श्रीगणेशाय नमः

प्रस्तावना

'हरिविजय,' 'रामविजय, 'पाण्डवप्रताप', 'जैमिनी अश्वमेध' तसेच 'शिवलीलामृत' यासारखे भाविक जनाला मोहिनी घालणारे, त्यांच्या ह्रदयातील ईश्वरीभक्ती वाढवून त्यांच्या चित्ताला शांती व आनंद यांचा लाभ करून देणारे ग्रंथ ज्यांनी लिहिले, त्या श्रीधर कवींची थोरवी काय वर्णावी? श्रीधरांचे निर्वाण होऊन आज २३६ वर्षे झाली. आपण अणुयुगांतून अंतराळ युगात प्रवेश केला. या दीर्घ काळात शेकडो कवींनी धार्मिक कविता लिहिली, परन्तु श्रीधरांच्या ग्रंथांची लोकप्रियता त्यांच्या काळात होती तेवढीच आजच्या विसाव्या शतकांतहि टिकून आहे. खर्‍या जातिवंत साहित्याचेच हे लक्षण नव्हे का?

शुद्ध बीजा पोटी

श्रीधर कवींचे विस्तृत्व चरित्र उपलब्ध नाही. त्यांनी स्वतःच्या ग्रंथांतरी स्वतःची जी थोडीबहुत माहिती दिलेली आहे त्या तुटपुंज्या माहिती वरूनच त्यांच्या चरित्राचा मागोवा घेणे क्रमप्राप्त आहे.
या माहितीवरून असे दिसते की, कवि श्रीधर हे नाझरेकर कुलकर्णी घराण्यांत जन्माला आले. त्यांच्या जन्मशकाविषयी विद्वनात एकमत नाही. कुणी त्यांचा जन्मशक १५८० हा मानतात तर काहींच्या मते तो शके १६०० असावा, त्यांचे घराणे अतिशय धार्मिक व चारित्र्यसंपन्न होते. प्रसिद्ध सत्पुरुष श्रीरंगनाथ स्वामी निगडीकर हे देखील याच घराण्यात जन्माला आले.
श्रीधरांच्या वडिलांचे नाव ब्रह्मानंद व आईचे सावित्रीबाई. ब्रह्मानन्द हे नाझरे गावचे कुलकर्णी. नाझरे हे गाव पंढरपूरच्या पश्चिमेस सोळा कोस अंतरावर आहे.
ब्रह्मानन्द हे श्रीधरांचे वडील आणि गुरुजी. यांनी संसार केला तो केवळ नावापुरता माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे ते संसारात राहूनही 'नित्यसंन्यासी' च राहिले. मात्र उतारवयात त्यांनी खरोखरीच संन्यास घेतला आणि ते लवकरच भीमातीरी समाधिस्थ झाले.
श्रीधरांची आई सावित्रीबाई ही देखील मोठी धर्मनिष्ठ स्त्री होती.
अशा ह्या ईश्वरनिष्ठ आणि सत्वशील दांपत्याच्या पोटी श्रीधरासारखे पुत्ररत्‍न जन्माला आले.
पुढे यथासमय श्रीधरांचा विवाह झाला. त्यांच्या पत्‍नीचे नाव पार्वतीबाई. श्रीधरांनी जनरूढीप्रमाणे अनेक वर्षे संसार केला. त्यांना मुलेही झाली. परंतु श्रीधरांचे मन संसारात होतेच कुठे ? कमळाचे पान पाण्यात राहूनही भिजत नाही म्हणतात. श्रीधर देखील संसारात राहून त्यापासून अलिप्तच राहिले.

गुरुपरंपरा

कारण त्यांचे सारे चित्त अध्यात्ममार्गाकडे लागले होते. त्यांना परमेश्वराचा शोध घ्यावयाचा होता आणि त्यासाठी सद्‌गुरूंची नितान्त आवश्यकता होती. परन्तु श्रीधरांना सद्‌गुरूच्या शोधासाठी रानेवने धुंडाळीत दूर जावे लागले नाही. त्यांनी आपले वडील श्रीब्रह्मानन्द यांनाच गुरु केले. श्रीब्रह्मानंद हे अध्यातमार्गात उच्च अवस्थेला पोचलेले अधिकारी पुरुष होते. त्यांनी देखील आपले वडील श्रीदत्तानन्द यांचेकडूनच गुरुपदेश घेतलेला होता. श्रीधरांनी हीच परंपरा पुढे चालविली व जन्मदात्या पित्यालाच गुरु करून त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला व पुढे चित्तशुद्धीसाठी अनेक तीर्थयात्रा करून ते पंढरपूर येथे येऊन स्थायिक झाले.
'महाराष्ट्र सारस्वत'कार कै. वि. ल. भावे यांनी श्रीधरांची गुरूपरंपरा पुढीलप्रमाणे दिलेली आढळते-
रामानंद- अमलानंद - सहजानंद - पूर्णानंद - दत्तानंद - ब्रह्मानंद - श्रीधर (किंवा श्रीधरानंद)
बहुधा संन्यासग्रहणानंतर त्यांनी 'श्रीधरानन्द' असे नाव धारण केले असावे असे वाटते.

ग्रंथकर्तृत्व

कवि श्रीधरांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी स्वतःदेखील संस्कृत भाषेत काही ग्रंथरचना केलेली आहे. रामायण, महाभारत, भागवत इ. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी अभ्यासिले होते. त्याचप्रमाणे जयदेव, बिल्वमंगल इ. नामांकित कवींची कविताही त्यांनी काळजीपूर्वक अवलोकन केली होती.
श्रीधरस्वामींच्या घरातील वातावरणही काव्यनिर्मितीला पोषक असेच होते. त्यांचे आजोबा श्रीदत्तानन्द आणि वडील श्रीब्रह्मानंद यांनी थोडीबहुत काव्यरचना केलेली होती.
त्यामुळे आपणहि महाराष्ट्र भाषेत काव्यरचना करावी अशी स्फूर्ति श्रीधरांना झाली व त्यांनी संस्कृत ग्रंथातील आख्यानांवरून मराठी भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. गुणवत्तेचा निकष लावला तर त्यांच्या समकालीन कवींपेक्षा त्यांची ही रचना किती तरी उजवी ठरते.

कालानुक्रमे त्यांनी केलेली ग्रंथरचना येणेप्रमाणे-

१. हरिविजय (शके १६२४)

२. रामविजय (शके १६२५)

३. वेदान्तसूर्य (शके १६२५)

४. पाण्डवप्रताप (शके १६३४)

५. जैमिनी अश्वमेध (शके १६३७)

६. शिवलीलामृत (शके १६४०)

या खेरीज 'पंढरीमाहात्म्य', 'श्रीमल्हारीविजय' असे दोन लहान ग्रंथही त्यांनी लिहिले असून त्यांची काही संस्कृत रचनाही प्रसिद्ध आहे.
यापैकी बहुतेक सर्वत ग्रंथ लोकादरास पात्र ठरून अनेकांच्या नित्य वाचनात आहेत. या ग्रंथामुळे मराठी वाङ्मयात मोलाची भर पडून त्यांच्या योगे भाविकांच्या ईश्वर निष्ठेच्या बीजाला खतपाणी घालून त्याला अंकुरित करण्याचे व फुलविण्याचे कार्य घडले आहे.

'हरिविजया' ची वैशिष्ट्यें

प्रस्तुतच्या 'हरिविजय' ग्रंथात भगवान गोपालकृष्णाच्या लीलांचे अनेकविध वर्णन आहे. आधीच गोपालकृष्णाच्या लीलांचा अति गोड विषय आणि त्यांचे वर्णन करण्यासाठी श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवि. मग काय बहार झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी!

कवि लिहितो-

श्रीकृष्ण कथाकमळ सुकुमार ॥ सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर ॥

माजी पद्यरचना केसर ॥ अतिसुवासे सेविजे ॥२-२००॥

या ग्रंथाचे ३६ अध्याय असून एकंदर ओवीसंख्या ८१३९ आहे.

पूर्वीचे कवि आपल्या ग्रंथकर्तुत्वाचे श्रेय स्वतःकडे घेत नसत. आपल्या आराध्य दैवताने जसे सांगितले तसे आपण उतरवून घेतले, आपण केवळ निमित्त आहोत अशी त्यांची विनम्र भूमिका असे. आणि तसा विचार केला तर कोणतीहि गोष्ट त्या भगवंताच्या इच्छेनेच घडत असते. तो स्फुर्ति देत असतो, आपण केवळ निमित्तमात्र.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel