मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वसती नामातच असते; कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खर्‍या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खर्‍या अर्थीने घरीच आहात असे नाही का होत? त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, ‘ तुम्ही नेहमी कुठे असता ’ तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे.

शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. ‘ ब्रह्म सत्यं जगत मिथ्या ’ हे तत्त्व त्यांच्या बुध्दीला पटते, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे.

कर्मठ लोक म्हणतात की, ‘ आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार ’; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरुप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिकर्माच्या सुरवातीला ‘ ॐकेशवाय नम: ’ असे म्हणतात, ते नाम नव्हे काय? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel