शबरी, सर्व फुलांच्या ठायीं सौंदर्य, सुगंध, कोमलता आहे; पण कमलपुष्पाच्या ठायीं हे गुण विशेष प्रतीत होतात; म्हणून त्याला आपण जास्त मान देतों. सर्वत्र असेंच आहे. जें जें थोर आहे, उदात्त आहे, रमणीय आहे, विशाल आहे, त्याबद्दल साहजिकच आदर, भक्ति, प्रेम हीं आपल्या हृदयांत उत्पन्न होतात. शबरी, मनुष्यजातींतहि असेंच आहे. आपणां सर्वांच्या ठायीं परमेश्वरी तत्त्व आहे; परंतु तुझ्या जातींतील लोकांपेक्षा तुझ्यामधील ईश्वरी तत्त्व जास्त स्पष्टपणें दिसून येतें. म्हणून तुझ्याबद्दल आदर वाटतो. आकाशाचें प्रतिबिंब सर्वत्र पाण्यांत पडलेलें असतें; परंतु निर्मळ पाण्यांत तें स्पष्ट दिसतें; त्याप्रमाणे परमेश्वराचें प्रतिबिंब निर्मळ हृदयांत स्वच्छ पडलेलें दिसून येतें. शबरी, आपलें मन आपण घासून घासून इतकें स्वच्छ करावें की, परमेश्वराचें पवित्र प्रतिबिंब तेथे पडावें व त्याचें तेज आपल्या डोळयांवाटें, आपल्या प्रत्येक हालचालींत बाहेर पडावें. आपण आपलें मन व बुध्दि हीं घासून स्वच्छ करीत असतांनाच, इतरांच्याहि हृदयाला स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करावा. शबरी, तूं तपस्विनी आहेस, तूं आपलें हृदय पवित्र केलें आहेस. तूं तुझ्या जातींतील स्त्रीपुरुषांचीं मनेंहि निर्मळ व प्रेमळ व्हावीं, म्हणून प्रयत्न केले पाहिजेस. स्वत:चें खरें हित साधून परहितार्थ म्हणून सततोद्योग करीत राहणें, हें विचारशील मानवाचें जीवितकार्य आहे.'

मुनीची ती गंगौघाप्रमाणे वाहणारी पवित्र वाणी शबरी ऐकत होती. ते शब्द आपल्या हृदयांत ती साठवीत होती. हात जोडून खाली ऋषींच्या पदकमलांकडे पहात शबरी म्हणाली, 'गुरूराया, ही शबरी अजून वेडीबावरी आहे. ती दुस-याला काय शिकविणार ? महाराज, सदैव मला तुमच्या चरणांजवळ ठेवा म्हणजे झालें.'

अशा प्रकारचे प्रसंग, असे विचारसंलाप कितीदा तरी होत असत. शबरी आनंदाने जीवन कंठीत होती. वर्षांमागून वर्षे चाललीं. शबरी प्रेममय व भक्तिमय बनत चालली. तिला पाहून पशुपक्षी जवळ येत. तिच्या डोळयांतील प्रेममंदाकिनीने क्रूर पशूहि आपलें क्रौर्य विसरून जात. तिच्या हातांतून पाखरांनी दाणे घ्यावे, तिच्या मांडीवर बसून भक्तिभावाने सद्गदित झाल्यामुळे तिच्या डोळयांतून घळघळ गळणारे अश्रु मोत्यांप्रमाणे पाखरांनी गिळावे ! शबरी-भिल्लाची पोर शबरी-प्रेमस्नेहाची देवता बनली होती !

कधीकधी मतंग ऋषींच्या बरोबर शबरी इतर थोर ऋषींच्या आश्रमांतहि जात असे. शबरीची जीवनकथा, तिचें वैराग्य, तिचें ज्ञान व तिची शांत मुद्रा, हीं पाहून ऋषि विस्मित होत व ते तिच्याबद्दल पूज्य भाव व्यक्त करीत. ऋषिपत्न्यांजवळ शबरी चराचरांत भरलेल्या प्रेममय परमेश्वरासंबंधी बोलूं लागली, म्हणजे ऋषिपत्न्यां चकित होत व शबरीच्या पायाला त्यांचे हात जोडले जात !

मतंग ऋषि आता वृध्द झाले व त्यांची पत्नीही वृध्द झाली; दोघेंहि पिकलीं पानें झालीं होतीं. आता सर्व कामधाम शबरीच करी. सेवा हाच तिचा आनंद होता. रात्रीच्या वेळीं ऋषीचे सुरकुतलेले अस्थिचर्ममय पाय चेपतांना, कधीकधी तिच्या पोटांत धस्स होई. 'हे पाय लौकरच आपणांस अंतरणार का?' असा विचार तिच्या मनांत येऊन डोळयांत अश्रु जमत. झोप न लागणा-या गुरूलाहि झोप लागावी; परंतु मृत्यु लौकरच गुरूला नेणार का, या विचाराने शबरीस मात्र झोप लागूं नये !


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel