एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका खंडात केलेला साम्राज्यविस्तार जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. इ.स. १८७० पर्यंत इंग्लंडने केप कॅालनी, नाताळ, लागोस, गोल्ड कोस्ट, झांबिया, फ्रान्सने अल्जीरिया, फ्रेंच गिनी, आयव्हरी कोस्ट, तर पोर्तुगीजांनी मोझांबिक, अँगोला या किनारी प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेत वसाहत निर्माण करण्याचा पहिला मान बेल्जियमने पटकाविला. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डच्या प्रयत्नातून कांगो नदीच्या खोऱ्यात बेल्जियमचे राज्य निर्माण झाले. बेल्जियमनंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, इटली, पोर्तुगाल, हॅालंड या युरोपीय राष्ट्रांनी सुद्धा आफ्रिकेतील वेगवेगळ्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इंग्लंड
इंग्लंडने आफ्रिकेच्या नायजर नदीच्या खोऱ्यात आपल्या वसाहती स्थापन केल्या. तसेच केप कॅालनी, सुदान, युगांडा, ऱ्होडेशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, झांबिया, नायजेरिया इत्यादी प्रदेशावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तसेच सुवेझ कालव्याच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून इंग्लंडने इजिप्तचा ताबा घेतला.
डच
डचांनी केप कॅालनी, नाताल, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल या भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
फ्रान्स
फ्रान्सने सेनेगल नदीच्या वरच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली. त्यांनी सहारा वाळवंटाचा प्रदेश, अल्जीरिया, कांगो, मादागास्कर बेट तसेच मोरोक्को या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
जर्मनी
जर्मनीने नेर्ऋत्य आफ्रिका, कॅमेरून, पूर्व आफ्रिका या प्रदेशांवर आपल्या वसाहती स्थापन केल्या.
स्पेन
स्पेनने रिओ-डी-ओरो या प्रदेशावर तसेच मोरोक्कोच्या उत्तर भागावर व गिनीकोस्ट मधील काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
पोर्तुगीज
पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश, अंगोला प्रांत, मोझांबिक येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इटली
इतर युरोपीयन देशांप्रमाणेच इटली या देशाने सुद्धा आफ्रिकेचा काही प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इटलीने इरिट्रिया व सोमालिया तसेच त्रिपोली व सायरेनिका या प्रदेशांवर आपला ताबा मिळवला.
अशाप्रकारे इथियोपिया व लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपीयन राष्ट्रांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. युरोपीय राष्ट्रांनी या वसाहतींची सर्व दृष्टीने पिळवणूक केली त्यामुळे युरोपातील राष्ट्रे श्रीमंत बनली.