श्रीरामांनी वसिष्ठाला विचारले,"हा बाहेरील संसार मनामध्येच कसा विस्तारला जातो, हे आपण मला दृष्टांताने समजावून सांगावे." यावर वसिष्ठांनी शुक्राची कथा सांगितली. भृगुऋषी मंदार पर्वतावर तप करीत असता, त्यांचा बुद्धिमान पुत्र शुक्र त्यांची सेवा करीत असे. ज्ञान व अज्ञानाच्या सीमारेषेवर असलेला तरुण शुक्र वेगवेगळ्या कल्पना करीत आपला वेळ घालवीत असे. एकदा भृगुऋषी समाधिस्थ असता शुक्राची नजर आकाशमार्गे चाललेल्या एका अप्सरेकडे गेली. शुक्र देहाने जरी तिच्या मागून गेला नाही, तरी तो मनाने तिच्यात गुंतला. डोळे मिटून तो मनोराज्यात गढून गेला. तिच्या मागून तो स्वर्गात पोचला, नंदनवनात हिंडला, कल्पवृक्षाखाली बसला, एवढेच काय त्याने इंद्राला जवळून वंदन केले. इंद्रानेही त्याला सन्मानाने वागवून तेथे ठेवून घेतले. तिथे ती अप्सरा त्याला भेटली व दोघांनी अनेक वर्षे तेथे सुखाने वास्तव्य केले. पुढे त्याला आपले पुण्य क्षीण झालेसे वाटले व आता आपण पृथ्वीवर पडणार, या भीतीने त्याचे दिव्य शरीर नष्ट होऊन तो खरेच खाली पडला.
शुक्राचा स्थूल देह नष्ट झाला; पण मरतेसमयीच्या नाना प्रकारच्या वासनांनी अनेक जन्म, अनेक वेगवेगळी शरीरे यांचा अनुभव घेत घेत शेवटी समंगा ऊर्फ महानदीच्या काठी तो मोठ्या समाधानाने तप करीत बसला. भृगूच्याजवळ असलेला शुक्राचा देह आता क्षीण, जर्जर झाला व जमिनीवर कोसळला. समाधीतून जागे झाल्यावर पुत्राचा देह पाहातच भृगू कालावर संतापले. आपल्या पुत्राचे त्या कालाने हरण केले म्हणून ते त्याला शाप देणार, एवढ्यात भगवान कालच प्रकट होऊन म्हणाले,"नेमून दिलेले काम आम्ही केले. शाप देऊन तू आपल्या तपाचा नाश कशाला करतोस? तू समाधीत असता शुक्राचे मन अनेक ठिकाणी आसक्त झाले, अनेक जन्म उपभोगून आता तो समंगातीरावर तप करीत आहे." मग भृगूने योगदृष्टीने आपल्या पुत्राच्या चरित्राचा विचार केला. कालाची क्षमा मागितली. भूतमात्रांना स्थूल व सूक्ष्म अशी दोन शरीरे असून, ती दोन्ही वस्तुतः मनच होत, हा सिद्धांत त्याला पटला.
भगवान काल व भृगू शुक्राकडे गेले. काळाच्या आज्ञेनुसार शुक्र भानावर येऊन ते तिघेही मंदार पर्वतावर परत आले. मग शुक्राने आपल्या पूर्वीच्या शरीरात प्रवेश केला. प्रथम जन्मातच ज्ञानसंपन्न झालेल्या या तुझ्या तनूला दैत्यांचे गुरुत्व करायचे आहे, महाप्रलयाचे वेळी तू ही तनू कायमची सोड व या प्राक्तनरूपी तनूने तू जीवन्मुक्त होऊन दैत्यगुरू बनून राहा, अशी काळाने शुक्राला आज्ञा केली. जो पुरुष चित्तरहित झाला त्याला इष्ट, अनिष्ट भेदाभेद राहत नाही, हे समजून घेत तो शुक्र परमपदापासून पूर्वकल्पातील आपल्या संकल्पामुळे उत्पन्न झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel