सरोजाला घेऊन रामराव आपल्या जन्मग्रामी शिवतरला आले. ते हरिजनवस्तीत उतरले. गावातील वातावरण आता निवळले होते. महात्माजींच्या उपवासाने गावात क्रांती झाली होती.

रामराव आले आहेत असे कळताच पूर्वीची सनातनी मंडळी त्यांच्याकडे गेली. त्यांना त्यांनी गावात नेले. गावच्या मंदिरात त्यांनी प्रवचन केले. ते ऐकून लोकांना आनंद झाला. सरोजाने सुंदर अभंग व गाणी म्हटली. ‘किती गोड गळा आणि दिसतो तरी किती गोड!’ असे बायका म्हणाल्या.

आणि सरोजाला ती लाखो रुपयांची इस्टेट मिळाल्याचेही समजले. लोकांना आश्चर्य वाटले. रामराव आज श्रीमंत होते. त्यांचा वाडा त्यांना परत द्यायला सावकार तयार होता. रामरावांनी पैसे दिले व वाडा घेतला. सरोजा व रामराव पुन्हा वाड्यात आली. हरिजन बंधू आले. त्यांनी वाडा झाडला. स्वच्छ केला. ‘ह्या वाड्यात आपण धर्मार्थ दवाखाना घालू,’ असे रामराव म्हणाले. ‘प्रेमाची लहानपणीची इच्छा पूर्ण होईल.’

गावकरी म्हणाले, ‘तुम्ही अस्पृश्यांना जागा दिलीत ते देवाला आवडले. महात्माजींसारख्यांनी आज ते अंगावर घेतले. देवाचे काम करणा-यावर आज ना उद्या लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कशी राहील? आपल्याच भावांना जो दूर लोटतो, तो भाग्याला दूर लोटतो, स्वातंत्र्याला दूर लोटतो. आता आमचे डोळे उघडले. तुम्ही आमचे गुरू आणि महात्माजी तर जगद्गुरू.’

सरोजासह रामराव मुंबईस आले. श्रीधर व प्रेमा आता सुटून आली. आनंदी आनंद झाला. दु:खानंतरच्या सुखाला एक अपूर्व गोडी असते. श्रीधरला त्या जुन्या आठवणी येतात. परंतु प्रेमा एकदम म्हणते, ‘नका हो जुने काढू.’

एकदा सर्व मंडळी पुन्हा शिवतरला आली. विठनाकाला दहा रुपयांचे शंभर रुपये प्रेमाने दिले. शिवतरच्या त्या वाड्यात धर्मार्थ दवाखाना आता सुरू झाला. त्या दवाखान्याला आत्याचे नाव दिले गेले. आपल्या बहिणीवर आपण कायमचा राग कसा केला याचे रामरावांना पुष्कळ वेळा वाईट वाटते; परंतु मनुष्य कितीही चांगला असला तरी तोही एखादे वेळेस चुकतो. घसरतो आणि यातच मौज आहे. या जगात गर्व कोणालाच नको. निर्दोष एक परमेश्वर आहे. आपण सारी धडपडणारी त्याची मुले!

आत्याच्या प्रेमळ आठवणी प्रेमा सांगते. आफ्रिकेतील सांगते.

‘आपण जाऊ आफ्रिकेत वाघ, सिंह, हत्ती बघायला.’ सरोजा म्हणते.

‘आफ्रिकेत कशाला? सर्कशीत येथेच पाहू.’ श्रीधर तिला जवळ घेऊन म्हणतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel