राजा दुर्जेय शिकारीसाठी अरण्यात हिंडत होता. दोन-तीन दिवस होऊन गेले होते, तरी शिकार मिळाली नव्हती. आज तर दैवाने त्याची आणि सैन्याची ताटातूट केली होती.दोघांची चुकामूक झाल्याने तो एकटाच भटकत होता. मृगयेशिवाय परत फिरणे शक्य नव्हते. तो थकला शरीराने आणि मनानेही ! ’कोठे जलाशय असेल तर पाणी प्यावे, थोडी विश्रांती घ्यावी अन् पुन्हा मृगयेचा शोध घ्यावा,’ असा विचार करीतच तो त्या अरण्यात फिरत होता. फिरता फिरता नुपूरांचा मंजुळ आवाज त्याच्या कानी आला. तो थोडा थबकला. लक्ष देऊन त्याने ऐकले. पुन्हा तोच आवाज आला. दुसर्‍याच क्षणी एक सुरेल तान कानावर आली. ’या अशा अरण्यात स्‍त्रीचा आवाज ?’ राजाला आश्‍चर्य वाटले. त्याने त्या आवाजाचा वेध घेतला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला.

थोडयाच वेळात त्याला एक विस्तीर्ण जलाशय दिसला. भोवतालच्या उंच उंच वृक्षराजींनी त्याला वेढले होते. त्यामुळे त्याला बंदिस्तपणा आला होता. त्याचबरोबर त्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्‍त झालेले होते. निळ्याशार आकाशाचे त्यात प्रतिबिंब पडलेले होते. ती निळाई त्या पाण्याने आपल्यात सामावून घेतली होती. शेकडो पांढरी कमळे विकसित झाल्याने त्या पार्श्‍वभूमीवर ती उठून दिसत होती. तलावाच्या काठी परागांचा, पाकळ्यांचा गालिचा घातला होता. पक्ष्यांच्या सुमधुर आवाजांनी वातावरण भारावून गेले होते. त्या अथांग जलराशीकडे पाहून राजा प्रसन्न झाला. त्याचे मन सुखावले. त्याचा श्रमपरिहार झाला.

तो आणखी पुढे गेला आणि त्याचे पाय धरणीलाच खिळले. समोरच्या दृश्याकडे तो डोळे विस्फारुन पाहू लागला. समोर एक अत्यंत लावण्यवती युवती एका शिलाखंडावर बसली होती. मोकळ्या आवाजात गात होती. त्या तालावर आपले पाय हलवीत होती. त्याबरोबर नुपूरांचा आवाज झंकारत होता. ते अप्रतिम लावण्य, सुरेल आवाज ऐकून राजा मोहित झाला. मंत्रमुग्ध झाला. त्याचे पाय नकळत त्या दिशेने जाऊ लागले. तो जवळ गेला. अगदी जवळ. तिला चाहूल लागली. गाणं थांबलं. तिने वर पाहिलं, अन् तीही पाहतच राहिली. अनिमिष नेत्रांनी ! राजाची ती भव्य शरीरयष्‍टी. पीळदार शरीर. जणू मूर्तिमंत पराक्रम तिच्यासमोर उभा होता. आणि लावण्य ? प्रती कामदेवच ! सौंदर्य आणि पराक्रम यांचा एवढा विलक्षण संगम तिनेही पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्याच्याकडे पाहतानाच तिच्या लक्षात आलं, राजा टक लावून पाहतो आहे. तिची नजर खाली झुकली. तिनं मृदू आवाजात विचारलं,
"आपण ? इथे ?"
"मी...राजा दुर्जेय. मृगयेसाठी या अरण्यात आलो आहे."
"मिळाली मृगया ?"
"अजून नाही. पण..."
"पण काय ?"
त्या युवतीने राजाकडे एक स्नेहार्द्र कटाक्ष टाकला. त्याकडे पाहत तो म्हणाला, "या ठिकाणी आलो आणि माझीच मृगया झाली.""आपली....मृगया ?" ती युवती हसली. मुक्‍त हसली. राजाच्या मनात चांदणं पसरलं. क्षणभर राजा गप्प झाला. मग त्याने विचारले, "हे देवी ! माझा परिचय विचारलास. पण तुझा परिचय ? तू कोण आहेस ? इथे, या अरण्यात कशासाठी आलीस ?" "राजा, मी उर्वशी आहे. मला निसर्गसान्निध्याची आवड आहे. हे शांत, एकांत ठिकाण मला फार आवडतं. अनेक वेळा मी इथे येते. मनसोक्‍त राहते." थोडा विचार करुन ती म्हणाली, "आपल्याला आवडलं हे ठिकाण ?" "आवडलं. खरंच रम्य स्थान आहे. इथला एकांतही मनाला भूलविणारा आहे." क्षणभर विचार करुन राजा पुढे म्हणाला, "देवी, एक गोष्‍ट विचारली तर..."
"विचारा ना ! " तिने राजाकडे पुन्हा एकदम नेत्रकटाक्ष टाकला. "आपल्याबरोबर या रम्य ठिकाणी काही काळ घालविता आला तर....खरं म्हणजे आपण नित्यच माझ्या सहवासात आलात तर-" उर्वशीचे नेत्र झुकले. ती भारावल्यासारखी उठली. राजाजवळ जाऊन, त्याचा हात हाती घेत म्हणाली, "महाराज ! आपण माझ्या मनातलं बोललात. या रम्यस्थळी आपला सहवास मिळाला तर माझं भाग्य थोर आहे, असं मी मानेन."
उर्वशीची संमती मिळताच त्या स्थळी तो उर्वशीसह राहू लागला. तिच्या सहवासात तो सारं विसरला. त्याला त्याच्या राज्याचे भान राहिले नाही. पतिव्रता पत्‍नीची आठवण झाली नाही. दिवस उगवत होते आणि मावळत होते. वद्य पक्षातल्या रात्री सरुन शुद्ध पक्षातल्या येत होत्या. खरं पाहिलं तर तिच्या सहवासाचं, प्रेमाचं चांदणं राजावर सततच बरसत होतं. वद्यपक्षातही ! ऋतूही बदलत होते, पण दोघांनाही त्याचे भान नव्हते. आणि एक दिवस मात्र त्याला सारं आठवलं-राज्य, प्रियपत्‍नी, आणखीही खूपसं ! तो अस्वस्थ झाला. त्याला घरची ओढ लागली. तो उर्वशीला म्हणाला, "प्रिये, तुझ्या संगतीत काळ कसा गेला हे समजलंही नाही. मी राज्य वगैरे सारं विसरलो होतो; पण असं करणं योग्य नव्हे. मला राज्यकर्तव्ये केली पाहिजेत."
"महाराज, माझंही असंच झालंय; पण मी अजून अतृप्‍त आहे. आपण इथंच राहा. मला सोडून जाऊ नका."
"नको, उर्वशी, मला आग्रह करु नकोस. मला जाऊ दे. फारतर मी राज्याची व्यवस्था लावून परत येतो. अगदी लवकर..."
"आणि नाही आलात तर ? आपल्या पत्‍नीने विरोध केला तर ? मला बाई भीती वाटते. आपण जाऊच नका."
राजालाही मोह सुटत नव्हता. तरीही त्याने तिची समजूत घातली. परत येण्याचे वचन दिले. आणि जड पायाने तो तेथून निघाला. शरीर पुढे जात होते, मन वळून पाहत होते. त्याने मागे पाहिले, उर्वशी त्याला खुणावत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांतले भाव सांगत होते, ’लवकर यायचं हं ! विसरायचं नाही. मी वाट पाहते आहे.’
राजा दुर्जेय राजधानीत आला. राजधानी आनंदाने मोहरली. प्रजेने त्याचे स्वागत केले. राजवाडयावर वार्ता गेली. मंगल वाद्ये वाजू लागली. कस्तुरी-केशराचे सडे घातले. महालांना तोरणे बांधली. राणीने स्वागताची तयारी केली. अलंकार घातले. राजा येताच पंचारतीने त्याला ओवाळले. पण राजाचा चेहरा प्रसन्न दिसला नाही. चिंतेची, काळजीची, निराशेची छाया त्याच्या मुखावर होती. दोघेही महालात गेले. राणीला वाटले, ’महाराज थकले असतील. दमले असतील. आल्या आल्या कशाला विचारायचे ?’ म्हणून ती म्हणाली, "महाराज ! आपण खूप दमलेले दिसता. विश्रांती घ्यावी. मग बोलू." राणी निघून गेली. हरवलेल्या मनाने राजा कितीतरी वेळ विश्रांती घेत होता.
राणी पुन्हा आली तरी राजा विमनस्क स्थितीतच झोपलेला होता. जवळ येऊन तिने स्निग्ध दृष्‍टीने त्याच्याकडे पाहिले. त्या प्रेमळ दृष्‍टीने आपल्यावर अमृताचा वर्षाव होतो आहे, असे राजाला वाटले. उर्वशीच्या नेत्रांतली मादकता तेथे नव्हती. तेथे तेवत होती देवघरातली स्निग्ध, शांत प्रकाशाची निरांजने ! तिने हळुवारपणे विचारले, "नाथ, आपण अस्वस्थ का ? इतके दिवस कुठे गेला होता ? आपल्या वाटेकडे मी डोळे लावून बसले होते. मनात नाही नाही त्या शंका थैमान घालीत होत्या. कुठे होतात आपण ?" त्याने राणीकडे पाहिले. किती कृश झाली होती ती ! चेहरा म्लान होता. राजा वरमला. त्याला स्वतःचीच लाज वाटली. ’इथे या पतिव्रतेला सोडून, क्षणाच्या मोहाने मी हे भलतेच काय केले ?’ या विचाराने राजा बेचैन झाला, राणीच्या प्रेमळ आग्रहाचा शेवटी विजय झाला. त्याने खालच्या मानेने, शरमेने, राजधानीतून गेल्यानंतरची सारी कहाणी सांगितली. विस्फारलेल्या डोळ्यांनी तिने ती ऐकली. ती संतापली. खूप रागावली; पण पोटातला राग तिने मोठया प्रयासाने ओठावर येऊ दिला नाही. सारे ऐकून झाल्यावर ओठात तोच गोडवा कायम ठेवून म्हणाली, "नाथ, झाली गोष्‍ट चांगली झाली नाही; पण आपल्याला त्याचा पश्‍चात्ताप झालेला दिसतोय. पश्‍चात्तापाने पाप धुऊन जातं. आपण हे सारं विसरुन जा. मला यातलं काही माहीत नाही असं समजा. आपले कुलगुरु कण्वमुनी त्यांच्या दर्शनाला जा. त्यांना हे सारं सागून, एखादं प्रायश्‍चित्त घ्यायला सांगितलं तर घेऊन, मग आपण परत या. मी आपले आनंदाने स्वागत करीन. राज्याची काळजी करु नका. आजपर्यंत आपल्या कृपेनं राज्य सांभाळलं, तसंच आपण येईपर्यंत सांभाळीन. आपण निश्‍चिंत मनाने जा; पण अशा स्थितीत आपण फार काळ राहणं योग्य नाही, असं मला वाटतं."
त्या धीरगंभीर वाक्‌प्रवाहाने राजा भारावला. आपल्या पत्‍नीच्या आकाशाएवढया मोठया हृदयाने तो दिपून गेला. तो अपराधी मुद्रेने आणि दबल्या आवाजात म्हणाला, "प्रिये, मला एवढं समजावून घेतलंस. खरंच मी भाग्यवान आहे. राज्याच्या दृष्‍टीने आणि तुझ्याही दृष्‍टीने विचार करता मी अयोग्य वर्तन केले. आता माझी चूक मला उमगली. तुझ्या प्रेमाने मला धीर आला. मी कण्वमुनींच्याकडे जाऊन प्रायश्‍चित घेईन, मगच परत येईन. जातो मी." राजा महालातून बाहेर पडला. अश्‍वावर बसून तो कण्वमुनींच्या आश्रमात आला. त्या पावन परिसरात पदार्पण केल्यावर त्याच्या मनात पवित्र विचार येऊ लागले. पश्‍चात्तापाची तीव्रता वाढली. तो कण्वांच्या समोर गेला. त्याने पूजन करुन, त्यांना साष्‍टांग नमस्कार केला. ते म्हणाले, "बस, राजा, या आसनावर बस. तुझं सारं क्षेम आहे ना ?" राजाची मान खाली झुकली. त्यांनी पुन्हा विचारले, "अरे, बोलत का नाहीस ? काही संकटात तर नाहीस ना ?" "मुनिवर, आपण अंतर्ज्ञानी आहात. आपण सारं ओळखलंच असेल. पण तरीही सारं सांगतो. गुरुदेवांपासून कोणतीही गोष्‍ट लपवून ठेवायला मी असमर्थ आहे. आणि अपराध घडला तर गुरुशिवाय कैवार तरी कोण घेणार ? मार्ग तरी कोण दाखविणार ? ऐकावं आपण." राजाने सारी वार्ता सांगितली. ती ऐकून कण्वमुनी म्हणाले, "राजा, एवढं शरमिंदा होण्याचं काहीच कारण नाही. माणसाकडून अपराध घडतात; पण त्यावर उपायही असतात. पश्‍चात्तापाने तुझे मन शुद्ध झाले आहेच. आता मनाची ही शक्‍ती वाढविण्यासाठी असाच हिमालयावर जा. तेथे एक वर्ष कठोर तप कर आणि पुन्हा राजधानीला जाऊन आनंदानं राज्य कर. या अपराधाचं किल्मिष मनातून अगदी काढून टाक." "मुनिवरांची कृपा झाली म्हणायची. आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे."

राजाने पुन्हा एकदा साष्‍टांग नमस्कार केला. आश्रम सोडला आणि तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला. राजा पश्‍चात्तापाने दग्ध झाला होता, तरी त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नव्हते. माणसाच्या जीवनात काही क्षण असे येतात की, त्याचे संयमाचे बंध गळून पडतात. सागराच्या लाटांप्रमाणे इच्छा उफाळून बाहेर येतात आणि त्यात तो फसतो. गर्तेत अडकतो. राजा दुर्जेयाचे तसेच झाले. जाता जाता त्याला एक गंधर्व दिसला. त्याच्या गळ्यात एक दिव्य माळ होती. ती माळ पाहताच त्याला पुन्हा उर्वशीची आठवण झाली. ’तिच्या गळ्यात ही माळ किती शोभून दिसेल !’ ही कल्पना त्याच्या मनात अंकुरली. तो पुन्हा बेचैन झाला. त्याने ती माळ मिळविण्याचे ठरविले. त्याने त्या गंधर्वाला थांबविले. आकाशात विहार करणार्‍या त्याला थांबविल्यावर तो चिडला. माळेची मागणी ऐकताच तो संतापला. गंधर्व लोकीची ती माळ मानवाला द्यायला तो तयार होईना. अखेर बोलाचाली झाली. युद्ध झाले. ती माळ त्याने मिळविली. तो पूर्वीच्या ठिकाणी आला. उर्वशीच्या शोधासाठी ! त्याने खूप शोध घेतला तरी उर्वशीचा पत्ता लागेना. दिसेल त्याला त्याने विचारले पण सारे श्रम व्यर्थ गेले. अखेर तिच्या शोधासाठी तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला. काही दिवसांत तो हिमालयात पोहचला.
हिमालयाचा परिसर त्याने पहायला सुरुवात केली. त्या पर्वतराजीत त्याला अनेक अप्सरा दिसल्या, पण तिचे दर्शन होईना. राजाच्या सौंदर्याने त्या अप्सराही मोहित झाल्या. त्याला आकर्षित करण्याचा त्यांनी खूप प्रयत्‍न केला. मोहित करण्याचे विविध मार्ग चोखाळले. पण उर्वशीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या राजाने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याला फक्‍त उर्वशीलाच भेटायचे होते. तिला माळ द्यायची होती. त्यामुळे तिचं शतगुणित होणारं सौंदर्य अतृप्‍त डोळ्यांनी आकंठ प्यायचे होते. त्यासाठी तो तिचा शोध घेत होता. फिरता फिरता तो मानस सरोवराच्या रम्य परिसरात आला. तेथे येताच त्याचा उजवा नेत्र नि उजवा हात स्फुरण पावू लागला. त्याचे मन उमलू लागले. चेहर्‍यावर स्मिताची एक रेखा उमटली. तो निसर्ग त्याला अनंदी भासू लागला. पक्ष्यांचे होणारे आवाज त्याला मंगल वाद्यासारखे वाटू लागले. त्याची दृष्‍टी भिरभिरत असतानाच, थोडया अंतरावर वेलींच्या जाळीत फुले खुडताना त्याला उर्वशी दिसली. तो धावतच तिच्या जवळ गेला. त्या पदरवाने दचकलेल्या उर्वशीने विचारले,"कोण----आपण---- ? इतक्या लवकर आलात ?"
"हो---आणि हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय ते."
"बघू---बघू---"
राजाने घाईघाईने ती माळ तिला दाखविली. तिच्या गळ्यात घातली. तिच्याकडे तो एकटक बघू लागला. ते सौंदर्य अधीर्‍या नेत्रांनी प्राशन करु लागला. कितीही पाहिलं तरी त्याचं समाधान होईना. शेवटी उर्वशीच म्हणाली, "हे काय ? अगदी प्रथमच पाहत असल्यासारखं पाहताय. पुरे आता. मला आधी सांगा, राज्याची व्यवस्था लावलीत ? आता तुम्ही कायम माझ्या जवळच राहणार ना ?"
राजाने राजमहालात गेल्यापासूनची सारी वार्ता सांगितली. कण्वमुनींशी झालेले संभाषण सांगितले. ते ऐकताना उर्वशीच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. जणू तिला कसला तरी साक्षात्कार होत होता. त्याचे बोलणे संपताच ती म्हणाली,"राजन ! आपण मला प्रिय आहात. अगदी प्राणापेक्षाही जास्त." राजा मोहरला. पुढे ऐकू लागला.
"राजा, खरं प्रेम माणसाला त्याग शिकवतं. आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या हिताचीच इच्छा करतं; आणि त्याला स्वकर्तव्यापासून कधीच च्युत करीत नाही. तसं घडत असेल तर त्याला कर्तव्याची जाणीव देतं."
"उर्वशी, तू हे सांगते आहेस !"
"होय राजन, मीच सांगते आहे. खरं तेच सांगते आहे. राजा, माझ्या मोहात पडून तू कर्तव्य विसरत आहेस. तुझी पत्‍नी पतिव्रता आहे. समजूतदार आहे. खरंच तू भाग्यवान आहेस. तिने तुला सावरण्याचा प्रयत्‍न केला आहे. खरंच तू भाग्यवान आहेस. तिने तुला सावरण्याचा प्रयत्‍न केला आहे. तुला समजावून घेतलं आहे. तिच्याशी एकनिष्‍ठ राहणं तुझं कर्तव्य आहे. आणि दुर्जेया, सर्वांत महत्त्वाची गोष्‍ट तू राजा आहेस. व्यष्‍टीपेक्षा समष्‍टीच्या संबंधातील कर्तव्ये अधिक श्रेष्‍ठ असतात. ती तू केलीच पाहिजेत. माझ्या नादी लागून तू कर्तव्यभ्रष्‍ट झालास असा तुझा दुलौकिक झालेला मला आवडणार नाही. खरं प्रेम माणसाच्या कर्तव्यातील धोंड बनून राहता कामा नये ; तर त्याने कर्तव्याची प्रेरणा दिली पाहिजे. तेव्हा राजा, तू प्रायश्‍चित्त घे आणि राजधानीला जा. आपलं कर्तव्य कर. तुझी पत्‍नी आणि प्रजा तुझी वाट पाहत असेल. जा--""उर्वशी--उर्वशी--तूच बोलते आहेस हे ? तू केवळ मोहात पाडणारी नाहीस, तर मोहातून तारणारीही आहेस. आज तुझ्यामुळेच मी सन्मार्गावर आलो. तुझी ही स्मृती मला जन्मभर प्रेरक राहील. कर्तव्याची जाणीव देत राहील. जातो मी." राजा भारावलेल्या मनाने बोलला. शेवटी त्याने तिला नमस्कार केला. आता ती त्याची प्रेयसी राहिली नव्हती, गुरु झाली होती. त्याचा चेहरा कर्तव्याच्या जाणिवेने उजळला होता. मोहांधःकार सरला होता. ज्ञानाचा प्रकाश फाकला होता. राजाने एकवार तिच्याकडे पाहिले आणि तिच्याकडे पाठ करुन तो जाऊ लागला. उर्वशी त्याच्या दूर जाणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे टक लावून पाहत होती. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि राजाची मूर्ती अधिकच धूसर होत होती.

स्‍त्रीजीवनसार्थक

’शुद्धोऽसि बुद्धोऽसि निरञ्जनोऽसि

संसारमायापरिवर्जितोऽसि ।

संसारस्वप्‍नं त्यज मोहनिद्रां

मदालसा वाक्यमुवाच पुत्रम् ॥

स्त्रीजन्माचं साफल्य मातृत्व प्राप्‍त होण्यात आहे; पण त्याहीपेक्षा तिच्या जीवनाच्म सार्थक पुरुषाला भवबंधनातून मुक्‍त करण्यात आहे. मदालसेला असं जीवनसाफल्य लाभलं होतं.  आपल्या मुलाला लहानपणी अंगाईगीत गात असताना ती म्हणत असे-"अरे, तू नित्य मुक्‍त आहेस ! ज्ञानस्वरुप आहेस. सर्व विकारांपासून अलिप्‍त आहेस. या विश्‍वप्रपंच-प्रवर्तिका मायेपासून तू अलिप्‍त आहेस. म्हणून जन्म-मरणाचं चक्र निर्माण करणार्‍या या मायेचा त्याग कर. या मोह-निद्रेचा त्याग करुन जागा हो."

 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel