होती.त्या प्रयोगशाळेत विषावर संशोधन चालले होते.प्लेग, टायफॉईड, कॉलरा, देवी, करोना, इत्यादी संसर्गजन्य रोगांवर ज्याप्रमाणे व्हॅक्सिन्स उपलब्ध आहेत.एकदा तुम्ही व्हॅक्सिनचा एक किंवा जास्त डोस घेतल्यावर तुम्हाला तो रोग होण्याची शक्यता जवळजवळ शून्यावर येते.रोग झालाच तरी त्याची तीव्रता फार कमी असते.मृत्यू जवळजवळ होत नाहीच.सर्पदंशावर अशाच एखाद्या व्हॅक्सीनचा शोध लावण्याचे काम या प्रयोगशाळेत चालले होते.
खेडेगावात सर्पदंशाने कितीतरी लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशावरील आधुनिक उपचार वेळेवर मिळत नाहीत.संपूर्ण भारताचा आणि जगाचा विचार केला तर मृत्यूचे प्रमाण बरेच आहे.या शतकातच भारतात आत्तापर्यंत जवळजवळ वीस पंचवीस लाख लोक सर्पदंशाने मेले असे बीबीसीचा अहवाल सांगतो.आफ्रिका खंड जवळजवळ संपूर्ण अविकसित आहे. इतरत्रही अविकसित देश पुष्कळ आहेत.आरोग्यसेवा आपल्या देशाप्रमाणेच अनेक देशांत ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नाही.सर्पदंश झाल्यास काही वेळातच त्यावर उपाय करावा लागतो.तरच सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.अशी सोय फारच कमी खेडेगावातून उपलब्ध आहे.
नंदिनी अशा एका व्हॅक्सिनवर संशोधन करीत होती कि जे व्हॅक्सिन दिल्यावर सर्पदंश झाला तरी विषबाधा होणार नाही.शरीरात अँटीबॉडीज तयार होतील.सर्पदंशाने होणारे मृत्यू होणार नाहीत.
आपण जरी साप असा शब्द स्थूलमानाने सरपटणाऱ्या प्राण्याना वापरीत असलो तरी त्यात अनेक जाती व प्रजाती आहेत.प्रत्येकाचे विष निरनिराळ्या प्रकारचे आहे.नाग, फुरसे, कांडर, घोणस, सर्पटोळ,अजगर,असे अनेक विषारी साप आहेत.प्रत्येक प्रकारात पुन्हा उपप्रकार आहेत.ती अशा प्रकारच्या व्हॅक्सिनचा शोध लावत होती कि जे व्हॅक्सिन घेतले असल्यास कोणत्याही प्रकारच्या सापाने दंश केला तरी त्याला प्रतिरोध करण्याची, प्रतिकार शक्ती, मनुष्यात निर्माण झालेली असेल.सर्पदंशाने मृत्यू होणार नाहीत.
यासाठी प्रयोगशाळेत विविध प्रकारचे साप आणलेले होते.काचेच्या पेट्यातून त्यांची निवास व्यवस्था केली होती.प्रत्येकाला तो चावणार नाही अशा प्रकारे काळजीपूर्वक पकडून त्याचे विष काढले जाई.संशोधनामार्फत सर्वसमावेशक असे एखादे व्हॅक्सिन शोधण्याचा प्रयत्न केला जात होता.निरनिराळ्या प्रकारचे साप हाताळताना फार काळजी घ्यावी लागे.कांही प्रकारचे नाग इतके विषारी असतात की चावल्यानंतर ते पाणीसुद्धा पिऊ देत नाहीत.त्या अगोदर तत्काळ मृत्यू होतो.
काळा नाग सर्वात विषारी असतो.अशा एका नागाला पकडून त्याचे विष प्रयोगासाठी, संशोधनासाठी, काढीत असताना कुठेतरी चूक झाली. त्या नागाने नंदिनीला दंश केला.ती तत्काळ बेशुद्ध होऊन पडली.अशावेळी काय करावे याचे उपाय प्रयोगशाळेत काम करणार्या सर्वांनाच माहीत होते. प्राथमिक उपचार प्रयोगशाळेत करून तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.डॉक्टरांचा एक चमू तिच्यावर उपचार करीत होता.उपाययोजनांना ती किती प्रतिसाद देईल त्यावर सर्व कांही अवलंबून होते.
आशुतोष सराना लगेच कळवण्यात आले.ते हॉस्पिटलमध्ये हजर झाले.जवळजवळ आठ दिवस नंदिनी तिच्या शरीरात सर्पदंशाने गेलेल्या विषाशी झगडत होती.केव्हां केव्हां ती त्या आघातातून बाहेर येईल असे वाटे.तर कधी कधी उपचार करणारे डॉक्टर निराश झालेले दिसत.असा आशा निराशेचा खेळ आठ दहा दिवस चालला होता.या आठ दहा दिवसांत आशुतोष सराना व्यवस्थित झोप लागली नव्हती.धड अन्नपाणीही त्यांनी घेतले नव्हते.कॉलेजात तर ते गेलेच नव्हते.
सुमित्रा आसपासच होती.अर्थात तिला कुणी पाहू शकत नव्हते.ती मात्र सर्व पाहत होती.आशुतोष सरांची अवस्था तिला पहावत नव्हती.नंदिनी बरी व्हावी यासाठी सर्व जण देवाची करुणा भाकत होते.सुमित्राला नंदिनी बरी व्हावी असे मनापासून वाटत होते.तिचे नंदिनीशी वैर नव्हतेच.सुमित्रा विचित्र परिस्थितीची बळी होती.सुमित्राही देवाची करुणा भाकत होती की काय ते कळायला मार्ग नाही.तीही तिच्या देवाची करुणा भाकत होती असे म्हणायला हरकत नाही.
बारा दिवस नंदिनीने सर्वांना आशा निराशेच्या झुल्यावर झुलवत ठेवले होते.तेराव्या दिवशी मृत्यूशी चाललेल्या झगडय़ात तिचा पराभव झाला.मृत्यूचा विजय झाला.डॉक्टरांनी नंदिनीचा मृत्यू झाला असे जाहीर केले.तिला लावलेल्या अनेक प्रकारच्या नळ्या व व्हेंटिलेटर काढून घेण्यात आले.तिच्यावर एक पांढरे वस्त्र टाकण्यात आले.ती नोकरी करीत होती तिथेही ही बातमी गेली.त्या प्रयोगशाळेत सर्वत्र दु:खाचे सावट पसरले.आशुतोष सर तर एखाद्या वटवृक्षाप्रमाणे पूर्णपणे उन्मळून पडले होते.डॉक्टरांच्या प्रयत्नांना नंदिनी योग्य प्रतिसाद देत आहे असे वाटत होते.आज ना उद्या नंदिनी बरी होईल.पुन्हा आपल्यासोबत फिरू लागेल.हसू खेळू लागेल.सर्व काही पूर्ववत होईल. अशी त्यांना खात्री होती.
नंदिनी मुळात बऱ्यापैकी गोरी होती.विषप्रयोगाने आणि तिच्यावर डॉक्टरांनी केलेल्या अनेक उपचारामुळे ती काळी ठिक्कर पडली होती.तिच्याकडे बघवत नव्हते.दहा बारा दिवसांत तिची संपूर्ण रया गेली होती.
*सुमित्रा सर्व पाहात होती.आशुतोष सरांचे दु:ख तिला पाहावत नव्हते.*
*एवढ्यात तिच्या मनात एक विलक्षण कल्पना आली.*
*त्यामुळे आशुतोष सरांचे दु:ख तर दूर होणार होतेच.परंतु तिचेही ईप्सित साध्य होणार होते.*
*एका दगडात दोन कामे होणार होती.*
*सुमित्राने हळूच नंदिनीच्या शरीरात प्रवेश केला.*
*त्या शरीरात जम बसवण्यास तिला अर्थातच वेळ लागणार होता.*
*आळोखेपिळोखे देत नंदिनी हळूच उठून बसली.*
(क्रमशः)
८/३/२०२२©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com