राहुल द्रविड ने जबरदस्त खेळी खेळावी आणि त्याच वेळी लक्ष्मण ने त्यापेक्षा मोठी खेळी खेळून सामनावीर पुरस्कार प्राप्त करावा असे काही सामना चित्रपटाच्या बाबतीत झाले. श्रीराम लागुनी ह्या चित्रपटांत एक निनावी माणसाची अविस्मरणीय अशी व्यक्ती रेखा रेखाटली पण त्याच वेळी हिंदुराव ची नकारात्मक व्यक्तीरेखा निळू फुले ह्यांनी काही अश्या प्रकारे वठवली कि आज सुद्धा मराठी चित्रपटाच्या इतिहासांत ती कदाचित सर्वांत चांगली असावी.
भीमसेन जोशी - बालमुरली ह्याची जुगलबंदी असावी अश्या प्रकारची जुगलबंदी लागू आणि निळू फुले ह्यांच्यात होती. विजय तेंडूलकर आणि जब्बार पटेल ह्या दोघा दिग्गजांनी लेखन आणि दिग्दर्शनात अव्वल कामगिरी केली होती त्याचा फायदा सुद्धा फुले ह्यांना झाला. त्याच्या नंतर फुले ह्यांना विशेषतः नकारात्मक भूमिका मिळत गेल्या. असे सांगितले जाते कि एकदा फुले आपल्या एका स्नेह्याच्या लग्न सामाराभांत गावात गेले होते. तिथे फुले ह्यांना पाहतांच तिथल्या महिला वर्गांत एकच गोंधळ उडाला. फुले हे तिथून गेल्या शिवाय लाग होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. फुले ह्यांनी उदार मानाने तेथून काढता पाय घेतला. रुपेरी पडद्यावर खलनायक असणारा हा माणूस प्रत्यक्ष जीवनात मात्र एकदम साधा सरळ आणि अजातशत्रू माणूस होता.