शबरी सद्गदित झाली होती. ऋषिपत्नीने तिला पोटाशीं धरिलें व म्हटलें, 'बाळे शबरी, मधूनमधून येत जा हो आश्रमांत. आम्हांला आता हें घर खायला येईल, चुकल्या चुकल्यासारखें होईल. पूस हो डोळे. जातांना डोळयांत अश्रु आणूं नयेत. आता तुझा विवाह होईल. पति हाच देव मान. नीट जपून पावलें टाक. तूं शहाणी आहेस.'
मोठया कष्टाने शबरी निघाली. ऋषि व ऋषिपत्नी कांही अंतरापर्यंत- गोदेच्या प्रवाहापर्यंत पोचवींत गेलीं. एक हरिणशावक शबरीने बरोबर नेलेंच. शबरी गेली व जड पावलाने ऋषि व ऋषिपत्नी आश्रमांत परत आली. त्या दिवशीं त्यांस चैन पडलें नाही. शबरीची पदोपदीं त्यांना आठवण येई.
आज दहा वर्षांनी शबरी राजवाडयांत परत आली होती. ती गेली त्या वेळीं लहान होती, आज ती नवयौवनसंपन्न झाली होती. गेली तेव्हा अविकसित मनाने गेली; आज विकसित मनाने, सत्य, दया, अहिंसा, परोपकार, प्रेम इत्यादि सद्गुणांनी फुललेल्या मनाने ती आली होती. शबरी लगेच आईला भेटली. सर्वांना आनंद झाला.
दुपारची वेळ झाली होती व शबरी माडीवर दरवाजांत उभी राहून आजूबाजूस पहात होती, तों तिच्या दृष्टीस कोणतें दृश्य पडलें ? एका आवारांत चारपांचशे शेळयामेंढया बांधलेल्या होत्या. बाहेर कडक ऊन पडलें होतें. त्या मुक्या प्राण्यांना पाणी पाजलें नव्हतें, खाण्यास घातलें नव्हतें व त्यांजवर छाया नव्हती. उन्हांत ते प्राणी तडफडत होते ! शबरीचें कोमल मन कळवळलें आणि ती तीरासारखी खाली गेली व आईला म्हणाली, 'आई, तीं मेंढरें, कोकरें तिकडे कां ग, डांबून ठेविलीं आहेत ? ना तेथे छाया, ना जल, ना चारा; जलाविणे कशीं माशाप्रमाणे तडफडत आहेत ! आई, कां ग असें ?'
आई म्हणाली, 'बाळ, त्यांची पीडा, त्यांचे क्लेश उद्या संपतील. उद्या तुझा योजिलेला पति येईल. तो श्रीमंत आहे. शेकडो लोक त्याचेबरोबर येतील. त्यांना मेजवानी देण्यासाठी उद्या ह्या सा-यांची चटणी होईल. जा, तिकडे खेळ-मला काम आहे.'
शबरीच्या पोटांत धस्स झालें ! ती कावरीबावरी झाली. भिल्लांच्या हिंसामय जीवनाचा आजवर तिला विसर पडला होता. तिच्या मनांत शेकडो विचार आले. 'उद्या माझ्या विवाहाचा मंगल दिवस ! सुखदु:खांचा वाटेकरी, जन्माचा सहकारी उद्या मला लाभणार ! माझ्या आयुष्यांत उद्याचा केवढा भाग्याचा दिवस ! उद्या आईबाप, आप्तेष्ट आनंदित होतील; परंतु या मुक्या प्राण्यांना तो मरणाचा दिवस होणार ! माझ्या विवाहसमारंभासाठी यांना मरावें लागणार ! आणि मला पति मिळणार, तोहि असाच हिंसामय वृत्तीचा असणार ! मी पुनश्च या हिंसामय जीवनांत पडणार ! छे: ! कसें माझें मन कासावीस होत आहे ! माझे विचार मी कोणास सांगूं ? माझें कोण ऐकणार येथे ? नको, हा विवाहच नको. हा मंगल प्रसंग नसून अमंगल आहे ! माझ्या जीवनाच्या सोन्याची पुन: राख होणार अं ! आपण येथून तत्काळ पळून जावें. रानावनांत तपश्चर्येतच काळ घालवावा.'
शबरीचे डोळे भरून आले. ती आता रात्रीची वाट पाहत बसली. वाडयांत सर्वत्र लग्नघाई चाललीच होती. शबरी फाटकीं वल्कलें अंगावर घालून विरक्तपणें रात्रीं निघून गेली ! कोणालाहि तें माहीत नव्हतें, फक्त अंधकाराला माहीत होतें.