त्याचं असंय की तुमच्या लिहिण्यालाही निमित्त असतं. म्हणजे विषय
सुचायला वगैरे नाही. तर अॅक्च्युअल लेखन करण्यास. म्हणजे उदाहर्णार्थ तुम्ही वाचता..मग वाचनातील आवडत्या किंवा नावडत्या मुद्द्यावर
लेखन करता. मत मांडता. एकंदरीत प्रतिक्रिया देता. म्हणजे त्याच्यासाठी 'वाचन' हे निमित्त ठरतं. काहीजण तर ठरवून लिहितात. पण ठरवून लिहिणारे लिखाणात
सातत्य ठेवत नाहीत, असा माझा (कुणी विचारात घेत नसला तरी)
आरोप आहे. कारण लेखन हे आतून आलं पाहिजे. आता आतून म्हणजे कुठून हे विचारु नका. ती
बोलण्याची एक स्टाईलय. तरीही सांगायचं झाल्यास, लेखन हे 'सूचलं' पाहिजे. उगाच चार शब्दांना खेचायचं,
ताणायचं आणि त्यांच्या चार ओळी करायच्या, याला काडीचाही अर्थ नसतो. दोन पानी लेखन एका पानात संपत असेल तर तिथंच
संपवावं. उगाच वाढवलं की ते बोरिंग होतं, असं माझं
स्ट्रिक्टली पर्सनल मत आहे. असो. आपण मुद्द्यावर येऊया. तर लेखनाला कुणी-ना-कुणीतरी
निमित्त असतंच. माझ्या लेखनाला निमित्त ठरले- मी ज्यांना कधीच पर्सनली भेटलो नाही, कधीही वन-टू-वन बोललो नाही, असे सचिन परब सर.
सचिन परब हा इसम किती फूट उंच किंवा दिसायला गोरा की काळा..
किंवा आणखी कोण.. याची काहीही माहिती नव्हती तेव्हाचे हे तीन प्रसंग. तिन्ही
प्रसंग एकमेकांशी कनेक्टेड आहेत. या तिन्ही प्रसंगांनी मला सचिन परब यांच्याशी, त्यांच्या लेखनाशी आणि त्यांच्या
लेखनशैलीची आवड निर्माण केली आणि पर्यायाने मला लिहिण्यास भाग पाडले. ते तीन
प्रसंग असे-
प्रसंग १.
साठ्ये कॉलेजमध्ये बीएमएमच्या पहिल्या वर्षात असतानाची गोष्ट. डिजिटल मीडिया असा
काहीतरी विषय होता. आता नीट आठवत नाही. या डिजिटल मीडियात ब्लॉग क्रिएट करणं हा विषय होता. हा विषय
शिकवण्यासाठी तेव्हा रुईया कॉलेजमध्ये लेक्चरर असणारी गीतांजली ताई आली होती. आम्हाला शिकवायला आली
म्हणून कॉलेजपुरतं मॅम
बोलायचो.. बाकी 'अमर हिंद'च्या वक्तृत्व स्पर्धेची आयोजक
म्हणून गीतांजली ताईला आधीपासूनच ओळखत होतो. सो तीला ताई बोलणंच आवडायचं. असो. तर
गीतांजली ताई आम्हाला ब्लॉग क्रिएट करणं शिकवणार होती.. तेव्हा तिने ब्लॉग कसा बनवायचा, तो कसा असला पाहिजे, लेखन कसं असावं, लेखनशैली कशी असावी वगैरे
सांगताना एक ब्लॉग उदाहरणार्थ म्हणून आमच्यासमोर ठेवला होता. त्या ब्लॉगचं नाव- माझं आभाळ. पावसाळ्यात (बहुधा)
कुठल्याशा लायटीच्या (बहुधा) खांबाला टेकून, फिकट गुलाबी कलरची कॉलरलेस फूल स्लिव्हचं टीशर्ट घालून असणाऱ्या
इसमाचा ब्लॉगच्या
शीर्षस्थानी फोटो होता. ते दुसरे-तिसरे कुणी नसून 'माझं आभाळ' या
आमच्यासमोर 'उदाहरणार्थ' म्हणून
ठेवला गेलेल्या ब्लॉगचे लेखक होते- सचिन परब. तर सचिन परब या नावाशी आणि त्यांच्या अस्तित्वाशी
ती पहिली ओळख. गीतांजली ताई शिकवून गेल्यानंतर कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरील कम्प्युटर लॅबकडे धाव
घेतली. 'माझं आभाळ' ब्लॉगवरील काही पोस्ट वाचल्या. लेखनशैली आवडली.
प्रसंग २.
तर त्यावेळी कॉलेजमधून पार्ट टाईम जॉबला जात असे. पण त्यादिवशी आधीच कामाला जायचा
कंटाळा आला होता आणि त्यात हा ब्लॉग वाचून काढायचा होता. मग थेट कामावर फोन केला. मालाडच्या लिबर्टी
गार्डनजवळील एक तिवारी नावाच्या सीएकडे ऑफिस बॉयचं काम करत असे. फोन केला आणि सांगितलं -
"आज एक्स्ट्रा लेक्चर आहे. त्यामुळे येणार नाही."
मला विचाराल तर जगात दोन प्रकारची माणसं आहेत. घरात संडास असणारी आणि घरात संडास नसणारी."
कसलं भारी लिहिलंय म्हणून सांगू ही पोस्ट. एकदा वाचाच. लिहिण्याची जी काही शैली आहे ना तिला सलामच. पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचकाला थांबवून ठेवते, अशी शैली. अनिल अवचटांसारखी. तुमच्या-आमच्या रोजच्या बोलण्यातील शब्द.... पुढील काही दिवस 'मांझं आभाळ' वाचण्याची मोहीमच उघडली होती. अखेर या ब्लॉगवरचा एकूण एक ब्लॉग वाचून काढला.
प्रसंग ३.
तर त्या दिवसापासून सचिन परब यांना भेटायचं ठरवलं होतं. या माणसाला भेटून, आपण कसं लिहियला पाहिजे, काय वाचायला पाहिजे वगैरे प्रश्न विचारायचे, असे ठरवलेले. भेटण्याची संधीच मिळत नव्हती. याच वेळी 'मटा'च्या तिसऱ्या पानावर लेफ्ट हँड साईडला जे 'थोडक्यात' येतं ना... त्यात जाहिरातीटाईप एक बातमी आली होती. परेलच्या दामोदर हॉल शेजारील सर्व्हिस लीग शाळेत 'अंनिस'चं चर्चासत्र आहे आणि त्यात प्रमुख वक्ते सचिन परब असणार आहेत. सचिन परब सर (बहुधा) तेव्हा नवशक्तीचे संपादक होते. मग काय... हा कार्यक्रम अटेन्ड करण्याचं ठरवलं. तारिख आठवत नाहीय.. पण शनिवारचा दिवस होता (बहुधा).. संध्याकाळी ६:३० चा कार्यक्रम होता. मी ६ वाजताच जाऊन बसलो होतो. त्या दिवशी सचिन परब या इसमाला सजीवरुपात पाहिलं. आपल्याला ज्याचा ब्लॉग आवडला, तो हाच इसम. त्यादिवशी सचिन सरांनी प्रबोधनकारांवर व्याख्यान दिलं.. शिवसेना आणि प्रबोधनकार, प्रबोधनकारांचं अंधश्रद्धेविषयीचे सडेतोड मत वगैरे खूप विषयांना हात घातला. यावेळी व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी सर्वांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.. त्यातून मला हे व्यक्तिमत्त्व थोडं उलगडलं. बोलण्यात जितका साधेपणा आणि सुलभता, तितकंच लेखनात, असा हा माणूस.
शेवट:
सचिन परब सरांमुळे मी लिहियला लागलो. तोडकं मोडकं लिहित जायचो, जे येईल तसं, जमेल तसं... पण लिहायचो. विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे मी 'लिहिणं' सिरियसली घेतलं, त्या सचिन परब सरांना अजून पर्सनली कधीच भेटलो नाहीय. परेलला सर्व्हीस लीगच्या शाळेत व्याख्यान अटेन्ड केलं, तेही तिथल्या गर्दीतला प्रेक्षक म्हणूनच...
तर सरतेशेवटी सांगण्याचा मुद्दा असा की, आपल्या 'लिहिण्या'लाही निमित्त असतं. किंवा कुणीतरी निमित्त होतं. किंवा कुणाच्यातरी लिखाणावरुन इन्स्पायर्ड होऊन तुम्ही लिहिता.. जसं माझं निमित्त, इन्स्पिरेशन ठरलं- माझं आभाळ आणि सचिन परब.