पुन्हां तुरुंग
गांधीजी शिष्टाई विफल होऊन परत आले. ते मुंबईला उतरले. नवे व्हाइसरॉय विलिंग्डन यांना त्यांनीं भेटीची मागणी करणार्या तारा केल्या. नकार आला. जवाहरलालांना आधींच अटक झाली होती. महात्माजींनाहि अटक झाली. देशभर वणवा भडकला. माता स्वरूपराणी २६ जानेवारी १९३१ च्या स्वातंत्र्यदिनाच्या विराट सभेच्या अध्यक्ष झाल्या. लाठीमार झाला. सार्जंट हाणीत सुटले. नेहरूंच्या आईच्या डोक्यावर लाठी बसली. तुरुंगांत ती वार्ता ऐकून जवाहरलाल बेचैन झाले. म्हणाले : “मी बाहेर असतों तर माझी अहिंसा कसोटीस लागली असती.” १९२८ मध्यें सायमन कमिशनवरच्या बहिष्काराच्या वेळेस लखनौला जवाहरलालांनीं डोक्यावर घाव घेतले होते. परंतु हा आईवर प्रहार होता. सारें नेहरू कुटुंब अग्निपरीक्षेंतून जात होते.
कमला
कमला आजारी होती. आई काळजी घेत होती. पुढें चळवळ ओसरली. हरिजनांसाठीं महात्माजींचे उपवास झाले. जवाहर सुटला. कमलेजवळ थोडा वेळ बसून ते तडक बिहारमध्यें गेले. तेथें न भूतो न भविष्यति भूकंप झालेला. स्वयंसेवकांना काय करावें कळेना. नेहरू आले नि कुदळफावडे घेऊन ढिगारे खणूं लागले, प्रेतें बाहेर काढूं लागले. दहा दिवस त्यांनीं अपार श्रम केले. दहा दिवसांनीं ते अलाहाबादला आले नि बारा तास झोंपले. जाग आली का, कमला हळूच येऊन पाही. बारा तासांनंतर जाग आली. म्हणाले : “किती झोंपलों !” कमलाबरोबर, आईबरोबर बोलत चहा घेत होते. तों कलकत्त्याला केलेल्या भाषणाबद्दल वॉरंट आलें. पुन्हां खटला, शिक्षा नि तुरुंग. तुरुंग त्यांचें घरच झालें होतें. एका पत्रांत लिहितात : “येथें मनाची शान्ति आहे, विश्रांति आहे. वाचीन, मनन करीन, अधिक शहाणा होऊन बाहेर येईन.”
दुसर्या एका पत्रांत लिहितात : “डेहराडूनचा हा तुरुंग. बर्फाच्छादित शिखरें दिसत आहेत. मेघांनीं गाशा गुंडाळला आहे. निळें निळें गंभीर आकाश दिसत आहे. हें निळें आकाश किती आश्चर्यकारक, कसें वेड लावणारें ! हें निळें आकाश दिसावें म्हणून का अभ्रें गेलीं ?.... आतां सायंकाळ झाली आहे. सूर्याचे किरण पकडून लहान-मोठे ढग त्यांना चौफेर फेकीत आहेत. अनंत आकृति, क्षणांत बदलणार्या आणि रंगांची धिंगामस्ती. कांहीं वेळानें चन्द्रहि आला. जवळजवळ पूर्ण चन्द्र. विविधतेंत आणखी भर.”
ग्रन्थवाचनांत रमणारा, सृष्टीचें वेड असलेला, त्याला तुरुंग का कंटाळवाणा वाटेल ? परंतु प्रियजन दूर असतात. प्रत्यक्ष कार्य करतां येत नाहीं. हेंच शल्य असतें. जवाहरलालांनीं इंदिरेला विश्वेतिहासावर पत्रें लिहिलीं. तीं आतां प्रसिद्ध झालीं आहेत. जणुं इंदिरेचें निमित्त करून भारतीय मुलांसाठीं लिहीत होते. पुढें आत्मचरित्र लिहायला घेतले. इकडे कमला अधिकच खंगत चालली. मधून तिला भेटायला ते येत. चार दिवस संपतांच पुन्हां तुरुंगांत जात. कमलेला शेवटीं युरोपांत पाठवायचें ठरलें. तिला भेटायला तुरुंगांतून ते दोन दिवस घरीं आले. तिला निरोप देऊन जड मनानें ते पुन्हां तुरुंगांत गेले.