प्रेमा सासरी गेली; परंतु सास-याच्या परी ब-या दिसत नव्हत्या. प्रेमाच्या पतीचे नाव श्रीधर. श्रीधर चैनी होता. उधळ्या होता. श्रीमंत बापाचा बेटा होता. तो रोज सतरांदा कपडे बदली. मोटारीतून हिंडे. सुखोपभोगासाठी जणू त्याचा जन्म होता.

प्रेमाचे सारे दागिने श्रीधरने काढून घेतले. ते दागिने त्याने का काढून घेतले? त्याला का भांडवल म्हणून हवे होते? काय होती जरुरी?

श्रीधरचे एक प्रेमपात्र होते. एका मडमिणीवर त्याचे प्रेम होते. तो रात्रंदिवस त्यामडमिणीकडे पडलेला असे. मुलाची अब्रू राखावी म्हणून आईबापांनी त्याचे लग्न करून दिले. लग्न करून वाटेल ते चाळे केले तरी हरकत नाही असे जणू श्रीधरच्या प्रतिष्ठित पित्याचे मत होते.

प्रेमाचे दागिने त्या मडमिणीकडे जात होते. तिच्या सा-या चैनी पुरविण्यासाठी त्या दागिन्यांचा उपयोग केला जात होता. श्रीधर कधी रिक्त हस्ताने आला, तर ती मडमिणी त्या खेटरे मारी, हाकलून लावी.

प्रेमाच्या लक्षात सारा प्रकार आला. काय करावे ते तिला समजेना. तिचे धैर्य आज कोठे गेले? परंतु ती बांधलेली होती. हिंदू कायद्याने बांधलेली होती. ती कोठे गेली असती, तर तिच्या मुसक्या बांधून कायद्याने तिला परत आणले असते.

ती पतीची कधी कानउघडणी करी. त्याला दोन शब्द सांगे. परंतु तो थोडेच ऐकणार? पुढे पुढे तो दारू पिऊन येऊ लागला. प्रेमाला मारहाण करू लागला. दुर्दैवी प्रेमा.

प्रेमाच्या अंगावर आता एकही दागिना उरला नव्हता.

‘तू माहेरी जा व काही घेऊन ये. बापाची एकुलती तर तू मुलगी. गडगंज इस्टेट असेल बापाजवळ. जा. माहेरी जा. नवीन दागदागिने घेऊन ये. अशीच आलीस तर लाथ मारून घालवीन. समजलीस?’ एके दिवशी श्रीधर म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel