“विश्वाचे कोडे सुटणे कठीण. समजेल तेवढे समजून घ्या आणि हे जग सुखी करा.” हा गटेचा संदेश. मरणाआधी दोन-चार दिवस एक तरुण आला. ‘संदेश द्या’ म्हणाला. त्या आसन्नमरण कवीने लिहिले :
“जो तो आपले काम करील
तर सारा गाव स्वच्छ राहील,
बोलल्याप्रमाणे वागतील
तर सारे तरून जातील.”
कर्माचा उपासक
गटे कवी होता. परंतु काव्याच्या समाधीत राहणे, कर्मशून्य राहणे त्याला आवडत नसे. एकदा एका जर्मन गृहस्थाने अधिका-याला न्यायासनासमोर खेचले. गटेला आनंद झाला. “छान काम केलेत. शेकडो पुस्तके लिहिण्यापेक्षा असे एक काम महत्त्वाचे आहे.” केवळ तत्त्वज्ञानात, अमूर्त विचारांत, त्याला गोडी नव्हती. तो व्यक्तीचा उपासक होता. व्यक्तातून अव्यक्त तो अनुभवी. तो म्हणतो, “जे प्रत्यक्ष आहे, त्यातूनच विचार नाही का मिळत? निराळी तत्त्वज्ञाने कशाला? या प्रत्यक्षाच्या पाठीमागे काय आहे, ते शोधण्यासाठी काय जरूर? या अनंत घडामोडी, हे विश्व म्हणजेच महान वस्तुपाठ आहे.’
दु:खातून पुढे जाणारा
तो अनेकदा प्रेमपाशात सापडला. अनेकांशी मैत्रीचे, स्नेहाचे संबंध आले. प्रेमे भंगली. मैत्री तुटल्या. परंतु दु:ख गिळून तो पुढे जातो. तरुणपणात एकदा तो घोड्यावरून भटकायला गेला. तो लिहितो : “हिंडता हिंडता रात्र झाली, तरीही मी घोड्यावर होतो. मी उभा राहिलो. समोर दरीतून रुपेरी नदी वाहत होती. पाठीशी डोंगरावरील जंगल होते. माझे हृदय शांतीने भरून आले होते. मोकळे हृदय म्हणजे महान आनंद. आपल्यातील पाणीदार प्रेरणा आपणास अशक्य अशा गोष्टींकडे, साहसांकडे जायला लावते. महान प्रयत्नांशिवाय महान आनंद नाही. प्रेमाच्या बाबातीत हेच तर माझे भांडण. प्रेम धैर्य देते यावर माझा विश्वास नाही. हृदय मृदू झाले म्हणजे दुबळे होते. प्रेमने हृदय भावनोत्कटपणे उडू लागते. कंठ भरून येतो. अवर्णनीय स्थिती! तो का दुबळेपणा असतो? फुलांचे साधे हाकही आपणास बांधू शकतात!”