‘बरे हो.’ ते म्हणाले.
सगुणाबाईंनी भरपूर प्रसाद केला. दिवाणखान्यात पूजा सुरू झाली. येसनाक पाटावर बसला होता. रामराव पूजा सांगत होते. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. महारवाड्यातील स्त्रीपुरुष, मुले सारी मंडळी आली होती. अपूर्व प्रसंग! सर्वांची तोंडे फुलली होती.
आणि खरोखरच प्रेमाने पोथी वाचली. भक्तीप्रेमाने तिने वाचली, भक्तीप्रेमाने सर्वांनी ऐकली. आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. सगुणाबाईंनी सर्व बायकांना हळदीकुंकू दिले.
बाहेर पाऊस सुरू झाला. धो धो पडत होता; परंतु आत मंगल भजन चालले होते. प्रेमा पेटी वाजवत होती. भजनात सारी मंडळी रंगली होती. रामरावांनीही दोन अभंग म्हटले.
मध्यरात्री सर्वांना कॉफी देण्यात आली. नंतर पुन्हा भजनाचा गजर सुरू झाला. पहाटेपर्यंत भजनानंद चालला होता. आता पाऊस थांबला होता. आकाश निरभ्र झाले होते. सारी अस्पृश्य मंडळी परत गेली. रामरावांना धन्यवाद देत गेली.
येसनाक परत पलटणीत गेला; परंतु इकडे महारांवरसनातनी मंडळींनी बहिष्कार पुकारला. रामरावांवरही बहिष्कार. महारांस कोणी शेत मक्त्याने देईना. त्यांची मोळी कोणी विकत घेईना. त्यांना कामाला कोणी बोलवीना. दुकानदार माल देत ना. जीवनाची कोंडी झाली. उपासमार सुरू झाली. सनातनी मंडळींच्या हाती सा-या आर्थिक नाड्या. त्यांनी त्या आवळल्या. शेवटी महार शरण गेले. त्यांनी माफीपत्र लिहून दिले. तेव्हा त्यांच्यावरचा बहिष्कार उठवण्यात आला.
परंतु रामराव शरण येत ना. ते आर्थिक दृष्ट्या तितके पंगू नव्हते. त्यांना गडी माणूस मिळेना. त्यांचे शेतकाम कोणी करेना. तरीही ते टिकाव धरून राहिले. ‘तुम्हाला गावातून जायला भाग पाडू, तरच आम्ही खरे धार्मिक.’ असे सनातनी धमकीने सांगत.