विचारमग्न लिंकन
परंतु लिंकन विचारात असे. कशाचे विचार? महत्त्वाकांक्षा का डोकावे? अमेरिकेचे अध्यक्ष होणे? पत्नी त्याला प्रेरणा देई. एकदा लहान मुलाला हातगाडीत घालून तो नेत होता. मूल मागे पडून रडत होते. तरी रिकामी गाडी विचारमग्न लिंकन ओढीतच होता. ते विचार मानवजातीच्या उद्धाराचे होते, गुलामगिरी दूर करण्याचे होते की, इतिहासात अजरामर होण्याचे होते? हळूहळू तो राजकारणात अधिकाधिक शिरला. १८५४ मध्ये जेफरसनने लोकशाही समतेचा पुरस्कार करणारा रिपब्लिकन पक्ष काढला. लिंकन त्या पक्षाचा महान संघटक बनला आणि १८६० मधील ती ऐतिहासिक निवडणूक आली. अध्यक्षपदासाठी चार उमेदवार होते. परंतु खरी झुंज डग्लस व लिंकन यांच्यामध्येच होती. अमेरिकाभर त्यांचे दौरे घुमले. त्या दोघांच्या दोन तिखट जिभा सारे वातावरण विद्युन्मय करीत होत्या. परंतु लिंकनच्या शब्दांत सारे हृदय होते. तो म्हणाला, “माझे भरलेले हृदय मी ओतीत आहे.” लिंकन निवडून आला तर आम्ही फुटू, असे दक्षिणेकडील संस्थाने म्हणू लागली. कारण ‘मी गुलामगिरी रद्द करीन’ असे तो म्हणे. लिंकन निवडून आला. अध्यक्षपदावर बसायला अजून अवधी होता. अजून बुचॅननच अध्यक्ष होते, तो दक्षिण कॅरोलिनाने फुटल्याचे जाहीर केले. १८३३ मध्ये जॅक्सनचे याच फुटीर वृत्तीच्या संस्थानाला ताबडतोब लष्कर पाठवून ऐक्य शिकविले होते. बुचॅनन यांनी तसेच केले असते, तर फुटीर वृत्ती वाढती ना, यादवी युद्ध होते ना. परंतु बुचॅनन म्हणाला, “संयुक्त अमेरिकेचा मी शेवटचा अध्यक्ष.” त्याने या मध्येतरीच्या दोन-अडीच महिन्यांत उत्तरेकडचा दारूगोळा दक्षिणेकडे जाऊ दिला. लिंकनने अध्यक्षपद हाती घेतले, तोवर सहा संस्थाने फुटली. माजी अध्यक्षाने नवीन अध्यक्षाला यादवी युद्धाची भेट दिली.
यादवी युद्ध
उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या संस्थानांचे यादवी युद्ध सुरू झाले. लिंकन म्हणाला, “गुलामगिरीचा प्रश्न दूर राहो वाटलं तर; परंतु फुटून तर नाहीच निघता येणार. मी सा-या अमेरिकेला एकत्र ठेवू इच्छितो. गुलामगिरीचा रोग नष्ट केल्यानेच अमेरिकेचे कल्याण होईल; म्हणून मी तो दूर करू पाहत आहे.” उत्तरेकडील नागरिकांनीही बंडाळी सुरू केली. लिंकनच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही त्याला वाटेल ते बोलत. एकदा लिंकन सेनापतीला भेटायला गेला. सेनापती बाहेर गेला होता. लिंकन बसून राहिला. सेनापती आल्यावर आपल्या खोलीत गेला. लिंकनने निरोप धाडला. “आता मी झोपतो” उत्तर आले. लिंकन म्हणाला, “त्याच्या घोड्याचा लगामही मी धरीन; फक्त त्याने जय मिळवून द्यावा.”