‘महारांना जवळ घेणे का पाप? आणि मडमांना मिठ्या मारणे म्हणजे वाटते पुण्य?’

‘तोंड सांभाळून बोल. थोबाड फोडीन. मडमांना मिठ्या मारीन आणि तुला लाथा मारीन. तू कोण बोलणार? पुन्हा ब्र तर काढ. आज चालती हो माहेरी. पैसे घेऊन ये. जावयाला दान दिले म्हणजे सर्व पाप जाते. बापाला सांग की, जावयाला दहा हजार रुपये देऊन प्रायश्चित्त घ्या. समजलीस? आज जा. तुझी सरोजा घेऊन जा. रिकाम्या हाताने येऊ नकोस.’

प्रेमा व सरोजा ह्यांना हाकून देण्यात आले. आगगाडीत मायलेकरे बसली होती. जवळ ना अंथरूण ना पांघरूण. आपला पदर सरोजावर तिने घातला होता. मांडीवर सरोजा होती. तिला थंडी लागू नये म्हणून माता जपत होती.

त्या बायकांच्या डब्यात एक मुसलमान बाई होती. तिने सरोजाच्या अंगावर घालायला चादर दिली. प्रेमाने कृतज्ञता प्रगट केली, तिला अत्यंत वाईट वाटत होते. बाबांकडून हजारो रुपये सासरी आणले. तरी शेवटी अशी स्थिती यावी का?

प्रेमा सरोजाला पोटाशी धरून शिवतर गावी आली. तो वाड्याला कुलूप.

‘बाबा कोठे आहेत?’ तिने एकाला विचारले.

‘महारवाड्यात विचार. तेथे ब्राह्मण राहतात. धर्मभ्रष्टांची वार्ता आम्हाला विचारू नको.’

प्रेमा रडत रडत महारवाड्यात आली. विठनाकाकडे आली. त्याने अंगणात बसायला घोंगडी घातली.

‘कोठे आहे आई? कोठे गेले बाबा?’ तिने विचारले.

‘आई वारल्या आणि रामराव अकस्मात् कोठे नाहीसे झाले. तुमची आई गेल्यापासून ते महारवाड्यात राहात होते. आमच्या हिने तुमच्या आईला शेवटचे कुंकू लावले. सनातनी कोणी आले नाहीत आणि पुढे घरदार सारे लिलावात गेले. दु:खाने कोठे तरी रामराव गेले असावेत. प्रेमाताई, तुम्ही सत्यनारायणाला जागा दिली नसतीत, तर असे हे झाले नसते. तुम्ही अधर्म केलात म्हणून हे वाईट दिवस आले.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel