शबरी वेडी झाली होती. तिने रोज फुलें जमवावीं, त्यांचे सुंदर हार दिवसभर करावे आणि मग आज रामचंद्र आला नाही-नाही आला, असें म्हणून ते हार नदीच्या पाण्यावर सोडून द्यावे. रोज तिने गोडगोड फळें रामचंद्रासाठी गोळा करून आणावीं आणि—
"नाही आला माझा राम, नाही पुरले माझे काम,
नाही आला मेघश्याम, नाही संपलें माझें काम.'
असें म्हणत तीं फळें वानरांपुढे टाकावीं.
कधीकधी पाखरांचे शब्द ऐकून शबरी म्हणे, 'हीं पाखरें माझ्या रामाला सादर घालीत आहेत का ? पाखरांनो, तुम्हांला उडतां येतें; मग तुम्हांलाहि जर अजून रामचंद्र आलेला दिसत नाही, तर मला कसा दिसणार ?'
वा-याचें सळसळणें ऐकून, 'राम येत नाही म्हणून का वारा रडतो आहे ?' असें तिने म्हणावें. रात्रीं काळवंडलेला चंद्र पाहून 'राम दिसत नाही, म्हणून का चंद्र काळवंडला आहे ?' असें तिने उद्गारावें.
शबरीला एकच ध्यास, एकच भास, एकच तिला वेड, एकच तिचा विचार. शबरी रामचंद्रासाठी अधीर झाली होती !
रामचंद्र, सीतादेवी, लक्ष्मणजी दंडकारण्यांत आलीं. एक दिवस भारद्वाज ऋषींकडे तीं राहिलीं. तेथे अनेक ऋषि आले होते. रामचंद्रांचा विनय, धीरोदात्तता, तेज, पावित्र्य हीं पाहून ऋषिजनांचें हृदय भरून आलें. वैराग्यमूर्ति, त्यागदेवता सीता पाहून त्यांचें हृदय विरघळलें. सीता म्हणाली, 'इकडील प्रेमळ सहवासांत मला काटे फुलांसारखे वाटतात व दगडांची कोवळीं पानें होतात. प्रभूंच्या संगतींत मला सर्वत्र स्वर्गच आहे.' रामचंद्रांना शबरीची गोष्ट ऋषींकडून कळली व ही वेडी शबरी कोठे भेटेल, असें त्यांनाहि झालें.
तिघंजण वनवासार्थ पुढे निघालीं. ऋषींच्या आश्रमांत स्वागतसत्कार घेत ती फार दिवस रहात नसत; कारण तीं सुखोपभोगासाठी आलीं नव्हतीं, वनांत वैराग्यवृत्तीने व स्वावलंबनाने राहण्यास तीं आलीं होतीं. त्रिवर्ग पुढे चालली व शबरीच्याच कथा त्यांच्या चालल्या होत्या. एक साधी भिल्लकन्या; परंतु सत्संगतीने, संस्काराने, ती किती उदात्त विचारांची व थोर आचाराची झाली होती, तें ऐकून त्यांना विस्मय वाटला.
खरेंच. पडीत जमिनींत खत घालून, तिची नीट मशागत करून जसें उत्कृष्ट पीक काढतां येतें; जेथे दगडधोंडे, काटेकुटे आहेत, तेथेहि प्रयत्न केले, तर फुलांफलांनी, सस्यांकुरांनी नटलेली सुंदर सृष्टि जशी शोभूं लागते, तसेंच मानवी मनाचेंहि आहे. या जगांत प्रयत्न हा परीस आहे. प्रयत्नाने नरकाचें नंदनवन होतें, कोळशाचीं माणकें होतात. आपण शेताभातांची निगा राखून पीक काढतों; परंतु मानवी मनाची अमोल शेती आपण करीत नाहीं !