‘विठू, पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांनी का पाप केले होते? सुख येवो वा दु:ख येवो, जे आपल्याला सत्य वाटते, न्याय्य वाटते, ते करीत राहावे. शेवटी मनाचे समाधान हेच खरे फळ.’

‘सरोजाला थोडे दूध पाजा. मी देतो आणून.’ विठूने कोठून तरी दूध आणले. प्रेमाने ते मुलीला दिले. सरोजा तेथे झोपली. प्रेमा नदीवर स्नान करायला गेली. तिला राहून राहून आईची आठवण येत होती. बाबांची येत होती. तिच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहात होत्या. माझ्यामुळे बाबांना वनवास. देऊ का मी जीव? तो तिकडे सोनडोह आहे. घेऊ का त्यात उडी? परंतु माझी सरोजा आहे. तिला कोण? प्रेमा पाण्यातून बाहेर आली. पुन्हा विठूकडे आली. ती आज विठूकडेच जेवली. भागीने भातभाजी केली होती.

‘विठू मला दहा रुपये गोळा करून द्या. मी कोठे तरी मुंबई-मद्रासकडे जाते. मी शिकेन, मुलीला वाढवीन. पुढे तुझे रुपये परत करीन,. तुझ्याजवळ मागायला संकोच वाटतो. तुम्ही गरीब; परंतु तुम्हीच आता मला आधार.’

‘येश्याची काल पलटणीतून मनीऑर्डर आली आहे. पैसे तसेच आहेत. ते घ्या तुम्ही. आमचे होईल कसे तरी. तुम्ही शिका. सुखी व्हा.

प्रेमा दहा रुपये घेऊन निघाली. बरोबर सरोजा होती. कोठे जाणार आता ती? सारे शून्य होते. कोठे शहरात ओळख ना देख. तिची एक आत्या आफ्रिकेत होती; परंतु किती तरी वर्षांत तिचा पत्ता नव्हता. कोठे जाणार? ती दमली. वाटेत एका झाडाखाली बसली. माडीवर सरोजा होती. सरोजा एकदम रडू लागली. ती तिला उगी करीत होती; परंतु सरोजाचे रडे थांबेना. एक वाटसरू खोकत जात होता. त्याने खिशातून खडीसाखरेचा एक खडा काढून दिला. सरोजा उगी राहिली. वाटसरू निघून गेला. तो का देव होता?

प्रेमा आशेने उठली. आता तिला माहेर नव्हते, सासर नव्हते. सासरी जाण्याची सोय नव्हती. ती तशी रिकाम्या हाताने गेली असती, तर श्रीधरने मारहाण करून पुन्हा तिला हाकलले असते. नको आता सासर. नको. नरकयातना भोगल्या तेवढ्या पुरेत असा विचार करीत ती जात होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel