प्रबोधन चळवळीतून आकारास आलेल्या युरोपीय राष्ट्रांमध्ये साम्राज्यवादाची लालसा निर्माण झाली होती. १७व्या शतकापासून सुरू झालेल्या या साम्राज्यवादाला अनेक घटक कारणीभूत ठरले.


वैज्ञानिक शोध

जॅान के पासून राईट बंधूंपर्यंतच्या संशोधकांनी लावलेल्या अद्भुत शोधांमुळे मानवी जीवन गतिमान झाले. बाष्पशक्ती, विद्युतशक्ती, कोळसा, लोखंड यांच्या शोधांमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली. विज्ञानाने आधुनिक शस्त्रांचीही निर्मिती केली. विज्ञानामुळे मानवातील अतिमहत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढीस लागला.


औद्योगिक क्रांती

औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक साम्राज्यवादाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यंत्रामुळे उत्पादनाचा वेग वाढला. मालाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे तयार झालेल्या मालाची देशांतर्गत विक्री होणे अशक्य झाले. त्यातून नवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला. यातून साम्राज्यवाद वाढीस लागला.


कच्च्या मालाची आवश्यकता

औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. कच्चा माल कमी पडू लागला. युरोपीय राष्ट्रांमध्ये स्वत:चा माल विकण्याची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर आपला माल स्वस्त किंमतीत विकणे आवश्यक होते. त्याकरिता उत्पादनखर्च कमी करणे आणि कच्चा माल स्वस्त दरात मिळविणे या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. कच्चा माल मिळविण्याकरीता वसाहत हेच चांगले साधन होते. यासाठी युरोपीय राष्ट्रे अशिया व आफ्रिका खंडाकडे वळली.


आशिया व आफ्रिका खंडाची संपन्नता

आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रे नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न होती. सोने-चांदी, हिरे, लोखंड, कोळसा, या खनिज पदार्थांचे साठे आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात होते. आशिया खंडात मसाल्याच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात असल्यास तेथील खनिज संपत्ती आपल्या मालकीची होईल. त्यातून आपणास प्रचंड फायदा मिळवता येईल आणि आपला देश अधिक संपन्न होईल. या भूमिकेतून युरोपीय राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडाकडे वळाली.


युरोपातील नवोदित राष्ट्रे

एकोणिसाव्या शतकात जर्मनी आणि इटली यांचे एकीकरण होऊन ही नवीन राष्ट्रे उदयास आली. इंग्लंडसारख्या राष्ट्राचे प्रचंड साम्राज्य असावे व आपल्याकडे साध्या वसाहती नसाव्यात याची खंत नवोदित राष्ट्रांना वाटू लागली. ही राष्ट्रे वसाहती मिळवण्यासाठी प्रयत्नशील झाली. त्यांनी आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. जर्मनी, इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. युरोपात नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रांमुळे साम्राज्यवाद वाढीस लागला.


राजकीय वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा

वसाहती जिंकून घेणे आणि त्या दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणे यासाठी त्या वसाहतींचे संरक्षण करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी सागरातील व जमिनीवरील लष्करी ठाणी जिंकून घेण्याची स्पर्धा युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाली. आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढावी यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्यविस्तार करू लागली. एखाद्या देशाचे मोठेपण त्याच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवरून ठरू लागले. या साम्राज्यवादाच्या विकासातून युरोपीय राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपल्या रक्षणाची जय्यत तयारी करू लागले. त्यातून राष्ट्रांमध्ये वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढतच गेली.


धर्मप्रसार

ख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपीयांची इच्छा होती. त्यांचा धर्म व संस्कृती जगात सर्वांत श्रेष्ठ आहे अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती 'तराजू व बायबल' घेऊन. यातील तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्म प्रसाराचे प्रतीक होते. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोहोचले. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशनरीज स्थापन झाल्या. त्यातून साम्राज्यवाद वाढीस लागला.


आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा दुबळेपणा

ज्या काळात आधुनिक साम्राज्यवादाचा विकास होत होता त्या काळात आशिया व आफ्रिका ही खंडे विस्ताराने मोठी होती. परंतु मध्ययुगातील अनेक आक्रमणे, सरंजामशाही, शेती, व्यापार उद्योगाचा ऱ्हास यांमुळे राजकीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेली होती. धर्म, पंथ, भाषा यांच्यामध्ये समाज विभागला होता. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असलेल्या युरोपीय राष्ट्रांनी या दुबळेपणाचा फायदा साम्राज्यविस्तारातून घेतला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel