मतंग ऋषि आश्रमांत ब्रह्मध्यानांत मग्न होते. सकाळचें काम करण्यांत ऋषिपत्नी गढून गेली होती. इतक्यांत शबरी तेथे आली. शबरीला पाहतांच मोर नाचूं लागले, हरिणें उडया मारूं लागलीं, गाईचीं वासरें हंबरूं लागलीं. ऋषींनी डोळे उघडले. मुखकळा म्लान झालेली, दृष्टि अश्रूंनी डवरलेली अशी शबरी पाहून, ते आश्चर्यचकित झाले. शबरीच्या मुखेंदूवरील अश्रूंचे पटल पाहून ऋषींचें अंत:करण विरघळलें. शबरीने येऊन वंदन केलें व एखाद्या अपराधिनीप्रमाणे ती जरा दूर उभी राहिली.
मतंग ऋषि म्हणाले, 'शबरी, आज तर तुझ्या विवाहाचा मंगल दिवस. तूं आज येथे रडत परत का आलीस ? तुला कोणी रागें का भरलें ? आईबापांशीं भांडण का झालें ? शबरी, आईबापांसारखें अन्य दैवत नाही. बोल, अशी मुकी का तू ?'
ऋषि कोणाजवळ बोलत आहेत, हें पाहण्यासाठी ऋषिपत्नी बाहेर आली व पाहतें, तों काल परत गेलेली शबरी !
ती उद्गारली, 'शबरी, अग, इकडे येना अशी. तूं का कोणी परकी आहेस ? अशी रडूं नको. रडूनरडून डोळे लाल झाले ! प्रेमळ पोर ! ये अशी इकडे व सांग काय झाले ते.
ते प्रेमळ शब्द ऐकून शबरी जवळ आली. सहानुभूतीच्या व प्रेमाच्या शब्दांनी बंद ओठ उघडतात. बंद हृदयें उघडीं होतात. ऋषिपत्नीच्या खांद्यावर मान ठेवून शबरी ओक्साबोक्शी रडूं लागली.
ऋषिपत्नी म्हणाली, 'शबरी, अशी किती वेळ रडत बसणार तूं ? उगी नाही का रहात ? काय झालें तें तर सारें सांग. या रडण्याने आम्ही काय बरें समजावें ?'
शबरीने डोळे पुसले आणि ती हात जोडून म्हणाली, 'आई, तात, मला येथेच आश्रमांत राहूं द्या. मला आजपर्यंत आपण आधार दिलात, तसाच यापुढे द्या. मला नाही म्हणूं नका. मी माझें आयुष्य आनंदाने येथे कंठीन. आश्रमाची झाडलोट करीन, गाईगुरें संभाळीन, सडासंमांर्जन करीन; आपलें चरण चुरीन; तुमचे अमोल बोल ऐकेन.'
ऋषि म्हणाले, 'शबरी, तूं तर विवाहासाठी गेली होतीस. तूं आता यौवनसंपन्न झाली आहेस. आश्रमांत तरूण मुलीला ठेवणें आम्हांलाहि जरा संकटच वाटतें. शिवाय येथे दक्षिणेकडील राक्षसांचा कधीमधी हल्ला येईल. तूं पतीसह संसार करावा, हें योग्य. वेल ही वृक्षावर चढल्यानेच शोभते. शबरी, असा वेडेपणा करूं नको. जा, घरीं माघारीं जा. सुखाचा नेटका संसार कर.'