या जगांत, या आपल्या हिंदुस्थानांत कितीतरी ओसाड मनोभूमिका पडल्या आहेत. कोटयवधि लोकांच्या मनोभूमिका आपणांवर सद्विचारांचा, सत्संस्कारांचा पाऊस कधी कोसळेल, म्हणून वाट पाहत आहेत; आपला उध्दार कधी होईल, अशी रात्रंदिवस त्या ओसाड मनोभागांना चिंता लागली आहे. फ्रेंच इंजिनियर सहारा वाळवंटांत पाणी सोडून त्याचा समुद्र बनविणार होते. हिंदुस्थानांतील लाखो मानवी हृदयांचीं वाळवंटे ! तेथे ज्ञानमेघ आणून कोण ओलीं करणार ? तेथे सद्गुणांचें पीक कोण घेणार ? धैर्य, साहस, स्वार्थत्याग, सध्दर्म, दया, प्रेम, परोपकार, सदाचार, सहानुभुति, सहकार्य, माणुसकी, बंधुभाव, स्वच्छता या सद्गुणांचें पीक या शेकडो पडित मनोभूमींतून कोण काढणार ? देवाघरच्या या दैवी शेतीवर काम करणारे कष्टाळू मजूर आपणांत किती आहेत ? भिल्ल, कातकरी, गोंड, अस्पृश्य अशा जाति- या सर्वांना ज्ञानाची शिदोरी कोण नेऊन देणार ? ही भगवंताची मानसशेती करावयास, तिच्यावर खपण्यासाठी हजारो प्रामाणिक मजूर पाहिजे आहेत, हजारो मतंग मुनि हवे आहेत ! शबरीलाहि सत्संस्कारांनी पुण्यतमा करणारे मतंग मुनि कोठे, आणि 'तुम्ही अस्पृश्य, शिवूं नका, तुम्हांला वेदाचा अधिकार नाही !' असलीं वाक्यें तोंडाने उच्चारणारे हल्लीचे हे शाब्दिक धर्ममार्तंड कोठे ? पुनरपि या श्रीरामचंद्रांच्या भूमींत हजारो मतंग ऋषि उत्पन्न झाल्याशिवाय देशोध्दार कसा होणार ?
रामचंद्र, सीता, लक्ष्मण हीं त्रिवर्ग वनमार्ग आक्रमीत होतीं, तों एका वृक्षाच्या खाली 'हीं फळें रामचंद्राला आवडतील का ? किती गोड आहेत ! माझ्या दातांनी त्यांची चव मी घेतली आहे; पण केव्हा येणार रामचंद्र ? केव्हा येणार ? केव्हा भेटणार ? आजहि हे गुंफलेले हार कोमेजून जाणार का ?' असें शबरी स्वत:शी खिन्नपणें, प्रेमळपणें म्हणत होती.
एकाएकीं रामचंद्र, सीता, लक्ष्मण हीं तिच्यासमोर उभीं राहिलीं. शबरी चमकली. तिचे डोळे अश्रूंनी चमकले. ती उठून म्हणाली, 'तुम्हीच ते; मला जरी माहीत नाही, तरी तुम्हीच ते. तुम्हीच रामचंद्र, होय ना ? तुमचें प्रसन्न मुखच सांगत आहे. या सीतामाई व प्रेमळ बंधु लक्ष्मणजी. तुम्हीच ते. किती तुमची वाट पहात होतें ! तुमच्यासाठी दररोज फळें गोळा करावीं, हार गुंफावे ! लबाड वारा सांगेना, पांखरें सांगेनात, तुम्ही कधी येणार तें. बरें झालें, आलांत तुम्ही ! मला दर्शन दिलेंत. मी कृतार्थ झालें. माझे गुरुदेव म्हणत, ज्याच्या ठिकाणी अनंत सद्गुण दिसतील, तो परमेश्वर समजावा. तुम्ही निर्दोष, निष्कलंक आहांत. तुम्हीच माझे परमेश्वर आहांत. या, बसा, मी तुमची पूजा करतें हां.' असें म्हणून तिने तिघांना पल्लवांवर बसविलें. तिने त्यांचे पाय धुतले व अश्रूंचें कढत पाणीहि मधूनमधून त्यांवर घातलें. नंतर तिने त्यांच्या गळयांत घवघवीत हार घातले व तीं मधुर फळें त्यांच्यापुढे ठेविली. रामचंद्र, सीता व लक्ष्मण या सर्वांचें अंत:करण भरून आलें ! त्यांना तीं फळें खाववत ना !