( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
ती अशुभ शक्ती क्षणोक्षणी आपली रूपे बदलत होती. पिंपळावर या फांदीवरून त्या फांदीवर असा त्या शक्तीचा नाच चालला होता.
काळोखी रात्र असूनही कशी कोण जाणे तिची, त्या अशुभ शक्तीची, सर्व रूपे स्पष्ट दिसत होती.
कधी ती अशुभ शक्ती बाबांच्या गॅलरीजवळ येत असे तर कधी दूर पिंपळावर जात असे.
बाबांना घाबरवायचा त्या शक्तीचा इरादा स्पष्ट दिसत होता.
बाबा शांतपणे सर्व पाहात होते.बाबा घाबरत नाहीत असे पाहिल्यावर तो समंध(बहुधा समंध) हताश व निराश झाल्याचे बाबांना स्पष्ट दिसत होते.
बाबांच्या शेजारी गॅलरीत बसून शाम सर्व कांही पाहात होता.बाबांच्या आधारामुळे त्याला थोडेबहुत निर्धास्त वाटत होते.
बाबानी आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांच्या फ्लॅटला खरेच हनुमान कवच होते.त्या शक्तीची आंत येण्याची हिम्मत होत नव्हती.
गॅलरीत बाबा व शामजवळ बसून अनुभव घेण्याची सुधाची हिंम्मत होत नव्हती.ती तिच्या खोलीत धडधडत्या हृदयाने कॉटवर बसली होती.तिला झोपही लागत नव्हती.शाम जेव्हां खोलीत आला तेव्हांच ती आडवी झाली.
बाबांवर कितीही विश्वास असला.बाबांनी कितीही आश्वस्त केले असले तरीही सुधाची भीती कमी झाली नव्हती. खिडक्या रात्री शामला गच्च लावून घ्याव्या लागत असत. पडदेही पूर्ण सरकवावे लागत.चुकून एखादा पडदा लावायचा राहिला तर तो म्हातारा खिडकीच्या काचेला नाक लावून आपल्या बटबटीत लाल डोळ्यानी आंत पाहात असे.झोप लागली असली तरी त्यामुळे जाग येई.आपल्या नकळत खिडकीकडे लक्ष जात असे.खिडकीबाहेर बहुशः म्हाताऱ्याच्या रूपात ते अस्तित्व असे.क्वचित ते भयानक स्त्री रूप घेऊन आंत पाहात असे.मुलांची खोली पूर्वेला होती.त्यांच्या कानावर मोठे लोक बोलत असताना काही बाही गोष्टी गेल्या होत्या.परंतु त्याचे भयानक स्वरूप त्यांना माहीत नव्हते.ती शांतपणे झोपत असत.
या इमारतीतील ब्लॉक कमी भाडय़ाने कां दिले जात होते. एखादा ब्लॉक विकत घेतो म्हणाला तर कमी किंमत कां लावली जात होती.ब्लॉक भाडय़ाने जावा किंवा विकत घेतला जावा यासाठी प्रलोभने कां दाखवली जात होती.आलेले भाडेकरू थोड्याच महिन्यांत जागा कां सोडीत होते. त्याचा उलगडा आता होत होता.पश्चिमेकडील ब्लॉक्सना हा अनुभव कमी जास्त प्रमाणात येत असे.पूर्वेकडील व उत्तरेकडील फ्लॅटना अशा प्रकारचा अनुभव ते मोकळ्या प्लॉटकडे आले तर येत असे.कित्येक जण इतरांचे ऐकून उगीच भानगड नको म्हणून अनुभव आल्याशिवाय फ्लॅट सोडून पळत असत.
असाच एक महिना गेला.दिवसासुद्धा पश्चिम बंद करण्यात आली होती.खिडक्या बंद. गॅलर्या बंद.पडदे सरकवलेले. त्यामुळे काळोख.बाबांच्या खोलीच्या खिडक्या गॅलरी उघडी असे.हॉल आणि शामच्या खोलीच्या खिडक्या पडदे सर्व कांही बंद असे.या फ्लॅटचे सौंदर्य,आनंद व समाधान ज्यात होते ते सर्व बंद होते.ती बाजूच बंद होती. क्षितिजापर्यंत पसरलेली शेते, क्षितिज रेषेवर डोंगर, सर्वत्र पसरलेली हिरवाई,फ्लॅटमध्ये येणारी मावळतीची सूर्यकिरणे,गार वारा, कशाचाच अनुभव घेता येत नव्हता.कशाचाच आनंद घेता येत नव्हता. मग या ब्लॉकमध्ये राहून उपयोग काय?विशेषतः सुधा सतत भीतीच्या दडपणाखाली राहात होती.तिचा बाबांवर विश्वास नव्हता असे नाही.परंतु आपल्या फ्लॅटला हनुमानाचे कवच जरी असले तरी बाहेर पडल्यावर काय? असा तिचा प्रश्न होता.दिवसा कांही त्रास कदाचित होत नसेल.प्रत्येक जण सूर्य मावळण्याच्या आंत फ्लॅटमध्ये येईलच याची कांहीही खात्री नव्हती. शामला तर अनेकदा ऑफिसमधून घरी येईपर्यंत आठ आठ नऊ नऊ वाजत.मुलानाही अनेकदा रात्र होत असे.फ्लॅटबाहेर कुणाला कांही झाले तर काय करायचे?ते अस्तित्व मुलांना, शामला, कांही करणार नाही कशावरून?तसे झाले तर काय करायचे?ही एकच चिंता तिला खात असे.केवळ अशाप्रकारच्या काळजीमुळे ती खंगू लागली. तिला नीटपणे अन्नपाणी जात नसे.
ज्या सौंदर्याला भुलून आपण हा फ्लॅट घेतला त्याचाच जर उपभोग घेता येत नसेल तर मग आपण दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी राह्यला गेलेले चांगले नाही का?असा विचार तिने केला.एक दिवस शामला तिने सांगितले. आपण दुसरा एखादा फ्लॅट पाहूया. लहान असला,जुना असला, गैरसोयीचा असला तरी चालेल. सारासार विचार करून शामने तिच्या मताला संमत्ती दिली.
त्या अगोदर बाबांना एकदा हे सांगावे असे त्याने ठरवले.बाबा आपल्याच तंद्रीमध्ये बऱ्याच वेळा असत.त्यांची ध्यानधारणा,जपजाप्य, पूजाअर्चा, इत्यादी चालत असत.बऱ्याच वेळा ते एक प्रकारच्या भावावस्थेमध्ये असत.आसपास काय चालले आहे तिकडे त्यांचे लक्ष नसे.
बाबांच्या कानावर त्याने सर्व हकीकत सुधाचा व त्याचा मनोदय घातला.बाबांनी डोळे मिटले.थोडावेळ ते निश्चल होते.त्यांनी शामला एवढी चांगली जागा तुम्ही सोडू नका.मी तर हा फ्लॅट विकत घेण्याच्या बाजूचा आहे.तुम्हाला एवढा त्रास होतो. तुम्ही एवढे घाबरता,याची मला कल्पनाच नव्हती.फ्लॅटला हनुमान कवच आहे असे सांगितल्यावर तुम्ही नि:शंक झाला असाल असे मला वाटले होते.तुम्ही भीतीपोटी पश्चिम बाजू बंद केली आहे हे मला माहीतच नव्हते.तुम्ही काळजी करू नका.मी त्या पिंपळावरील अशुभाचा बंदोबस्त करतो.ते अस्तित्व पुढच्या गतीला तरी जाईल किंवा ही जागा सोडून अन्य फार दूरचे झाड पकडील.
ते पुढे म्हणाले,तो ब्रह्मसमंध आहे.मागच्या जन्मी तो विद्वान, सद्विचारी,सद्बुद्धी असलेला ब्राह्मण होता.कांही अपघातामुळे तो या योनीमध्ये गेला.तो फक्त तुम्हाला भीती दाखवीत आहे. किंबहुना आपण असे म्हणूयात की तो जसा आहे त्यामुळे तुम्ही भीत आहात. तुम्हाला त्रास देण्याचा घाबरवण्याचा त्याचा हेतू नाही.तो तुमच्याकडे कुतूहलाने पाहत असतो.तुमचे त्याला कौतुक वाटते.तुम्ही एक आदर्श जोडी आहा असे त्याला वाटते.तो तुमच्याकडे कौतुकाने पाहत असतो.तुम्ही खिडकी लावली तर खिडकीला नाक लावून पाहतो.तुम्हाला त्याची उगीचच भीती वाटते.तुम्हाला यापुढे तो त्रास देणार नाही अशी व्यवस्था मी कांही दिवसांतच करतो.
बाबांच्या शब्दावर सर्वांचाच विश्वास होता.सुधा मनात म्हणाली बाबा म्हणतात तर त्यांना कांही दिवस देऊन पाहू.तो ब्रह्मसमंध गेला तर उत्तमच आहे.नाहीतर दुसऱ्या जागेचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहेच.
दुसऱ्या दिवशी बाबा बाजारात गेले.एक हनुमानाची मूर्ती घेऊन आले.ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण होती.हातात गदा घेतलेली, दुसऱ्या हातावर द्रोणागिरी पर्वत उचललेली,भक्ताकडे, प्रेमपूर्वक नजरेने पाहणारी,पंचधातूची ही मूर्ती होती.रोज सकाळी बाबा ती मूर्ती पुढे ठेवून मंत्र पठण करीत असत.मंत्र पठण करताना एका सोन्याच्या भांडय़ात विभूती असे.ती मधूनमधून ते हातात घेत असत. ते पुढील मंत्र म्हणत असत.
ॐ हं हनुमत्ये नमो नमः
श्री हनुमत्ये नमो नमः
जय जय हनुमत्ये नमो नमः
श्री राम दुताय नमो नमः
सकाळी तीन तास त्यांचे मंत्रपठण चाले.संध्याकाळी पुढ्यात रामपंचायतन घेऊन ते बसत.हे राम पंचायतन त्यांच्या नेहमीच्या पूजेतील देव्हाऱ्यातील होते.यामध्ये राम,सीता, लक्ष्मण, भरत-शत्रुघ्न व श्री मारुतीराय होते.
श्रीराम पंचायतनापुढे ते रामरक्षा म्हणत असत.बहुधा दहा वेळा ते रामरक्षा म्हणत असावेत. कारण एक वेळ रामरक्षा व्यवस्थित म्हणण्यासाठी दहा ते बारा मिनिटे लागतात.दोन तास ते रामरक्षा म्हणत असत. नंतर ते श्रीराम जय राम जय जय राम हा जप करत.रामरक्षा म्हणताना व त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करताना त्यांच्यासमोरील सुवर्ण चषकामध्ये विभूती असे.त्यामध्ये ते हात फिरवीत असत.
अशाप्रकारे त्यांची तपश्चर्या एक महिना चालली होती.महिन्यानंतर स्नान करून, शुचिर्भूत होऊन, मारुतीरायांची ती पंचधातूची मूर्ती हातात घेऊन, ते पिंपळाकडे निघाले.ती मूर्ती त्यांनी पिंपळाच्या बुंध्याजवळ प्रस्थापित केली.मूर्तीची षोडशोपचारे पूजा केली.नंतर त्यांनी एक अभिमंत्रित धागा बरोबर आणला होता.जी विभूती ते हातामध्ये अधूनमधून घेत असत किंवा त्यात हात फिरवत असत ती विभूती पाण्यात कालवून त्यात तो दोरा भिजवलेला होता.त्याचे पिंपळाला वेढे देण्यास त्यांनी सुरुवात केली.तो धागा भरपूर लांब होता.त्याचे पंचवीस वेढे त्यांनी पिंपळाला घातले.
पंचवीस वेढे पूर्ण होत आहेत तोच एक गगनभेदी आरोळी त्या पिंपळावरून आली.एखाद्या चक्रीवादळात सापडल्यासारखा तो पिंपळ गदागदा हलू लागला. सभोवती वावटळ उठली. झाडाखाली पडलेली पाने त्या वावटळीत चक्राकार फिरून त्याचा एक स्तंभ दिसू लागला.पिंपळ कोसळतो की काय असे वाटू लागले.त्या प्लॉटमधील इतर झाडांपैकी कांही झाडे वावटळीमुळे पडतील की काय असे वाटत होते. इतकी ती हलत होती.थोड्याच वेळात सर्वकांही शांत झाले.सर्व गोष्टी पूर्ववत दिसू लागल्या .
पूर्ण समाधानाने बाबा आपल्या फ्लॅटकडे निघाले. त्यांच्याबरोबर घरातील सर्वच मंडळी गेली होती.तीही परत निघाली. बाबांची मंत्रसाधना त्या संकुलात राहणार्या इतरांनाही माहीत होती.पिंपळाखाली हनुमंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे हे सर्व संकुलात पसरले होते. संकुलातील इतर मंडळी आवर्जून हजर होती.मूर्ती प्रतिष्ठापनाच्या वेळेला होणार्या आरतीत सर्वांनी भाग घेतला होता.
तो विचित्र तरुण,तो चमत्कारिक लहान मुलगा, ती महाभयानक राक्षसीणीप्रमाणे दिसणारी स्त्री,तो विलक्षण म्हातारा, त्यानंतर कुणालाही केव्हांही दिसली नाहीत.बाबांच्या म्हणण्याप्रमाणे तो ब्रह्मसमंध पुढील गतीला गेला. कदाचित त्याने आपला डेरा दुसरीकडे कुठेतरी बसवला असावा.
सुधाने रात्री पडदे बाजूला केले.घाबरत घाबरत समोरच्या पिंपळाकडे पाहिले.तिथे कुणीही नव्हते.तरीही खिडक्या उघडण्याचा धीर तिला झाला नाही. त्या दिवशी रात्री ती अधूनमधून बंद खिडकीकडे पाहत होती. खिडकीच्या काचेवर आपले नाक लावून म्हातारा आपले डोळे खोलीत फिरवीत असेल की काय असा तिला संशय होता. सर्वत्र शांत शांत होते. समोर पिंपळ स्तब्ध उभा होता.पिंपळावर कुणीही नव्हते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री तिने खिडक्या उघडल्या.तीन चार महिन्यांनी प्रथमच शेतावरील गार वारा आंत शिरला. ताजी हवा फुप्फुसात भरून घेताना तिचा आनंद गगनात मावत नव्हता. सुधाच्या सैल पडलेल्या तणावमुक्त आनंदी चेहऱ्याकडे शाम कौतुकाने पाहात होता.
कित्येक महिन्यानी ती शामच्या कुशीत शिरली.आपण हा फ्लॅट विकत घेऊ या असे ती हळूच म्हणाली.
या गोष्टीला वीस वर्षे झाली आहेत.मुले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागली आहेत. बाबासाहेब आता या जगात नाहीत
*नियोजनाप्रमाणे कॉर्पोरेशनने त्या रिकाम्या प्लॉटचे एका सर्वांग परिपूर्ण बागेमध्ये रूपांतर केले आहे.*
*बागेत तो पिंपळ डौलात उभा आहे.तिथे मारुतीरायांचे एक छोटेसे मंदिर बांधले आहे.*
*नेमाने त्याची पूजा अर्चा केली जाते.शनिवारी दर्शनासाठी तेथे खूप गर्दी असते.*
*पिंपळावरील म्हातार्याची गोष्ट सर्वत्र पसरली आहे.*
*मोठी माणसे, लहान मुलांना तो पिंपळ, त्यावरील म्हातारा,मारोती राय,बाबासाहेब गणपुलेंची मारुतीवरील निष्ठा, म्हातारा पिंपळ सोडून कसा निघून गेला.त्यासाठी बाबासाहेबांनी काय केले.त्याची गोष्ट सांगतात.*
*बाबासाहेब व त्यांचा मारुती ही एक आख्यायिका बनून राहिली आहे.*
*हा मारुती, बाबा मारुती म्हणून ओळखला जातो.*
*बाबा मारुती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे.*
(समाप्त)
९/६/२०२२©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com