एक दिवस मतंग ऋषि तिला म्हणाले, 'शबरी, परमेश्वरास वाहण्यासाठी दोनचार फुलें फार तर आणावीं. फुलें हें झाडांचें सौंदर्य आहे. वृक्षांचें सौंदर्य आपण नष्ट करूं नये. फूल घरीं आणलें, तर किती लौकर कोमेजतें; परंतु झाडावर तें बराच वेळ टवटवीत दिसतें. आपण त्या फुलाला त्याच्या आईच्या मांडीवरून ओढून लवकर मारतों. सकाळच्या वेळीं फुलांचे हृदय, शबरी, भीतीने कापत असतें. आपली मान मुरगळण्यास कोण खाटीक येतो, इकडे त्यांचें लक्ष्य असतें. शबरी, आपण दुष्ट आहोंत. मनुष्यप्राण्याला आपल्या प्रियजनांच्या संगतींत मरणें आवडतें; या फुलांनाहि तसेंच नसेल का वाटत ? शबरी, हें फूल तुझ्यासारखेंच आहे. तेंहि हसतें व कोमेजतें; त्यालाहि जीव आहे. झाडामाडांकडे, फुलांपाखरांकडेसुध्दा प्रेमाने पहावयास शिकणें म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणें होय.'
शबरी म्हणाली, 'तात, लहानपणीं मी तर शिकार करीत असें ! माझे बाबा हरिणें मारून आणीत; शेळया, मेंढया आमच्याकडे मारल्या जायच्या.'
ऋषि म्हणाले, 'शबरी, तें तूं आता विसरून जा. आता निराळें आचरण ठेवावयास तूं शीक. उगीच कोणाला दुखवूं नकोस, कोणाची हिंसा करूं नकोस. शेतीभाती करावी, वृक्षाचीं फळें खावीं, कंदमुळें भक्षावीं, अशी राहणी चांगली नाही का ? शबरी, तुला चिमटा घेतला, तर कसें वाटेल ?'
इतक्यांत ऋषिपत्नी बाहेर आली व म्हणाली, 'मी तुम्हांला सांगूं का कालची गंमत ? त्या अशोकाच्या झाडावरील फुलांचा तुरा तोडून घेण्याची शबरीला अतिशय इच्छा झाली होती. तिने तीनतीनदा हात पुढे करावे व आखडते घ्यावे. शेवटीं तिच्या डोळयांत पाणी आलें व तिने त्या फुलांना चुंबून त्यांच्याकडे कारुण्याने पाहिलें आणि ती निघून गेली. शबरी, मी सारें पहात होतें बरं का ?”
शबरी लाजली व ऋषीला कृतार्थता वाटली. हें रानफूल सात्त्वि सौंदर्याने, गुणगंधाने नटतांना पाहून त्याला कां धन्य वाटणार नाही ?
शबरी आता वयांत आली. ती यौवनपूर्ण झाली. एक दिवस मतंग ऋषि तिला म्हणाले, 'शबरी, तूं शिकली-सवरलीस, सद्गुणी झालीस. आता तूं मोठी झाली आहेस. घरीं जा. ब्रह्मचर्याश्रम सोडून गृहस्थाश्रमांत तूं आता प्रवेश कर; विवाह करून सुखाने नांद.'
शबरी म्हणाली, 'तात, मला हे पाय सोडून दूर जाववत नाही; मी येथेच तुमची सेवा करून राहीन.'
त्या वेळेस ऋषि आणखी कांही बोलले नाहीत. त्यांनी परभारें भिल्ल राजाला निरोप पाठविला की, 'तुझी मुलगी आता उपवर झाली आहे; तरी तिला घेऊन घरीं जा व तिचा विवाह कर.'
निरोपाप्रमाणे राजाने दुस-या एका भिल्ल राजाच्या मुलाची वर म्हणून योजना केली व शबरीला नेण्यासाठी तो आश्रमांत आला.
ऋषीने राजाचें स्वागत केलें व त्याला फलाहार दिला. शबरीला पित्याच्या स्वाधीन करतांना त्याने तिला शेवटचा उपदेश केला-'शबरी, सुखाने नांद. प्राणिमात्रावर प्रेम कर. सत्याने वाग. रवि, शशि, तारे आपल्या वर्तनाकडे पहात आहेत, हें लक्ष्यांत धर. वत्से, जा. देव तुझें मंगल करो व तुला सत्पथावर ठेवो.'