‘ही बघ लहानशी चुनाडी. काशीहून मी आणली. म्हटले, सरोजा कोठेतरी भेटेलच. नेस. का नेसवू? का तुला झंपर हवा? तसेसुद्धा मी ठेवले आहेत. का घेऊन येऊ नवीन कपडे? तू येथे थांब मी घेऊन येते हां. थांब. तुला लाडू देते. खाऊ देते. तू खात बस. मी मोटार घेऊन जाते व पटकन कपडे घेऊन येते.’ प्रेमाने तिला खायला दिले.

‘सरोजा, जाऊ नको हो. तुला मग मोटारीत घालून मी घरी पोचवीन. तुझ्या बाबांनाच आपण घेऊन येऊ. आपण येथेच राहू, हा बंगला छान आहे, नाही?’

‘परंतु येथे फुलांची बाग नाही. मी रोज लहानशा झारीने पाणी घालते. बाबा घालतात. आम्ही गाणी म्हणतो. मजा. तेथे कितीतरी मुले खेळायला असतात. बाबा गोष्टी सांगतात. येथे तर तुम्ही एकट्या. मी नाही येथे राहणार!’

‘परंतु मी येईपर्यंत तरी थांबशील ना?’

‘पण नवीन कपड्यात बाबा मला ओळखणार नाहीत. बाबा म्हणतील, ही माझी नव्हे बेबी सरोजा. मग?’

‘मग माझ्याकडे ये, माझ्याकडे राहा.’

‘येथे बाबा नसतील मला रडू येईल.’

‘तुझी आई कोठे आहे?’

‘बाबा मला जेवायला वाढतात. मला निजवतात. मी जाते.’

‘थांब. नवीन कपडे घालून जा. मी पटकन येते.’

प्रेमा मोटारीत बसून गेली. ती सरोजा दवाखान्यात होती. नोकर होते; परंतु एकदम नजर चुकवून ती पळून गेली. कोठे गेली?

मोटार पों पों करीत आली. प्रेमा नवीन कपडे घेऊन आली. ती धावतच वर आली; परंतु सरोजा कोठे आहे?

‘सरोजा!’ तिने हाक मारली.

तिने वर गच्चीत पाहिले. कोठे नाही. सरोजा! सरोजा! ती हाका मारीत होती. तिने गॅलरीतून हाका मारल्या. लोकांनी वर पाहिले; परंतु सरोजा कोठे आहे?

‘तुम्ही तिला अडवून का ठेवले नाही?’ ती नोकरांस म्हणाली.

‘लोकांच्या मुलीला आम्ही कसे अडवू?’

‘अरे ती लोकांची नव्हती. ती माझी होती. माझी हरवलेली बेबी सरोजा. तीच ती. आता कोठे शोधू? जा बघा इकडे तिकडे.’

मोटारीत कपडे घालून ती पुन्हा बाहेर पडली. कोठे सरोजा दिसते का ती पाहात होती; परंतु सरोजा दिसली नाही. प्रेमा घरी आली. पलंगावर ती रडत बसली; परंतु तिने अश्रू पुसले. सरोजा आहे एवढे तर कळले. आज दृष्टीसही पडली. देवाची दया. आज क्षणभर माझ्याकडे आली. थोड्या दिवसांनी कायमची येईल. बाबाही आहेत. तिची काळजी घेत आहेत. द्यावी का जाहिरात? तिच्या नावाने इस्टेट ठेवून वकिलांच्या मार्फत द्यावी का नोटीस? बाबा तो वाचतील. त्यांना पैसे मिळतील. बेबीला मग काही कमी पडणार नाही. करू का असे? का पती येईल? त्यालाही पत्ता लागेल? नवीन भानगडी उपस्थित होतील? काय करावे, तिला समजेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel