फ्लोरीडाचा पूर्व किनारा, बर्म्युडा बेटांचा दक्षिण किनारा आणि प्युर्टो रिकोचा उत्तर किनारा यांतील प्रदेश हा पृथ्वीवरील अतिशय गूढ असा प्रदेश आहे. हा प्रदेश त्रिकोणी आकाराचा आहे, लंबवर्तुळाकार आहे अथवा ट्रॅपिझियमच्या आकाराचा असेल, परंतु त्यातील गूढपणा त्यामुळे रतिभरही कमी होत नाही. पार क्रिस्तोफर कोलंबसच्या काळापासून हा प्रदेश वेगळाच आहे असं मानवाच्या ध्यानात आलेलं आहे. या प्रदेशात अनेक जहाजं, विमानं आणि माणसं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनीय रितीने गायब झालेली आहेत.
बर्म्युडा ट्रँगल!
अटलांटीक महासागराचा हा भाग याच कुप्रसिध्द नावाने ओळखला जातो. या भागात अनेक बंदरं अशी आहेत जिथून निघालेली जहाजं कधीही कोणत्याही बंदराला लागत नाहीत. अनेक विमानतळ असे आहेत जिथून टेक-ऑफ घेतलेली विमानं कोणत्याच विमानतळावर उतरत नाहीत. गेल्या दीडशे वर्षांत शेकडो जहाजं आणि विमानं यांचा इथे बळी गेलेला आहे. यू.एस्. एस्. सायक्लॉप्स, मरीन सल्फर क्वीन ही जहाजं तसेच फ्लाईट-१९ ही नौदलाची विमानमोहीम ही ठळक उदाहरणं. या विमानं आणि जहाजांच्या आणि त्यातील माणसांच्या गायब होण्याचं कोणतंही तर्कसंगत अथवा शास्त्रीय स्पष्टीकरण कधीही मिळालेलं नाही.
अनेकदा एखादं जहाज नाहीसं झालेलं त्वरित लक्षात येत नाही. पूर्वी दळण-वळण आणि संदेशयंत्रणा सक्षम नसल्याने तर अनेकदा कित्येक महिन्यांनी जहाज गायब झाल्याची बातमी मिळत असे. आता काळाच्या ओघात ही परिस्थिती बदलली आहे आणि आधुनिक साधनांच्या सहाय्याने आणि रेडीओ / सॅटेलाईट फोनच्या सहाय्याने अवघ्या काही सेकंदात संदेश मिळणं शक्यं झालं आहे.
परंतु असा संदेश मिळाल्यानंतर आणि काही मिनीटांत तातडीने मदत पोहोचल्यावरही जर एखाद्या जहाजाचा पत्ता लागला नाही तर ?
डॅन बराक हा फ्लोरीडातील मियामी इथला रहिवासी होता. रियल इस्टेट आणि हॉटेल व्यावसायिक असलेला बराक ही मालदार असामी होती. यशस्वी बिझनेसमन असलेला बराक हा हौशी खलाशीही होता! त्याच्या मालकीचं एक लहानसं याच होतं. २३ फूट लांबीच्या या याचवर सर्व प्रकारच्या उत्तम सोयी उपलब्ध होत्या. बोटीवर एक केबिनही होती. या याचमधून समुद्रात फेरफटका मारणं हा डॅन बराकचा आवडता उद्योग होता. आपल्या या बोटीला बराकने नाव दिलं होतं...
विचक्रॅफ्ट!
मियामी हे जगप्रसिध्द असलेलं हॉलीडे डेस्टीनेशन! सर्व जगभरातून इथे पर्यटक येत असतात. ख्रिसमसच्या वेळीतर हे शहर पर्यटकांनी बहरलेलं असतं. १९६७ सालचा ख्रिसमसही याला अपवाद नव्हता. मियामीच्या किनार्यावर ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दिव्यांची रोषणाई केलेली होती. संपूर्ण किनारा हा वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या दिव्यांनी झगमगला होता.
डॅन बराकच्या मनात एक वेगळीच कल्पना होती. मियामी शहरातील ही विद्युत रोषणाई समुद्रातून पहावं असं त्याच्या मनात आलं! आपली ही योजना त्याने आपला मित्र असलेल्या आयरीश कॅथलिक धर्मगुरु रेव्हरंड पॅट्रीक होर्गन याच्यापुढे मांडली. बराकच्या या योजनेला होर्गनने ताबडतोब होकार दिला. बराकच्या विचक्रॅफ्ट बोटीवरुन समुद्रात जाऊन या रोषणाईचा आनंद घेण्यावर दोघांचं एकमत झालं.
२२ डिसेंबर १९६७ या दिवशी बराक आणि होर्गन यांनी विचक्रॅफ्टमधून मियामीचा किनारा सोडला. ७ क्रमांकाच्या बुऑय पर्यंत जायचं आणि तिथून किनार्यावरील रोषणाई पाहून परत फिरायचं अशी त्यांची योजना होती. ७ क्रमांकाचा हा बुऑय किनार्यापासून एक मैलापेक्षाही कमी अंतरावर होता.
किनारा सोडल्यावर काही वेळातच विचक्रॅफ्ट ७ क्रमांकाच्या बुऑय पाशी आलं. मियामी शहरातील आणि किनारपट्टीवरील उजळलेल्या शेकडो दिव्यांचं विहंगम दृष्य तिथून दिसत होतं.
७ व्या बुऑयपाशी पोहोचत असतानाच बराकला आपल्या बोटीला पाण्यात लहानसा धक्का बसल्याचं जाणवलं! मात्रं ते नेमकं काय असावं याची त्याला काहीही कल्पना आली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने ताबाडतोब कोस्टगार्डशी संपर्क साधला.
"माझी बोट ७ व्या बुऑयपाशी आहे!" कोस्टगार्डशी बोलताना बराक म्हणाला,"पाण्यात ती कशावर तरी आपटली असावी असं मला वाटतं. फारसा धोका आहे असं मला वाटत नाही. आम्हाला किनार्यापर्यंत ओढून नेण्यासाठी मदत पाठवा!"
आपल्या बोटीचं रडार नादुरुस्तं झाल्याचं बराकच्या ध्यानात आलेलं होतं. त्याचप्रमाणे पाण्यात बोटीवर जे काही आदळलं होतं त्यामुळे बोटीचा प्रॉपेलरही बिघडला असावा अशी त्याला शंका आली होती. मात्रं त्याच्या आवाजावरुन तो शांत असल्याचं आणि फारसा काळजीत नसल्याचं कोस्टगार्डला जाणवलं.
"आम्ही ७ क्रमांकाच्या बुऑयकडे मदत पाठवतो!" कोस्टगार्डने संदेश दिला.
"थॅंक्स! तुम्हाला दिशा कळण्यासाठी मी फ्लेअर गन झाडेन!"
बराकने कोस्टगार्डला मदतीसाठी संदेश पाठवला तेव्हा रात्रीचे ९.०० वाजले होते.
७ व्या क्रमांकाचा बुऑय नेमका कुठे आहे हे कोस्टगार्डला अर्थातच निश्चितपणे ठाऊक होतं. कोस्टगार्डची संरक्षक कटर 'चिओला' ही मियामीच्या किनार्यावरच होती. कोस्टगार्डकडून संदेश मिळताच ताबडतोब ती ७ क्रमांकाच्या बुऑयपाशी पोहोचली. चिओला बुऑयपाशी पोहोचली तेव्हा घड्याळ वेळ दर्शवत होतं ९.१८!
विचक्रॅफ्टचा पत्ता नव्हता!
कोस्टगार्डशी बोलताना बराकने दिशा कळण्यासाठी फ्लेअर गन झाडत असल्याचं सांगीतलं होतं. परंतु चिओलावरील एकाही माणसाला फ्लेअर गनचा उजेड दृष्टीस पडला नव्हता!
विचक्रॅफ्टचा काहीही पत्ता लागत नाही हे ध्यानात आल्यावर मियामी कोस्टगार्डने ७ व्या क्रमांकाच्या बुऑयच्या परिसरात बारकाईने शोध घेण्यास सुरवात केली. सर्चलाईट्सच्या सहाय्याने पाण्यात शोध घेऊनही विचक्रॅफ्टचा अथवा बराक आणि होर्गन यांची कोणतीही खूण दिसली नाही!
अवघ्या १८ मिनीटांत विचक्रॅफ्ट समुद्रात अदृष्य झाली होती!
कोस्टगार्डचं शोधकार्य दुसर्या दिवशीही सुरुच राहीलं. सुमारे १२०० चौरस मैलाच्या परिसरात कोस्टगार्डच्या अनेक बोटी विचक्रॅफ्टचा शोध घेत होत्या. मियामीच्या परिसरात पाण्यात असलेल्या इतर अनेक खाजगी बोटी आणि समुद्रात खोलवर असलेल्या मोठ्या जहाजांनाही विचक्रॅफ्टचे काही अवशेष आढळतात का हे पाहण्याची कोस्टगार्डने सूचना केली.
... परंतु कशाचाही उपयोग झाला नाही!
विचक्रॅफ्ट किंवा बराक आणि होर्गन यांची कोणतीही खूण आढळली नाही!
डॅन बराक हा अनुभवी दर्यावर्दी नसला तरी याच चालवण्याचा त्याला भरपूर अनुभव होता. समुद्रात अचानकपणे उद्भवणार्या धोक्यांची त्याला पूर्ण जाणिव होती. इतर सर्व लहान-मोठ्या जहाजांप्रमाणे विचक्रॅफ्टवरही लाईफजॅकेट्स आणि पाण्यात तरंगू शकणार्या अनेक वस्तू होत्या. जास्तीची खबरदारी म्हणून बराकने आपल्या बोटीवर बर्याच मोठ्या आकाराची विशीष्टं प्रकारची पाण्यात तरंगणारी गादी लावली होती. यामुळे तर विचक्रॅफ्ट 'बुडू न शकणारी बोट' (अनसिंकेबल) म्हणून मियामीत प्रसिध्द पावली होती!
या खबरदारीमुळे बोटीचा सांगाडा नष्टं झाला असता तरी ती पाण्यात बुडण्याची शक्यता नव्हती!
मियामीच्या आसपासच्या समुद्रात पाच दिवस कसून शोध घेतल्यावर २८ डिसेंबरला कोस्टगार्डने आपला शोध थांबवला. एव्हाना बराक आणि होर्गन यांच्या जिवीताची आशा नष्ट झाली होती!
विचक्रॅफ्टच्या अशा प्रकाराने गायब होण्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले...
किनार्यापासून अवघ्या मैलभर अंतरावर असलेली बोट आणि दोन माणसं कोणताही मागमूस न ठेवता गायब होणं हे कसं शक्यं होतं?
२२ डिसेंबरच्या रात्री मियामीच्या किनार्यावर लहानसं वादळ झालं होतं. या वादळामुळे विचक्रॅफ्ट किनार्यापासून दूर खुल्या समुद्रात ओढली गेली असावी असा एक तर्क होता. ही शक्यता नाकारता येत नसली तरी तसं झालं असल्यास बराकने पुन्हा रेडीओसंदेश का पाठवला नाही?
कितीही लहान नौका असली, तरी अवघ्या १८ मिनीटांत ती पाण्यात पूर्णपणे बुडणं हे अशक्यं होतं. मात्रं असं असताना विचक्रॅफ्ट पूर्णपणे पाण्यात बुडणं शक्यं होतं का? ते देखिल बोट बुडू नये म्हणून खास सोय केलेली असताना?
विचक्रॅफ्ट पाण्यात पूर्ण बुडाली हे जरी गृहीत धरलं, तरी लाईफ जॅकेट्स आणि इतर अनेक वस्तू अशा होत्या ज्या पाण्यावर तरंगत राहू शकत होत्या. परंतु यातील एकही वस्तू अथवा लाईफ जॅकेट पाण्यात आढळलं नाही!
बोट पाण्यात बुडाली तरीही किमान बराक आणि होर्गन लाईफ जॅकेट्सच्या सहाय्याने पाण्यात तरंगत असलेले का आढळून आले नाहीत?
बोट बुडाल्यावर शार्क्सनी बराक-होर्गन यांच्यावर हल्ला करुन त्यांचा फन्ना उडवला असा एक तर्क मांडण्यात आला. परंतु तरी त्यांची लाईफ जॅकेट्स, किमान जॅकेट्सचे तुकडेतरी पाण्यात का आढळून आले नाहीत? तसंच त्यांच्या रक्तमांसाचे थोडेतरी अवशेष पाण्याच्या पृष्ठभागावर का दिसून आले नाहीत?
कोस्टगार्डचा प्रवक्ता या संदर्भात बोलताना नंतर म्हणाला,
"५ दिवस सर्व प्रकारच्या प्रयत्नांनंतर त्यांचा शोध थांबविण्यापलीकडे
आमच्यापाशी दुसरा मार्गच नव्हता. विचक्रॅफ्ट हरवली खरी, परंतु समुद्रात
नाही!"
....मग काय ती आकाशात खेचली गेली होती का?
डॅन बराकची बोट आपल्या नावाला मात्रं निश्चितच जागली.
विचक्रॅफ्ट जादूटोणा करावा तशी अचानक अदृष्य झाली होती!
संदर्भ :-
Bermuda Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
The Devil's Triangle - रिचर्ड वायनर
Ghost Ships - रिचर्ड वायनर
Lost At Sea - अॅलेक्स झार्ट्रॉयस्की