आपण पृथ्वीवर आनंद आणू असे त्याला वाटे. तो लिहितो: “विजय, सर्वांचा विजय! मुला, सर्व वस्तुजात पाहण्याची तुला उपजतच दृष्टी आहे. जीवनातील आनंदाची तुला जाणीव होईल. मानवी कृतीतील उदात्तता बघशील. मानवाच्या आशा आकांक्षा तुला समजतील. देव व मानव यांच्यामध्ये जा-ये करणा-या देवता तुला वर नेतील आणि त्या साहित्य-सोनियाच्या पर्वतांवरील सुखगंगा तू पृथ्वीवर आणशील!”
प्रेमाच्या उत्कटतेचे गटेनेच वर्णन करावे! तो लिहितो, “तुझ्या वक्ष:स्थलावर डोके ठेवून असताना हजारो वर्षे क्षणासारखी भासतील. दिवसाचा मला तिटकारा वाटतो. तुझ्या वक्ष:स्थलावर विसावा! दुसरे काही नको. प्रेममग्न होऊन मला पडून राहू दे. त्या एका क्षणात अनंत युगे, अनंत जगे मी अनुभवतो. विश्वाला जणू स्पष्ट करतो.”
तो एक सतचा पुजारी
उपनिषदांतील सर्वव्यापी चैतन्याचा तो पुजारी होता. तो म्हणतो, “त्याला आनंद म्हणा, हृदय म्हणा, ईश्वर म्हणा, मी त्याला नाव नाही देऊ इच्छीत.” अन्यत्र म्हणतो, “ते एक अजर अमर तत्त्व या अनंत वस्तुजातातून प्रकट होत आहे. लहान वस्तू महान आहे, महान लहान आहे. प्रत्येक वस्तूला वैशिष्ट्य आहे. ती बदलत आहे. जवळ आणि दूर, दूर आणि जवळ बनत आहे, उत्क्रांत होत आहे. या सर्व विराट उत्क्रांतीकडे मी गंभीर, पूज्य भावाने बघत आहे.” सृष्टीतील भव्यता पाहून आपण मूक होतो. हिमालय, सागर, घनदाट वने, इरावतीसारखा धबधबा, अनंत तारे, हे सारे पाहून आपण अवाक् होतो. हृदयात पूज्यभाव वाढतो. गटे म्हणायचा, “सृष्टीतील, जीवनातील उदात्त दर्शनाने जर तुमचे हृदय भक्तिभावाने विनम्र झाले तर तुम्हांला सारे काही मिळाले!”
सदसतापलीकडे
कधी कधी सत्-असत् या कल्पना त्याला अपु-या वाटत. एकदा कोणी त्याला विचारले, “सदसदविवेकबुद्धीचे काय?” तेव्हा तो म्हणाला. “ती का महत्त्वाची वस्तू आहे? कोण तिची मागणी करतो आहे तुमच्याजवळ? निसर्गात चांगले आहे, वाईट आहे. परंतु निवडानिवड न करता निसर्ग आपण सामग्-याने घेतो.” सदसताच्या पलीकडे जायला हवे असे का गटेचे म्हणणे? ‘भद्रं तद् विश्वं यदवदन्ति देवा:’ – चांगले आहे जग, उगीच सारखी कुरबूर नको. हे वाईट. जगात भरपूर चांगले आहे, अपार आनंदही आहे. ते समजून घेऊन निकोप वृत्तीचे बनणे हे का ध्येय गटे शिकवू बघतो?
अमरतेवर विश्वास
अमरतेवर त्याची श्रद्धा होती. म्हणून मृत्यूचे त्याला भय नसे. मृत्यू त्याला मित्र वाटे. तो म्हणतो, “ मरण येणे किती सुंदर गोष्ट! मर्त्यपणाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी, न्हाऊन-माखून पुन्हा परत येणे किती छान!”