श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णा रुक्मिणीनयनचकोरचंद्रा ॥ आनंदसदना करुणासमुद्रा ॥ हरि जांबुवंती प्राणवरा ॥ दितिजसंहारा श्रीरंगा ॥१॥

सत्यभामामनरंजना ॥ कलिंदीप्रिया दुर्जनभंजना ॥ मित्रविंदाप्राणजीवना ॥ केटभभंजना दयाब्धे ॥२॥

याज्ञजितीह्रदयपद्मभ्रमरा ॥ मद्रावतीलोचनानंदकरा ॥ लक्ष्मणापति जगदुद्धारा ॥ श्रीकरधरा मुरारे ॥३॥

अभिनवजलघरनीलवर्णा ॥ कमलपत्राक्षा पीतवसना ॥ मंगलदायका सुहास्यवदना ॥ भोगींद्रशयना जगद्‌गुरु ॥४॥

हरि आनकदुंदुभिकुमारा ॥ यदुकुलसरोजदिनकरा ॥ जगद्वंद्या प्रतापशूरा ॥ क्षराक्षरातीत तू ॥५॥

सगुणलीलाविग्रही पूर्ण ॥ षड्‍गुणैश्वर्यसंपन्न ॥ षोडश सहस्त्र गोपी आणून ॥ एक्याचि लग्ने वरियेल्या ॥६॥

एकदा रुक्मिणीच्या मंदिरी ॥ मिळाल्या सोळा सहस्त्र नारी ॥ सत्यभामा मित्रकुमारी ॥ इतरही वेगे पातल्या ॥७॥

आदिभवानी मूळप्रकृती ॥ तिजसमीप जैशा अनंत शक्ती ॥ तैशा भीमकीवेष्ठित युवती ॥ षोडश सहस्त्र मिळाल्या ॥८॥

विलाससभेसी सकळिका ॥ मिळाल्या चातुर्यचंपककलिका ॥ त्यांमाजी भीमकन्यका ॥ श्रेष्ठासनी बैसली ॥९॥

ते विलासभेची अपूर्व स्थिती ॥ विरिंचीने निर्मिली स्वहस्ती ॥ तेथील प्रभा पाहता गभस्ती ॥ आणि उडुपति तटस्थ होती ॥१०॥

असो तेथे जगत्रयजननी ॥ भीमकी शोभे लावण्यखाणी ॥ तंव सत्यभामा हांसोनी ॥ गोष्टी बोले ऐकाते ॥११॥

आमुचे सदनी शारंगपाणी ॥ नित्य क्रमीत येऊनि रजनी ॥ मजवरी प्रीति मनींहूनी ॥ तैसी नाही इतरांकडे ॥१२॥

माझे घरी पारिजातक ॥ आणूनि लावी वैकुंठनायक ॥ एकांतगोष्टी सकळिक ॥ मजचि सांगे जगदात्मा ॥१३॥

एक म्हणे लटिके तुझे बोल ॥ मजवर प्रीति करी घननीळ ॥ स्वमुखींचे तांबूल ॥ मजलागी रात्री दिधले ॥१४॥

उदय पावे जो वासरमणी ॥ गोष्टी सांगे शारंगपाणी ॥ काल हे अलंकार घडोनि ॥ स्वहस्ते मज लेवविले ॥१५॥

तंव एक खंजरीटनयनी ॥ म्हणे असत्य बोलता मुळींहूनी ॥ माझे मंदिरी कैवल्यदानी ॥ आजि होते निर्धारी ॥१६॥

हरीचे मांडीवरी शिर ठेवूनी ॥ मी निजले होते कौतुकेकरोनी ॥ हे शीसफूल नवे घडोनि ॥ कृष्णेचि रात्री आणिले ॥१७॥

गोष्टी सांगितल्या आजि गहन ॥ जो उदय पावे चंडकिरण ॥ तुम्ही लटक्याचि वार्ता सांगोन ॥ संपादणी करिता गे ॥१८॥

एक बोले गजगमना ॥ मजविण न गमे कंस मर्दना ॥ धणी न पुरे माझिया नयना ॥ हरिवदन विलोकिता ॥१९॥

कृष्णे मज सांगाते घेउन ॥ आजि रात्री केले भोजन ॥ हे पदम जडित नूतन ॥ गळा घातले माझिया ॥२०॥

एक बोले नितंबिनी ॥ रत्‍नजडित डोल्हारी बैसोनी ॥ सारीपाट अवघे रजनी ॥ दोघेजणे खेळलो हो ॥२१॥

माझी वेणी आपुल्या हाते ॥ गुंफिली रात्री कृष्णनाथे ॥ अंजन सोगयाचे स्वहस्ते ॥ कंसांतके रेखिले ॥२२॥

माझे कपाळी कस्तूरी रेखिली ॥ हे रत्‍नमाळा गळा घातली ॥ मजवरी प्रीति हरीची जडली ॥ ऐसी नाही कोठेही ॥२३॥

तो एक पद्मनेत्री बोले वचनी ॥ वाउगे काय व्यर्थ बोलोन ॥ म्यां रात्री स्वकरेकरून ॥ हरीसी चंदन लाविला ॥२४॥

कस्तुरी टिळक कपाळी ॥ म्यां आजि रेखिला हरीचे भाळी ॥ सत्य की असत्य नेत्रकमळी ॥ जाऊनिया पहा गे ॥२५॥

तो एक हंसगमना बोले ॥ माझे मंदिरी हरि निजले ॥ अवघी रात्र चरण चुरिले ॥ आपुल्या हातेकरूनिया ॥२६॥

एक बोले काय वचन ॥ आजि माझ्या सदनी गायन ॥ करूनि मोहिले माझे मन ॥ ते सुख पूर्ण न वर्णवे ॥२७॥

एक म्हणे पयोधरेकरोनी ॥ हरिचरण अवघे रजनी ॥ म्यां निवविले साजणी ॥ चक्रपाणी साक्ष असे ॥२८॥

ऐशा षोडश सहस्त्र युवती ॥ बोलता कदाही न राहती ॥ एकीसी एक उडविती ॥ नि मिळती विचारा ॥२९॥

जैसी नाना शास्त्रे अनेक ॥ घेऊनि उठती बहुत तर्क ॥ एक कर्म स्थापिती मीमांसका ॥ औपासन एक स्थापिती ॥३०॥

एक स्थापीतसे योग ॥ दुजे म्हणे करावा याग ॥ एक म्हणे स्वर्गभोग ॥ लाभे ऐसे आचरावे ॥३१॥

एक न्याय स्थापिती कैसा ॥ एक स्थापिती मीमांसा ॥ पातंजलापरते सहसा ॥ साधन नाही एक म्हणे ॥३२॥

एक म्हणती इंद्रथोर ॥ एक स्थापिती महेश्वर ॥ एक म्हणती इंदिरावर ॥ त्यापरता थोर नाहीच ॥३३॥

एक स्थापिती थोर गभस्ती ॥ एक म्हणे भजावे शक्ती ॥ एक म्हणती थोर गणपती ॥ जीवेभावे अर्चिजे ॥३४॥

ऐसी शास्त्रे खटपटती ॥ एकाचे एक न मानिती ॥ षोडश सहस्त्र युवती ॥ तैशा जल्पती परस्परे ॥३५॥

जैसी वनचरे अपारे ॥ तैसी बोलती इतर शास्त्रे ॥ वेदांतसिंह गर्जता गजरे ॥ गर्भगळित सर्व होती ॥३६॥

जैसा देवांत वंद्य वैकुंठनाथ ॥ तैसा सर्वांसी मान्य वेदांत ॥ शस्त्रांत सुदर्शन लखलखित ॥ नवग्रहांत मित्र जैसा ॥३७॥

की रत्‍नांमाजी कौस्तुभमणि ॥ की नद्यांमाजी मंदाकिनी ॥ की काद्रवेयकुळांत मुकुटमणि ॥ भोगिनायक श्रेष्ठतो ॥३८॥

तैसे शास्त्रांमाजी विख्यात ॥ संत जाणती वेदांत ॥ तेथींचे बोलणे मान्य बहुत ॥ जन्ममरणमोचक जे ॥३९॥

असो नानामतांची बोलणी ॥ तैशा जल्पती इतर कामिनी ॥ वेदांतशास्त्र जैसी रुक्मिणी ॥ श्रेष्ठपणे बोलत ॥४०॥

ते आदिमाया मूळप्रकृती ॥ की ते अनंतवल्ली स्वयंज्योती ॥ जे इच्छामात्रे निश्चिती ॥ घडी मोडी ब्रह्मांड हे ॥४१॥

हे पुराणपुरुषाची ज्ञानकळा ॥ काय बोलिली ते वेळा ॥ म्हणे ऐका गे तुम्ही सकळा ॥ व्यर्थ गलबला करू नका ॥४२॥

तुमच्या सोळा सहस्त्र मंदिरी ॥ व्यापक एकचि कंसारी ॥ जैसे नाना घटमठांतरी ॥ एकचि अंबर व्यापक ॥४३॥

तैसा तुमच्या गे निजसदनी ॥ एकचि व्यापला चक्रपाणी ॥ अनंत ब्रह्मांडे भरोनी ॥ उरला असे परिपूर्ण ॥४४॥

सर्वव्यापक पूतनारी ॥ समान नांदे सर्वां मंदिरी ॥ हा निर्धार नेणोनि भेदकुसरी ॥ का गे व्यर्थचि भांडता ॥४५॥

ऐसी निर्वाणगोष्ट रुक्मिणी ॥ सांगता तन्मय जाहल्या कामिनी ॥ पुढे बोलावया भेदवाणी ॥ सहज खूंटली तेधवा ॥४६॥

ऐकता सद्‌गुरूचे वचन ॥ साधक शिष्य निवती पूर्ण ॥ तैसे रुक्मिणीच्या बोले समाधान ॥ सर्वांचेही जाहले ॥४७॥

असो सत्यभामा बोले ते क्षणी ॥ म्हणे ऐक वो भीमकनंदिनी ॥ आधी पुत्र झाला तुजलागोनी ॥ तरी मी वेणी देईन तुज ॥४८॥

मज जरी पुत्र जाहला आधी ॥ तरी मज तू वेणी देई त्रिशुद्धी ॥ ऐसे सत्यभामा बोलता शब्दी ॥ जगन्माता हांसली ॥४९॥

मग वस्त्रे विडे दिधली सकळा ॥ आपुल्या निकेतना गेल्या अबला ॥ तो नारदमुनि ते वेळा ॥ सहज आला द्वारके ॥५०॥

मनी म्हणे नारदमुनी ॥ बहुत आहेत कृष्णकामिनी ॥ परी यांमाजी ज्ञानखाणी ॥ निवडू आता कोण ते ॥५१॥

एक्या गोपीच्या मंदिरी ॥ नारद प्रवेशला ते अवसरी ॥ तिने पूजा करोनि निर्धारी ॥ मुनीश्वर तोषविला ॥५२॥

नारद पुसे तिजलागून ॥ परपुरुषी जडले तुझे मन ॥ तव ते बोले क्रोधायमान ॥ ब्रह्मपुत्रासी तेधवा ॥५३॥

म्हणे बरे हे तुमचे जी ध्यान ॥ आम्हांसी कृष्णावेगळे नाही ज्ञान ॥ म्हणता परपुरुषी मन ॥ नवल हेचि वाटते ॥५४॥

मग हांसिन्नला नारदमुनी ॥ प्रवेशला दुसरे सदनी ॥ तीस पुसे परपुरुषी कामिनी ॥ तुझे मन आहे की ॥५५॥

ते म्हणे तुम्ही चळलेती ॥ नसतेंचि पुसता आम्हांप्रती ॥ सत्यभामेसमवेत युवती ॥ याचि प्रकारे शोधिल्या ॥५६॥

जे ते लागे नारदाचे पाठी ॥ अर्थी कोणि न घाली दृष्टी ॥ जैसे संत बोलती निर्वाणगोष्टी ॥ पाखंडी घेती कुतर्क ॥५७॥

ऐसा मुनि हिंडता झाला हिंपुटी ॥ रुक्मिणीच्या गृहा आला शेवटी ॥ तिने नारद देखता दृष्टी ॥ उठाउठी समोर येत ॥५८॥

करूनि नारदासी नमन ॥ केले षोडशोपचारे पूजन ॥ नारदमुनि बोले वचन ॥ परपुरुषी मन आहे की ॥५९॥

ऐसे नारदमुनि बोलता ॥ विचारूनि बोले जगन्माता ॥ म्हणे परपुरुषाविण तत्त्वता ॥ मज क्षणभरी न राहवे ॥६०॥

आसनी भोजनी शयनी ॥ परपुरुषासी न विसंबे नारदमुनी ॥ परपुरुषासी न धरिता मनी ॥ मग जिणे व्यर्थ गेले ॥६१॥

जो चहू वाचांहूनि पर ॥ जो वेदशास्त्रांसी अगोचर ॥ तो हाचि स्वामी यादवेंद्र ॥ परात्परसोयरा हो ॥६२॥

ऐकोनि नारद सुखावला ॥ प्रेमे वंदिली रुक्मिणी बाळा ॥ म्हणे तू हरीची ज्ञानकळा ॥ तुझी लीला अगम्य ॥६३॥

तुझिया वो अपांगमाते ॥ सकळ संत होती ज्ञाते ॥ ऐसे स्तवोनि रुक्मिणीते ॥ नारद गेला स्वर्गासी ॥६४॥

तव सभा विसर्जूनि समस्त ॥ रुक्मिणीच्या मंदिरा कृष्णनाथ ॥ येता जाहला त्रिभुवनसमर्थ ॥ विलाससभेसी एकांती ॥६५॥

मंदिरा आला वैकुंठनाथ ॥ त्रिभुवनजननी ऐकता त्वरित ॥ उठोनि सामोरी प्रेमे येत ॥ अचळ रुळत चपळेऐसा ॥६६॥

पदसरोजी मस्तक ठेवूनी ॥ निंबलोण उतरी हरीवरूनी ॥ विलाससभेसी नेऊनी ॥ डोल्हारा बैसवी कृष्णाते ॥६७॥

जे अनंतशक्तीची स्वामिणी ॥ जे त्रिभुवनपतीची पट्टराणी ॥ जे प्रणवाची मूळपीठवासिनी ॥ ज्ञानखाणी रुक्मिणी ते ॥६८॥

शतचारी परिचारिका सत्वर ॥ पूजासामग्री देती परिकर ॥ आपुल्या हाते यादवेंद्र ॥ पूजी तेव्हा भीमकी ॥६९॥

आनकदुंदुभीचा महापुण्यमेरु ॥ तोचि हा श्रीकृष्ण जगद्‌गुरु ॥ जो मायाचक्रचाळक उदारु ॥ कैवल्यज्ञानदायक ॥७०॥

शुभ्र लघुचीर हाती घेऊनी ॥ हरीवरूनि वारीत रुक्मिणी ॥ जिचिया पदनखांवरूनी ॥ कोटि मकरध्वज ओवाळिजे ॥७१॥

इच्छामात्रेकरूनी ॥ अनंत ब्रह्मांडे रची ते क्षणी ॥ ब्रह्मादिक बाळे निर्मूनी ॥ निजोदरी पाळी जे ॥७२॥

जे त्रिभुवनलावण्यमांदुस ॥ तप्तसुवर्णवर्णी डोळस ॥ जिने वेधिले आदिपुरुषास ॥ निजगुणे आपुलिया ॥७३॥

सहज बोलता जगन्माता ॥ दंतप्रकाश पडे अवचिता ॥ पाषाण ते हिरे तत्त्वता ॥ होती सतेज तत्काळ ॥७४॥

ब्रह्मांड भेदूनि विशेष ॥ धावणे करी आंगींचा सुवास ॥ आकार ग्रासूनि समरस ॥ स्वस्वरूपी होइजे ॥७५॥

सहज चालता हंसगती ॥ पदतळमुद्रा जेथे उमटती ॥ तेथे सुवासकमळे विकसती ॥ धन्य क्षिती जाहले म्हणे ॥७६॥

तया कमळावरी वसंत ॥ भ्रमर होऊनि रुंजी घालीत ॥ चालता पदभूषणे गाजत ॥ देखोनि मन्मथ नृत्य करी ॥७७॥

दिनपति आणि रोहिणीपती ॥ काढिल्या तयांच्या अंतर्ज्योती ॥ तैसी कर्णपुष्पे तळपती ॥ डोल देती मुक्तघोस ॥७८॥

आकर्ण विशाळ पद्मनयन ॥ अंजन सोगयाचे विराजमान ॥ तडित्प्राय झळके पीतवसन ॥ शोभे मुक्तलग कंचुकी ॥७९॥

वज्रचूडेमंडित हस्त ॥ अवतारमुद्रा दाही झळकत ॥ पाचूचे पदक कंठी तळपत ॥ मुक्ताहार पीतवर्ण दिसती ॥८०॥

असो ऐसी ते ज्ञानकळा सुंदर ॥ हाती घेऊनि लघुचीर ॥ क्षीराब्धीची लहरी परिकर ॥ उडविता वस्त्र तैसे दिसे ॥८१॥

हस्त हालता किंचित ॥ पयोधर होती कंपित ॥ हरिस्वरूप देखता लज्जित ॥ कृष्णमुख ते जाहले ॥८२॥

हरिकरप्रताप देखोनि निवाड ॥ लपाले दिव्यकंचुकीआड ॥ सुकुमार दोघे परम भ्याड ॥ पल्लवे झांकी जगन्माता ॥८३॥

असो लघुचीर उडविता रुक्मिणी ॥ बोले हरीसी सुहास्यवदनी ॥ तुम्हा योग्य मी नव्हे चक्रपाणी ॥ चातुर्य काही समजेना ॥८४॥

तुमची सेवा करू नेणे सर्वथा ॥ गुण नव्हती बरवे पाहता ॥ रूप तुमचे जगन्नाथा ॥ सर्वांहूचि विशेष ॥८५॥

मी अत्यंत रूपहीन ॥ तुमचेही मजवरी नाही मन ॥ आता गोपी अत्यंत तरुण ॥ तयांसी भोग देइजे ॥८६॥

वरकड गोपी जैशा आवडती ॥ तैसी इकडे नाही प्रीती ॥ पट्टराणी नाम निश्चिती ॥ कोरडेचि थेविले ॥८७॥

जुने वस्त्र होता निश्चित ॥ दूरी करिती भाग्यवंत ॥ यावरी भीमकजामात ॥ मंदहास्यमुखे बोलतसे ॥८८॥

ऐसे काय बोलसी रुक्मिणी ॥ कोण सुंदर आहे तुजहूनी ॥ तू सकळचातुर्यखाणी ॥ ऐशी शाहाणी कोण असे ॥८९॥

ज्याचे भाग्य परिपूर्ण ॥ त्याकडे होय तुझे विलोकन ॥ तुझे जेथे न होय आगमन ॥ दरिद्रेकरूनि व्यापती ॥९०॥

तुवा नेणोनिया अबले ॥ मज कासया वरिले ॥ तुझे रूप सर्वांहूनि आगळे ॥ राजे भुलले पृथ्वीचे ॥९१॥

शिशुपाळ वक्रदंत भूपाळ ॥ जरासंधादि बहुत नृपाळ ॥ तुझ्या मनासी आवडेल त्यासी माळ ॥ आता तरी घाली का ॥९२॥

बाळपणींची सकळ कीर्ती ॥ तुवा ऐकिली असेल निश्चिती ॥ गोपी उखळासी बांधिती ॥ चोरी केली म्हणोनिया ॥९३॥

आम्ही रानचे रानवट गोवळ ॥ परनारी भोगिल्या केवळ सर्वे मेळवूनि गोपाळ ॥ हुंबळी घातली तयांशी ॥९४॥

सकळ राजे आम्हांसी हांसती ॥ छत्र सिंहासन नाही मजप्रती ॥ याति कुळ धर्मकर्मस्थिती ॥ आंगी नसे अणुमात्र ॥९५॥

पुरुषार्थ जरी म्हणती वीर ॥ तरी काळयवने पीडिले थोर ॥ दैवे लागले मुचुकंदविवर ॥ म्हणोनिया बरे जाहले ॥९६॥

धुतली अर्जुनाची घोडी ॥ घर्माघरी उच्छिष्टे काढी ॥ पार्थाचा सारथी हे प्रौढी ॥ बरी न दिसे लोकांत ॥९७॥

बैसावया नाही वाहन ॥ पक्ष्यावरी आरोहण ॥ न मिळे काही आंथरुण ॥ सर्पावरी शयन करी ॥९८॥

ऐकता सद्भक्तांचे कीर्तन ॥ नाचती लाज सोडूनी ॥ मी काळा तू गोरी सगुण ॥ स्वरूपगाठी पडेना ॥९९॥

मज काम नाही निःशेष ॥ असे एकाकी निःसंग उदास ॥ सर्वां घटी जैसा चंडांश ॥ व्यापोनिया अलिप्त ॥१००॥

ऐसी उदास वाक्ये ऐकोनी ॥ मनी गजबजली त्रिभुवनजननी ॥ अश्रुधारा लोटल्या नयनी ॥ वाटे कल्पांत लोटला ॥१॥

रुक्मिणीसी कैसा समय वाटला ॥ की अंगावरी पर्वत कोसळला ॥ की वर्षल्या प्रळयचपळा ॥ शब्दरूपे रुक्मिणीवरी ॥२॥

लघुचीर उडविता अकस्मात ॥ तैसीच पडली मूर्च्छागत ॥ प्राण व्याकुळ जाहले समस्त ॥ श्वासोच्छ्‍वास कोंडले ॥३॥

कोटिकंदर्पलावण्यसुंदर ॥ जगदानंदकंद यदुवीर ॥ डोल्हारियाखाली उडी सत्वर ॥ टाकोनिया पातला ॥४॥

मग श्रीहरि म्हणे ते वेळी ॥ कैंची आम्हांसी आठवली रळी ॥ म्हणोनि रुक्मिणी ह्रदयी धरिली ॥ आलिंगिली प्रीतीने ॥५॥

मी सहज विनोदेकरूनी ॥ बोलिलो जाण रुक्मिणी ॥ तुवा निकराचे लावण्यखाणी ॥ केला बहुत आम्हांवरी ॥६॥

रुक्मिणीतुजविण एक क्षण ॥ न गमे मज सर्वथा जाण ॥ तू आवडती जैसा प्राण ॥ सत्य वचन सुकुमारे ॥७॥

दितितांच्या भारेकरूनी ॥ पीडिली सर्व मंगळजननी ॥ परममंगळकारके रुक्मिणी ॥ अवतरलो म्हणोनि तुम्ही आम्ही ॥८॥

श्रृंगारसरोवरमराळिके ॥ चराचरउदयचंपककळिके ॥ परमकल्याणी भीमकन्यके ॥ सुखदायके नत्र उघडी ॥९॥

मग रुक्मिणीसी कडियेवरी ॥ उचलूनि घेत मधुकैटभारी ॥ निजविली डोल्हारियावरी ॥ पूतनारि हालवीत ॥११०॥

र्विजणा घेऊनि भगवंत ॥ मंद समीर वरी घालीत ॥ म्हणे शुभानने एक मात ॥ मजशी बोल ये क्षणी ॥११॥

कर्णी कर्पूर तेव्हा श्रीधरे ॥ शीतळ फुंकिला आपुल्या करे ॥ मुखशशांककलंक यादवेंद्र ॥ पीतांबरे पूसिला ॥१२॥

मग नेत्र उघडोनि रुक्मिणी ॥ दृढ लागली हरीच्या चरणी ॥ म्हणे त्रिभुवननायका चक्रपाणी ॥ तुझा महिमा न वर्णवे ॥१३॥

अनंतजन्मींचे सकृत ॥ एकदांचि फळले अद्‌भुत ॥ तरीच अर्धांग पावले सत्य ॥ जगन्निवासा तुमचे ॥१४॥

मग बोले जगज्जीवन ॥ वसुदेव देवकी दोघेजण ॥ त्यांची वाहतो यथार्थ आण ॥ मज तू पूर्ण आवडसी ॥१५॥

माझे ठायी तुझे अत्यंत मन ॥ बाळपणी तुवा सुदेव पाठवून ॥ पद्मनेत्रे तुझ्या पत्रेकरून ॥ कौंडिण्यपुरा मी आलो ॥१६॥

ऐसे नानापरी बोलोन ॥ केले रुक्मिणीचे समाधान ॥ लीलावतारी श्रीकृष्ण ॥ ब्रह्मानंद अवतरला ॥१७॥

पूर्ण एकांत देखोन ॥ रुक्मिणी हांसोनि बोले वचन ॥ म्हणे मज नाही पुत्रसंतान ॥ शून्य सदन दिसतसे ॥१८॥

ज्यांचे उदरी नाही पुत्र ॥ व्यर्थ गेला त्यांचा संसार ॥ अंती प्राप्ति नाही परत्र ॥ ऐसे शास्त्र बोलतसे ॥१९॥

परमचतुर सुंदर ॥ मदना ऐसा व्हावा पुत्र ॥ जो प्रचंड प्रतापशूर ॥ ज्यासी जगत्‌त्रय धन्य म्हणे ॥१२०॥

जैसी वेदआज्ञा प्रमाण ॥ तैसे वंदी मातृपितृवचन ॥ निजांगे सेवा करी अनुदिन ॥ तो पुत्र धन्य संसारी ॥२१॥

अपूर्व जे का वस्त ॥ आणूनि मातापितयांसी अर्पिजेत ॥ जोडली जोड न वंची सत्य ॥ तो पुत्र धन्य संसारी ॥२२॥

माझी मातापिता वृद्ध केवळ ॥ वांचोत ऐसी बहुत काळ ॥ मानी जैसी उमाजाश्वनीळ ॥ तो पुत्र धन्य संसारी ॥२३॥

मातापिता सद्‌‍गुरु देव ॥ येथे समान ज्याचा भाव ॥ नित्य नूतन आवडी स्वयमेव ॥ तो पुत्र धन्य संसारी ॥२४॥

शुक्तीच्या पोटी मुक्ताफळ ॥ की रंभागर्भी कर्पूर निर्मळ ॥ की वैरागर हिरा तेजाळ ॥ तो पुत्र धन्य संसारी ॥२५॥

धन्य त्या पुत्राची जननी ॥ जिची कीर्ति मिरवे त्रिभुवनी ॥ तेचि सर्व ऐश्वर्याची खाणी ॥ पुत्र ऐसा प्रसवेजे ॥२६॥

इतरा सूकरी खरी शुनी देखा ॥ अपवित्र पुत्र त्या निपुत्रिका ॥ पुढे भोगिती त्या अनेक नरका ॥ नाही सुटका तयांसी ॥२७॥

जो मातापितयांसी घाली बाहेरी ॥ श्वशुरवर्गासी सांठवी घरी ॥ जो स्त्रीलंपट दुराचारी ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥२८॥

व्यर्थ काय करावे बहु सुत ॥ जैसे एकदांचि पडिले जंत ॥ जे परम अविचारी उन्मत्त ॥ त्यांच्या भारे दुःखी धरा ॥२९॥

दाराकुमारा सर्व देत ॥ मातापितयासी दरिद्र भोगवीत ॥ कुशब्दवाणी ह्रदय भेदीत ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥१३०॥

आपुलीच वस्तु पिता मागे ॥ त्यावरी डोळे फिरवी रागे ॥ म्हणे मी तुमचे काय ऋण लागे ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३१॥

पिता सांगे हिता व बोध ॥ म्हणे हा सन्निपातला वृद्ध ॥ ह्रदय उले ऐसा बोले शब्द ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३२॥

म्हणे पिता माझा मूर्ख ॥ मी त्याहूनि चतुर अधिक ॥ मातेसी म्हणे करंटी देख ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३३॥

माता पिता दोघेजण ॥ मेली करिता अन्न अन्न ॥ मग करू धावे गयावर्जन ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३४॥

असतां न बोले धड वचन ॥ करविले नाही उदकपान ॥ मग लोकांसी दावी करूनि तर्पण ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३५॥

पूर्वी केला अपमान ॥ मग श्राद्धी करीत शतभोजन ॥ लटकेंचि लोकां दावी रडून ॥ त्याच्या भारे दुःखी धरा ॥३६॥

म्हणोनि सर्वगुणी संपन्न ॥ पुत्र व्हावा जैसा मदन ॥ ऐकता ऐसे भगवान ॥ तपालागी चालिला ॥३७॥

बळिभद्र उग्रसेन ॥ दोघांसी म्हणे नगरी करा जतन ॥ मग हिमाचळी जाऊन ॥ मांडिले अनुष्ठान पुत्रइच्छे ॥३८॥

एक संवत्सरपर्यंत ॥ निराहार तप करीत ॥ आराधिला उमाकांत ॥ पंचवदन विरूपाक्ष जो ॥३९॥

तपांती येऊनि कर्पूरगौर ॥ भेटी दिल्ही पुरस्कार ॥ म्हणे श्रीरंगा माग वर ॥ इच्छित मनी असेल तो ॥१४०॥

सुकुमार तू रुक्मिणीवर ॥ श्रम जाहला बहु थोर ॥ एवढा किंनिमित्त निर्धार ॥ तप कासया मांडिले ॥४१॥

तू वैकुंठनाथ जगदुद्धार ॥ तुज मी ह्रदयी ध्यातो निरंतर ॥ कासया तप मांडिले दुर्धर ॥ द्वारकाधीशा यदुपति ॥४२॥

हरि म्हणे पंचवदना ॥ विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना ॥ उमावल्लभा नागभूषणा ॥ वरदान देई मज आता ॥४३॥

केवळ जैसा मकरध्वज ॥ ऐसा पुत्र देई सतेज ॥ ऐकोनि म्हणे कैलासराज ॥ उदरा येईल मदनचि ॥४४॥

पूर्वी म्यां जो दग्ध केला ॥ तो अनंग होऊनि राहिला ॥ तो तुझिया उदरी घननीळा ॥ पुत्र होईल प्रद्युम्न ॥४५॥

शिवे शापावया काय कारण ॥ ते कथा ऐका भक्तजन ॥ पूर्वी दक्षाच्या यागी जाण ॥ देह समर्पिला पार्वतीने ॥४६॥

मग तो दक्ष शिवे मारिला ॥ त्यावरी निःसंग शिव एकला ॥ बहुतकाळ तप आचरला ॥ हिमाचळी जाऊनिया ॥४७॥

पार्वती हिमाचळाचे पोटी ॥ पुनः अवतरली ते गोरटी ॥ तिने आराधिला धूर्जटी ॥ वर व्हावा म्हणोनिया ॥४८॥

नारद म्हणे हिमाद्रीप्रती ॥ जे शिवप्रिया जाण पार्वती ॥ हे त्यासीचि देई मागुती ॥ निश्चयेसी नगोत्तमा ॥४९॥

ते हिमाद्रीसी मानले वचन ॥ मग येउनि सरोजासन ॥ शिवगौरीचे लाविले लग्न ॥ सर्व देव मिळोनिया ॥१५०॥

तव पुढे जाहला तारकासुर ॥ जो त्रैलोक्यासी अनिवार ॥ सकळ देव करिती विचार ॥ केवी संहार होय याचा ॥५१॥

मग बृहस्पति बोलत ॥ शिवासी होइल जेव्हा सुत ॥ त्याच्या हाते पावेल मृत्य ॥ तारकासुर निर्धारे ॥५२॥

तरी शिव असे व्रतस्थ ॥ कामत्यागे तप करीत ॥ त्यासी काम उद्भवेल सत्य ॥ तरीच सुत होय पै ॥५३॥

मग देवी पाठविला मदन ॥ वेगी भुलवी पंचवदन ॥ यावरी तो हिमाचळी येऊन ॥ पार्वतीजवळ राहिला ॥५४॥

जेथे शिव करी अनुष्ठान ॥ वसंते श्रृंगारिले ते वन ॥ पार्वती कामासहित येउन ॥ शिवाजवळी उभी ठाके ॥५५॥

मदन शिवाच्या ह्रदयी भरला ॥ तेणे ध्यानासि विक्षेप केला ॥ क्रोधे तृतीय नेत्र उघडिला ॥ प्रळय वाटला सकळांसी ॥५६॥

आतूनि निघाला प्रळयाग्न ॥ जाळूनि भस्म केला मदन ॥ मग शिव पाहे विचारून ॥ पंचबाण व्यर्थ जाळिला ॥५७॥

हा कार्यासी देवी पाठविला ॥ म्या व्यर्थ जाळूनि भस्म केला ॥ तो मदनस्त्री ते वेळा ॥ रति आली धावूनि ॥५८॥

शिवापुढे रति सुंदरी ॥ करुणस्वरे शोक करी ॥ शिव म्हणे कृष्णाच्या उदरी ॥ पति तुझा जन्मेल ॥५९॥

मग ते रति अरण्यात ॥ पतीलागी शोक करीत ॥ मृगयेसि आला शंबर दैत्य ॥ रती तेथे देखिली ॥१६०॥

म्हणे कोणाची तू सुंदरी ॥ एकली हिंडसी वनांतरी ॥ तू माझी कन्या निर्धारी ॥ चाल माझिया मंदिरा ॥६१॥

असो शंबराचिया घरी ॥ रति नित्य स्वयंपाक करी ॥ शंबर तिचा विश्वास धरी ॥ आपुली कन्या म्हणोनिया ॥६२॥

इकडे हरि द्वारकेसी आला ॥ पुढे रुक्मिणीसी गर्भ राहिला ॥ तो सत्यभामेसी धाक उपजला ॥ पुत्र होईल म्हणोनिया ॥६३॥

मी बोलले वेणीचा पण ॥ तो आता आम्हांवरी येईल परतोन ॥ जैसा आपुल्या सदनी अग्न ॥ आपणचि लावी मूर्खपणे ॥६४॥

तव नव मास भरता पूर्ण ॥ प्रसूत जाहली रुक्मिणी जाण ॥ पोटासी आला पंचबाण ॥ स्वरूपलावण्य कोण वर्णी ॥६५॥

प्रद्युम्न उपजला जेव्हा ॥ एकचि वाद्यघोष लागला तेव्हा ॥ भांडार फोडूनि याचका सर्वा ॥ द्रव्य अपार वाटिले ॥६६॥

द्वारी मंडप उभविले ॥ श्रीकृष्णे पुत्रमुख पाहिले ॥ ते मदनस्वरूप देखिले ॥ उपमा न चले दूसरी ॥६७॥

शिववरेकरून ॥ पोटासी आला पंचबाण ॥ शिवे अनंग केला जाळून ॥ तो हा प्रद्युम्न मूर्तिमंत ॥६८॥

असो पाचव्या दिवशी श्रीकृष्ण ॥ देवीचा नवस करावया पूर्ण ॥ शक्तिवनासी जगज्जीवन ॥ यादवांसहित गेला हो ॥६९॥

नारद सत्यभामेचा सदना आला ॥ तिने सर्व समाचार श्रुत केला ॥ म्हणे रुक्मिणीसीपुत्र जाहला ॥ कैसे करावे सांग पा ॥१७०॥

म्हणे म्या वेणीचा केला पण ॥ मग हांसे कमलोद्भवनंदन ॥ ज्यासि भूत भविष्य वर्तमान ॥ सर्व ज्ञान ठाऊके ॥७१॥

सत्यभामेसी म्हणे मुनीश्वर ॥ मदनशत्रु असे शंबर ॥ त्यासी हे वर्तमान समग्र ॥ श्रुत करू जाऊनिया ॥७२॥

मग शंबराचिये मंदिरासि ॥ नारद पावला वेगेसी ॥ म्हणे तुझा मृत्यु द्वारकेसी ॥ जन्मला असे जाण पा ॥७३॥

विषवल्लीचा मोड लहान ॥ आहे तो टाकावा खुडोन ॥ लहान म्हणो नये कृशान ॥ आधी विझवून टाकावा ॥७४॥

परम कपटी शंबर ॥ द्वारावतिये आला सत्वर ॥ रुक्मिणीच्या मंदिरात तस्कर ॥ गुप्तरूपे प्रवेशला ॥७५॥

सूत्रधारी यादवेंद्र ॥ करावया दैत्यांचा संहार ॥ तेणे हे रचिले मायाचरित्र ॥ म्हणोनि शंबर प्रवेशला ॥७६॥

असो संबरे उचलोनि बाळ ॥ घेऊन गेला तात्काळ ॥ परम सुंदर वेल्हाळ ॥ जो भीमकीउदरी जन्मला ॥७७॥

दैत्य समुद्रतीरा आला सत्वर ॥ चरणी धरिला पंचशर ॥ शंबर परम दुराचार ॥ भवंडोनि सागरी टाकिला ॥७८॥

ते रुक्मिणीचे गर्भरत्‍न ॥ मत्स्ये गिळिले न लगता क्षण ॥ द्वारकेसी काय जाहले वर्तमान ॥ भीमकी जागी जाहली ॥७९॥

पुढे न दिसेचि कुमर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ भीमकी शोक करी अपार ॥ द्वारकानगर गजबजिले ॥१८०॥

तो शक्ति पूजोनि सत्वर ॥ द्वारकेसी आला यदुकुलदिनकर ॥ कुमर नेला ते कारण समग्र ॥ अंतरी कळले तेधवा ॥८१॥

देवाधिदेव यादवराय ॥ सकळ जाण त्याचा गुरु होय ॥ परी लीलावेष अभिप्राय ॥ ठायी ठायी संपादी ॥८२॥

असो रुक्मिणीचिया मंदिरा प्रती ॥ येता जाहला वैकुंठपती ॥ तव ते शोक करिती लोकरीती ॥ सकळ स्थिती जाणोनिया ॥८३॥

बहुत तपे व्रताचरण ॥ करिता देखिले पुत्रनिधान ॥ पूर्वकर्माचे फळ पूर्ण ॥ प्राप्त जाहले हे दिसे ॥८४॥

अहा हारपले दिव्य रत्‍न ॥ माझे चोरूनि नेले निधान ॥ वंशवल्लीचे रोप उपडोन ॥ कोणी नेले कळेना ॥८५॥

यदुकुळी दिव्य दीप लाविला ॥ सवेंचि कोण्या दुष्टे विझविला ॥ पयोधरी पान्हा फुटला ॥ पाजू कोणा ये वेळे ॥८६॥

श्रीरंग म्हणे रुक्मिणी ॥ तू शोक सांडी ये क्षणी ॥ पुन्हा पुत्र देखेसी नयनी ॥ द्वादश वर्षानंतरे ॥८७॥

असो इकडे सागरी पंचशर ॥ टाकोनि गेला शंबर ॥ मत्स्ये गिळिला कृष्णकुमार ॥ तेथे श्रीधर रक्षी तया ॥८८॥

जो अनंत ब्रह्मांडे रक्षिता ॥ त्यासि पुत्र रक्षावया काय अशक्यता ॥ जो मायाचक्रचाळिता ॥ मायेपरता विश्वंभर ॥८९॥

शुक्रशोणितांचे पुतळे ॥ जननीजठरी कोणे रक्षिले ॥ नेत्र कर्णादि अवयव कोरिले ॥ ठायींचे ठायी कोणे हो ॥१९०॥

जठराग्नि अन्न भस्म करी वेगे ॥ परी त्या गर्भासी धक्का न लागे ॥ तेथे उदरनिर्वाह श्रीरंगे ॥ केला कैसा नेणे कोणी ॥९१॥

उपजलियावरी बाहेरी ॥ जननीच्या वक्शस्थळा भीतरी ॥ दुग्धरस निर्माण करी श्रीहरी ॥ कोणेपरी कळेना ॥९२॥

नवछिद्र वपु भग्न ॥ माजी वायुरूपे वसे प्राण ॥ तो कदा न निघे मर्यादेविण ॥ ऐसे करणे हरीचे ॥९३॥

शरीरी कैसा घातला प्राण ॥ जाता कदा नव्हे दृश्यमान ॥ सकळ करणांचा चाळक पूर्ण ॥ याविण कोण दूसरा ॥९४॥

ऐसा जो सर्वनियंता ॥ तेणे मत्स्योदरी रक्षिले मन्मथा ॥ मत्स्यघ्ने तो अवचिता ॥ जाळे घालोनि धरियेला ॥९५॥

परम तेजस्वी दिसे मीन ॥ अंतरी वसे मीनकेतन ॥ मनी भावी मत्स्यघ्न ॥ हा रायासी नेऊन मत्स्य द्यावा ॥९६॥

मग तात्काळ तो मत्स्य नेऊनी ॥ शंबरासी दिधला ते क्षणी ॥ दैत्य आश्चर्य करी मनी ॥ मीन देखोनि तेधवा ॥९७॥

मग रतीजवळी ते वेळे ॥ मत्स्य पाठविला पाकशाळे ॥ मत्स्यकलेवर तिने चिरिले ॥ आंतूनि निघाले दिव्य बाळ ॥९८॥

जैसा बालसूर्य प्रकटला ॥ तैसा स्वकांत रतीने देखिला ॥ हर्षे निर्भर झाली बाला ॥ म्हणे कैसे करू आता ॥९९॥

शंबरासी कळता मात ॥ तो मनी मानील विपरीत ॥ तव नारदमुनि अकस्मात ॥ गुप्तपणे प्रवेशला ॥२००॥

रतीसी म्हणे सावधान ॥ तुझा भ्रतार हा ओळखे मदन ॥ यासी करी तू बहुत जतन ॥ कृष्णनंदन हा असे ॥१॥

नारदे रतीसी दिधला मंत्र ॥ म्हणे हा तुजचि दिसेल किशोर ॥ वरकडांसी नव्हे गोचर ॥ ऐसा वर दीधला ॥२॥

कामधेनु नित्य येऊन ॥ यासी करवील स्तनपान ॥ ऐसे सांगोनि चतुर्मुखनंदन ॥ स्वर्गपंथे पै गेला ॥३॥

मग तो आपुला भ्रतार निश्चिती ॥ पाळणा घालोनि हालवी रती ॥ जैसा शुक्लपक्षी रोहिणीपती ॥ वाढे तैसा त्वरेने ॥४॥

द्वादश वर्षेपर्यंत ॥ रतीने वाढविला मन्मथ ॥ नारद क्षणक्षणा येत ॥ सांभाळीत कृष्णसुता ॥५॥

नारदे सुदिन पाहोन ॥ तत्काळ लाविले गांधर्वलग्न ॥ आपुल्या हाते शेस भरून ॥ रतिमदना ऐक्य केले ॥६॥

ऐसा काही काळ लोटला ॥ रतीसी तत्काळ गर्भ राहिला ॥ तो शब्द बाहेरी प्रकटला ॥ कर्णी आला दैत्याच्या ॥७॥

रतीने गुप्त पुरुष आणूनी ॥ भोगिता जाहली गर्भिणी ॥ शंबराच्या मनी क्रोधाग्नी ॥ परम पेटला तेधवा ॥८॥

मंत्रास्त्र धनुष्य बाण ॥ नारदे मदनासी दिधले आणून ॥ शंबरे दळभारेसी सिद्ध होऊन ॥ रतिमंदिर वेढिले ॥९॥

रति जाहली भयभीत ॥ म्हणे स्वामी आता कैसा वृत्तांत ॥ तुम्ही एकले दैत्य अद्‌भुत ॥ थोर अनर्थ ओढवला ॥२१०॥

तव यदुकुलवर्धन कुमार ॥ प्रचंडप्रतापी रणधीर ॥ रतीसी म्हणे चिंता अणुमात्र ॥ शुभवदने करू नको ॥११॥

पर्वताच्या दरीमधून ॥ जैसा अकस्मात निघे पंचानन ॥ द्वाराची अर्गळा हाती कवळून ॥ हाक देत प्रकटला ॥१२॥

काळेचि काय फोडिली हांक ॥ ऐकता दचकले दैत्यकटक ॥ शुष्क वनांत पावक ॥ भीमकीतनुज प्रकटला ॥१३॥

पवनगती फिरे पंचशर ॥ अर्गळा घाते करी वीरांचा चूर ॥ जैसे बहुत अजांचे भार ॥ एकला व्याघ्र विभांडी ॥१४॥

शंबर म्हणे रे तस्करा ॥ का हिंडतोसी सैरावैरा ॥ ऐसे ऐकतांचि सत्वरा ॥ धनुष्य सज्जिले पंचबाणे ॥१५॥

वर्म लक्षूनिया शंबर ॥ सोडी शरापाठी शर ॥ परी नाटोपे पंचशर ॥ पंचवक्त्रशत्रु तो ॥१६॥

केले बहुत शस्त्रांचे प्रेरण ॥ तृणाऐसे भस्म करी मदन ॥ युद्ध केले सप्त दिन ॥ सेना संपूर्ण आटिली ॥१७॥

आधीच कृष्णाचे वीर्य विशेष ॥ त्याहीवरी नारदाचा उपदेश ॥ दैत्यप्राण घ्यावया निःशेष ॥ दिव्य बाण घेतला ॥१८॥

धनुष्य ओढूनि आकर्ण ॥ पंचशरे सोडिला बाण ॥ शंबराचे शिर छेदून ॥ आकाशपंथे उडविले ॥१९॥

जाहला एकचि जयजयकार ॥ वृंदारक वर्षती पुष्पसंभार ॥ जयवंत जाहला कृष्णकुमर ॥ वाद्यगजर लागले ॥२२०॥

संगे घेऊनि दळभार ॥ दिव्य रथी आरूढे कृष्णकुमर ॥ रतीसी रथी बेसवोनि सत्वर ॥ द्वारावतिये चालिला ॥२१॥

द्वारकेजवळी आला मदन ॥ वाद्यगजरे गाजे गगन ॥ पुढे पाठविले बंदीजन ॥ श्रीकृष्णासी सांगावया ॥२२॥

श्रीकृष्णासी सांगती हेर ॥ विजयी होऊनि तुमचा कुमर ॥ भेटावया आला सत्वर ॥ रतीसहित श्रीकृष्ण ॥२३॥

उग्रसेन उद्धव अक्रूर ॥ भोगींद्र आणि यादवेंद्र ॥ सहित प्रजा दळभार ॥ आले बाहेर भेटावया ॥२४॥

जैसा कृष्ण तैसा प्रद्युम्न ॥ किरीटकुंडले घनश्यामवर्ण ॥ चतुर्भुज पीतवसन ॥ दुसरा श्रीकृष्ण लोक म्हणती ॥२५॥

प्रद्युम्ने साष्टांग नमस्कार घातला ॥ सप्रेम श्रीकृष्णासी भेटला ॥ उग्रसेनवसुदेवे आलिंगिला ॥ बळिभद्रादि सर्व यादवी ॥२६॥

नारदे तत्काळ येऊन ॥ सांगितले सर्व वर्तमान ॥ मग रतीसी हाती धरून ॥ भीमकीसदना चालिला ॥२७॥

रुक्मिणीच्या घरी गोपिका ॥ मिळाल्या सकळ कृष्णनायिका ॥ तो रतिसहित मदन देखा ॥ समीप देखिला समस्ती ॥२८॥

गोपींसि कैसे भासत ॥ की नूतन स्त्री घेऊनि कृष्णनाथ ॥ आला भाविती समस्त ॥ रुक्मिणीसी वाटे तैसेचि ॥२९॥

भीमकी सरसावी अचळ ॥ तो मदने धरिले चरणकमळ ॥ श्रीकृष्णही आला तत्काळ ॥ घननीळ मग बोले ॥२३०॥

पुत्रासी भेटे रुक्मिणी ॥ अश्रु लोटले तिचे नयनी ॥ पान्हा फुटला निजस्तनी ॥ ह्रदयी धरिले मदनाते ॥३१॥

सासूसासरिया ते वेळे ॥ समस्तांसी रतीने नमस्कारिले॥ मग दिव्य मंडप उभे केले ॥ भीमकीचे द्वारी तेधवा ॥३२॥

भांडार फोडिले बहुत ॥ याचक सुखी केले समस्त ॥ तो नवमास भरता प्रसूत ॥ रति जाहली संभ्रमे ॥३३॥

बाळ जाहला सुकुमार ॥ अनिरुद्ध नाम ठेवी यदुवीर ॥ तोही घनश्याम सुंदर ॥ मदनावतार दुसरा ॥३४॥

श्रीकृष्ण मदन अनिरुद्ध ॥ तिघांचे एकचि रूप प्रसिद्ध ॥ ऐसा द्वारकेमाजी ब्रह्मानंद ॥ आनंदकंद नांदतसे ॥३५॥

सोळा सहस्त्र कृष्णनायिका ॥ तितुक्यांसही पुत्र जाहले देखा ॥ दहा पुत्र एक कन्यका ॥ समसमान सर्वांते ॥३६॥

एक लक्ष साठ सहस्त्र ॥ श्रीकृष्णासी जाहले पुत्र ॥ द्वारकेशी सोहळा निरंतर ॥ पुत्रोत्साह होतसे ॥३७॥

तितुक्या पुत्रांची मौजीबंधने ॥ करूनिया नारायणे ॥ देशोदेशीम्चे नृप कन्यारत्‍ने ॥ आणोनि देती तयांसी ॥३८॥

सोळा सहस्त्र कुमारी ॥ तितुक्यांसी वर पाहोनि देत मुरारी ॥ नित्य सोहळा घरोघरी ॥ नानाप्रकरे होतसे ॥३९॥

कुटुंबवत्सल्जगज्जीवन ॥ नित्य नित्य सोहळा नूतन ॥ इंद्रादि देव संपूर्ण ॥ त्रिकाळ येती दर्शना ॥२४०॥

पूर्णावतार श्रीरंग ॥ जो क्षीराब्धिजाह्रदयपद्मभृंग ॥ पूर्ण ब्रह्मानंद निःसंग ॥ द्वारावतिये पातला ॥४१॥

हरिविजयग्रंथ हाचि कस्तुरी ॥ सुवासे निजभक्तांसी तृप्त करी ॥ परम सभाग्य ते वंदिती शिरी ॥ अहोरात्र न विसंबिती ॥४२॥

निंदक सदा वटवटती परम ॥ जे परम अपवित्र दुर्दुर ॥ परदोषकर्दमी लोळणार ॥ कस्तूरी साचार नावडे त्या ॥४३॥

या मृगमदाचे भोक्ते भाग्यवंत ॥ ज्या घरी दैवी संपत्ति विराजित ॥ त्यांसी हरिविजयग्रंथ आवडत ॥ कायावाचामनेसी ॥४४॥

ब्रह्मानंदा भक्तवत्सला ॥ मन्मथजनका तमालनीळा ॥ श्रीधरवरदा अतिनिर्मळा ॥ अभंगा अढळा जगद्‌गुरो ॥४५॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ प्रेमळ पंडित परिसोत ॥ सप्तविंशतितमाध्याय गोड हा ॥२४६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel