कमलेची प्रकृति तिकडे सुधारेना. जवाहरलालांची सुटका करण्यांत आली. विमानानें ते युरोपांत गेले. स्वित्झर्लंडमधें लॉसने येथें ती होती. जवाहर तिच्याजवळ बसायचे, बोलायचे, वाचून दाखवायचे, फुलें आणून द्यायचे. पत्नीचा आत्मा त्यांना या वेळेस समजला. परंतु १८ फेब्रुवारी १९३६ या दिवशीं कमला कायमची देहरूपानें तरी गेली. विमानानें शून्य मनानें ते भारताकडे येत होते. वाटेंत बसर्याहून इंग्लंड मधील प्रकाशकांना त्यांनीं “नसलेल्या कमलेला” ही आत्मचरित्राला अर्पणपत्रिका पाठवली. त्या दोन शब्दांत सारें विश्व होतें. इंदिरेचें १९३८ मध्यें फेरोज गांधींजवळ लग्न लागलें. त्या वेळेस कन्यादान करतांना पंडितजींनी एक रिकामा पाट कमलेसाठीं शेजारीं मांडला होता. थोरांचीं थोर मनें.
कर्मवीरांना रडायला वेळ नसतो. जीवन पुढें जात असतें. १९३६ च्या वादळी उन्हाळ्यांत लखनौ काँग्रेसला नेहरूंनाच अध्यक्ष करण्यांत आले. फैजपूरच्या ग्रामीण अधिवेशनाला तेच अध्यक्ष. हजारों शेतकरी मायबहिणी दुतर्फा पाहून मिरवणुकीच्या रथांतून खालीं उतरून नमस्कार करीत पायीं जाऊं लागले. झेंड्याची दोरी तुटली तेव्हां ती वर पुन्हां नेणार्या खानदेशच्या इंद्रसिंगला हृदयाशीं धरून त्यांनीं शंभर रुपये दिले.
मंत्रिमंडळ
पुढें देशभर निवडणुका होत्या. नेहरू देशभर हिंडले. विमान, मोटारी, बैलगाड्या, उंट, घोडे, सारीं वाहनें त्यांनीं वापरलीं. पायींहि चालले. एकदां रानांत मोटारचें पाणी संपलें तर रात्रीं पाणी बघत हिंडले. निवडणुकांत यश मिळालें. मंत्रिमंडळें घ्यायचीं कीं नाहीं यावर वर्ध्यास खडाजंगी झाली. जवाहरलाल अति संतापले. जमनालालजींनीं त्यांना मोटारींतून हिंडवून शांत करून आणलें. मंत्र्यांची राजवट सुरू झाली. जवाहरलालांना त्यांत फारसा रस नव्हता.
आई नि मावशी गेल्या
दोघां बहिणींचीं मध्यंतरीं लग्नें झालीं होतीं. स्वरूपचें तर वडील असतांनाच अपूर्व थाटानें रणजित पंडित यांच्याशीं झालें होतें. कृष्णाचें वडलांच्या मरणानंतर राजा हाथिसिंग यांच्याशीं झालें होतें. इंदिरेचें ठरल्यासारखें होतें. तें पुढें झालें. परंतु मध्यंतरीं १९३८ मध्यें आई एकाएकीं सोडून गेली. रात्रीं मुलांजवळ माता बोलत होती. तों वाताचा झटका आला तोच अखेरचा. आणि आई मरून २४ तास झाले नाहींत तोच या लहान बहिणीचा संसार थाटण्यासाठीं आलेली बिबिअम्मा तिचाहि प्राण निघून गेला. जणूं बहीण हेंच तिचें जीवन होतें !
प्रवास करून आले
नेहरू प्रवासाला निघाले. मध्यंतरीं ब्रम्हदेश, जावा इकडे ते जाऊन आलेच होते. आतां पुन्हां युरोपांत गेले. जणूं काँग्रेसचे प्रतिनिधि म्हणून सर्वत्र बोलले. म्हणाले : “हिंदूस्थानांत ब्रिटिश राजवटींत आम्ही फॅसिझम रोज अनुभवीत आहोंत.” स्पेनमधील यादवी युद्धांतील विमानहल्लेहि अनुभवून आले. चेकोस्लोव्हाकियांतील स्कोडा वगैरे कारखाने बघते झाले. स्वदेशीं परतले व चीनकडे गेले तों दुसरे महायुद्ध भडकलें.