श्रीगणेशाय नमः

जयजयाजी कमळाकांता ॥ कमळानाभा कमलोद्भवपिता ॥ कमळपत्राक्षा दुःखहर्ता ॥ पुढें ग्रंथ रसाळ बोलवी ॥१॥

भक्तिसारग्रंथ हा रत्न ॥ बोलवीं श्रोत्यांकारण ॥ मागिले अध्यायीं गोरक्षनंदन ॥ मच्छिंद्र घेऊनि गेला असे ॥२॥

नेला तरी किलोतळा ॥ बुडालीसे सांगडी ॥ शोकाब्धींजळा ॥ तैं उपरिचवसू तरणि आगळा ॥ काढावया पातला ॥३॥

स्थावरबोधाची बांधूनि सांगडी ॥ शोकाब्धींत घातली उडी ॥ शब्दार्थी मारुनि बुडी ॥ धैर्यकांसे धरियेलें ॥४॥

धरिल्यावरी बाहेर काढुनि ॥ म्हणे माय वो सावधानी ॥ शोक सांडी अशाश्वत गहनी ॥ शाश्वत नाहीं कांहींच ॥५॥

पाहतेपणीं जें जें दृश्य ॥ तें आभासपणीं पावें नाश ॥ तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस ॥ श्लाध्य तूतें लागेना ॥६॥

तूं कोठील मच्छिंद्र कोण ॥ स्वर्ग भूमीचा झाला संगम ॥ योग तितुका भोगकाम ॥ सरुनि गेला जननीये ॥७॥

तूं अससी स्वर्गवासिनी ॥ मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनीं ॥ गाठीं पडली उभयतां ॥८॥

पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें तूं आपुलें स्वहित निश्चित ॥ सांभाळीं कीं जननीये ॥९॥

तूं झालीस पदच्युत ॥ तरी तें सांभाळी निश्चित ॥ तरी आतां मानूनि व्यक्त ॥ होऊनि चाल जननीये ॥१०॥

तूं पातलिया सिंहलद्वीप ॥ मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ॥ पूर्ण होईल शुद्धसंकल्प ॥ मच्छिंद्र दृष्टीं पाहूनियां ॥११॥

द्वादश वर्षे झालिया पूर्ण ॥ तूतें भेटवीन मच्छिंद्रनंदन ॥ मीननाथादि तपोधन ॥ गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं ॥१२॥

म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन ॥ काय पडेल त्या कारण ॥ सिंहलद्वीपीं पाकशासन ॥ महामख आरंभील ॥१३॥

तेव्हां विष्णु विरेंची रुद्र ॥ तया स्थानी येती भद्र ॥ सकळ देवादिक मित्र चंद्र ॥ एका ठायीं मिळतील ॥१४॥

ते नवनाथादि प्रतापवंत ॥ ऐक्य करील शचीनाथ ॥ गहिनी गोपीचंद भर्तरि सहित ॥ एक्या ठायीं मिळतील ॥१५॥

तरी आतां शोक कां व्यर्थ ॥ सांडी प्रांजळ करीं चित्त ॥ विमानारुढ होऊन त्वरित ॥ सिंहलद्वीपीं चाल कीं ॥१६॥

ऐसें ऐकोनि मैनाकिनी ॥ महाराजा श्वशुरप्राज्ञी ॥ द्वादशवर्षे मच्छिंद्र नयनी ॥ दावीन ऐसें म्हणतसां ॥१७॥

तरी मखमंडप पाकशासन ॥ करी अथवा न करो पूर्ण ॥ जरी मज दावाल मम नंदन ॥ तरी मज भाष्य द्यावी कीं ॥१८॥

भाष्य दिधल्या अंतरपुटीं ॥ विश्वासरत्ना रक्षीन पोटीं ॥ मग हे शोक दरिद्रपाठी ॥ चित्त सांडील महाराजा ॥१९॥

ऐसें बोलतां मैनाकिनी ॥ श्वशुर हास्य करी आननीं ॥ मग करतळभाष्य देऊनी ॥ संतुष्ट केलें सुनेतें ॥२०॥

यावरी बोले कीलोतळा ॥ मातें नेतां स्वर्गमंडळा ॥ परी नृपपणीं या स्थळा ॥ कोणालागी स्थापावें ॥२१॥

येरु म्हणे ऐक वचन ॥ सवें सेवेसी आहेत क्रियावान ॥ दैर्भामा उत्तम नामानें ॥ राज्य तीते ओपीं कां ॥२२॥

मग अवश्य म्हणे मैनाकिनी ॥ दैर्भामा राज्यासनीं ॥ बैसविली अभिषेक करुनी ॥ राज्यपदीं तेधवा ॥२३॥

राज्यीं ओपूनि दैर्भामा ॥ मिळती झाली विमानसंगमा ॥ परी सकळ देशींच्या शैल्या रामा ॥ शोकाकुळ झाल्या कीं ॥२४॥

म्हणती माय वो शुभाननी ॥ तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ॥ आम्हां पाडसांची हरिणी ॥ दयाळू माय अससी तूं ॥२५॥

असो ऐशा बहुधा शक्ती ॥ शैल्या शोकाकुलित होती ॥ मग तितुक्यां समजावूनि युक्तीं ॥ विमानयानीं आरुढली ॥२६॥

दैर्भामेसी नीतिप्रकार ॥ सांगूनि युक्ती समग्र ॥ यथासमान प्रजेचा भार ॥ सांभाळी कां साजणीये ॥२७॥

जेथील तेथें हित फार ॥ तैसे केलें गोचर ॥ मग विमानीं आपण सश्वशुर ॥ स्वर्गमागें गमताती ॥२८॥

असो विमान पावे द्वीपाप्रती ॥ पदा स्थापिली ते युवती ॥ मग तो उपरिचर सहजगती ॥ आपुल्या स्थाना सेविती ॥३०॥

त्याचि न्यायें उपरिदक्षें ॥ आणि कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ॥ शाषमोचन सायंकाळास ॥ स्थाना पावली आपुल्या ॥३१॥

कीं अब्धीचें अपार जीवन ॥ व्यापी महीतें मेहमुखाने ॥ परी तें पुन्हां सरिक्षाओघानें ॥ ठायींचे ठायीं जातसे ॥३२॥

त्याचिया न्यायें स्नुषा श्वशुर ॥ पावते झाले स्वस्थानावर ॥ परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र ॥ गौडबंगाली पातला ॥३३॥

मीननाथ स्कंधीं वाहून ॥ मार्गावरी करिती गमन ॥ तों शैल्येंदेशसीमा उल्लंघून ॥ गौडबंगालीं पातले ॥३४॥

मार्गी लागतां ग्राम कोणी ॥ त्या ग्रामांत संचरोनी ॥ गोरक्ष भिक्षा आणी मागुनी ॥ उदरापुरती तिघांच्या ॥३५॥

ऐसेपरी निर्वापण ॥ मार्गी करिताती गमन ॥ तों कौलबंगाला सांडून ॥ गौडबंगाली पातले ॥३६॥

मार्गी चालता सहजस्थिती ॥ तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती ॥ तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती ॥ गमन करितां मार्गातें ॥३७॥

तेथें येताचि गोरक्ष जेठी ॥ स्मरण झालें तयाचे पोटीं ॥ कीं अच्युतवृक्षापुटीं ॥ कानिफाची भेटी झालीसे ॥३८॥

झाली परी हें उत्तम स्थान ॥ महायशस्वी पुण्यवान ॥ मातें दाबिले श्रीगुरुचें चरण ॥ जैसे चुकल्या वत्सासी ॥३९॥

प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी ॥ गेली होती आदिपट्टराणी ॥ मी पाडस रानोरानी ॥ निढळ्यावाणी लागतसे ॥४०॥

कीं मज वत्साची गाउली ॥ सहज रानी चरावया गेली ॥ शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ॥ ती भेटविली रायानें ॥४१॥

मग स्कंधी होता नाथ मीन ॥ तथालागी मही ठेवून ॥ दृढ पायीं केलें नमन ॥ नेत्रीं अश्रु लोटले ॥४२॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ बोलता झाला गोरक्षातें ॥ म्हणे बाळा अश्रुपात ॥ निज चक्षूंसी कां आले ॥४३॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ मग सकळ दुःखाचे मंडण ॥ तें गोरक्षचित्तीं प्रविष्ट होऊन ॥ नेत्रीं नीर अपार लोटलें ॥४४॥

सांगू जातां मुखानें ॥ तो कंठ आलासे भरुन ॥ मग क्षण एक तया स्थानीं बैसून ॥ स्थिर चित्त पैं केलें ॥४५॥

जैसे आकाशीं अभ्र दाटतां ॥ पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ॥ तैसें दुःख मोह चिंत्ता ॥ टाकून निर्मळ पैं केले ॥४६॥

मग बद्रीकाश्रमापासूनि कथन ॥ दुःखव्यावृत्ति अतिगहन ॥ कानिफा भेटीपर्यंत वदून ॥ ठाव पशस्वी म्हणतसे ॥४७॥

याचि ठायीं कानिफाभेटी ॥ झाली मातें कृपा जेठी ॥ तुमची शुद्धी तद्वान्वटी ॥ येथेंचि लाधली महाराजा ॥४८॥

तरी हें स्थान पुण्यवान ॥ तुमचे दाविले मज चरण ॥ तरी हे स्थान धनवंत पूर्ण ॥ चुकलें धन मज दिधलें ॥४९॥

दुःखसरिते प्रवाहें वेष्टी ॥ बुडतां वांचविले देउनि पृष्ठी ॥ कीं दुःख व्याघ्राच्या आसडूनि होटी ॥ माये भेटी केली असे ॥५०॥

कीं तुमचा वियोग प्रळयानळ ॥ तयांत मी पडलों होतों बाळ ॥ परी जागा नोहे हा घन शीतळ ॥ मातें झाला महाराजा ॥५१॥

कीं तुमचा वियोगकृतांतपाश ॥ लागला होता मम कंठास ॥ परी जागा नोहे हा सुधारस ॥ मज भेटला महाराजा ॥५२॥

ऐसें म्हणोनि वारंवार ॥ नेत्रीं लोटती अश्रुपूर ॥ परम कनवाळू नाथ मच्छिंद्र ॥ हदयीं धरी गोरक्षा ॥५३॥

मुख कुरवाळूनि आपले हस्तें ॥ सच्छिष्याचे अश्रु पुसीत ॥ मनांत म्हणे हा भाग्यवंत ॥ गुरुभक्त एकचि हा ॥५४॥

मग गोरक्षाचें समाधान ॥ करुनियां मच्छिंद्रनंदन ॥ मग मीननाथा कडे घेऊन ॥ ऊठ वत्सा म्हणतसे ॥५५॥

पुढें मार्गी करितां गमन ॥ जालिंदराचें वर्तमान ॥ सांगता झाला गोरक्षनंदन ॥ श्रीमच्छिंद्राकारणें ॥५६॥

गौडबंगाल हेळापट्टण ॥ तुमचा गुरु जालिंदर पूर्ण ॥ नाथपंथीं हा अनुग्रहकारण ॥ श्रीदत्ताचा मिरवितसे ॥५७॥

तो महाराज योगभ्रष्ट ॥ पावला आहे महाकष्ट ॥ गोपीचंदें करुनि अनिष्ट ॥ महींगर्ती घातला ॥५८॥

मुळापासोनि सकळ कथन ॥ मच्छिंद्रा केलें निवेदन ॥ परी नाथ मच्छिंद्र तें ऐकून ॥ चित्तीं परम क्षोभला ॥५९॥

म्हणे ऐसा राजा आहे नष्ट ॥ तरी आतां करीन त्याचें तळपट ॥ नगरी पालथी घालीन सुघट ॥ महीपालथा मिरवीन तो ॥६०॥

ऐसें बोलोनि विक्षेप चित्तीं ॥ पुढें मागें परमगतीं ॥ एकदोन मुक्काम साधिती क्षिती ॥ हेळापट्टणीं पातले ॥६१॥

ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती ॥ त्यांतें वृत्तांत विचारीन जाती ॥ ते म्हणती कानिफा येऊनि क्षितीं ॥ मुक्त केलें जालिंदरा ॥६२॥

राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी ॥ जगीं मिरवला अमरपणीं ॥ तेणें गुरुदीक्षा घेऊनी ॥ तपालागीं तो गेला ॥६३॥

राया मुक्तचंदा स्थापून ॥ राज्यपदीं राज्यासन ॥ देऊनियां अग्निनंदन ॥ तोही गेला षण्मास ॥६४॥

सकळ कथा मुळाहूनी ॥ मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी ॥ तें मच्छिंद्राचे पडतां श्रवणीं ॥ शांतपणीं मिरवला ॥६५॥

जैसा प्रळयानळावरती ॥ घनवृष्टीची होय व्यक्ती ॥ मग सकळ उवाळा पाहूनि अती ॥ अदृश्य होय पावक तो ॥६६॥

कीं साधक पातला असतां ॥ कीं श्रीगुरुचा संसर्ग होतां ॥ होतांचि सिद्धकाची व्यथा ॥ नासूनि जाय ते क्षणीं ॥६७॥

कीं तम ढिसाळ दाटल्या अवनी ॥ उदय होतांचि वासरमणी ॥ मग सकळ तम नाश पावूनी ॥ दिशा मिरविती उजळल्या ॥६८॥

तन्न्यायें मच्छिंद्रसंताप ॥ ग्रामस्थं बोलतां झाला लोप ॥ शांति वरुनि मोहकंदर्प ॥ चित्तामाजी द्रवलासे ॥६९॥

यापरी तो मच्छिंद्रनंदन ॥ ग्रामस्थां विचारी मुख्यत्वकरुन ॥ अधिकारी राज्यनिपुण ॥ कोण आहे प्राज्ञिक तेथें ॥७०॥

येरी म्हणती योगद्रुमा ॥ श्रेष्ठ करणिका राजा उगमा ॥ मैनावती शुभानना ॥ प्राज्ञिकवंत मिरवतसे ॥७१॥

त्या मातेनें अर्थ धरुन ॥ पुत्र मिरविला जी अमरपणें ॥ तुष्ट करोनि जालिंदरमन ॥ अमर झाली आपणही ॥७२॥

ऐसें बोलतां ग्रामस्थ युक्तीं ॥ मनांत म्हणे मच्छिंद्र यती ॥ ऐसा प्राज्ञिक आहे सती ॥ भेटी घ्याची तियेची ॥७३॥

ऐसिये धृती चित्तीं कल्पून ॥ चालते झाले त्रिवर्गजन ॥ ग्रामद्वारा शीघ्र येऊन ॥ द्वाररक्षकां सांगती ॥७४॥

म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत ॥ तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ॥ ग्रामद्वारीं आहे तिष्ठत ॥ जाऊनि सांगा सतीसी ॥७५॥

अहो अहो द्वारपाळ ॥ सांगा चला उतावेळ ॥ मैनावती लक्षूनि सकळ ॥ वृत्तांत तियेतें निवेदावा ॥७६॥

ऐसें द्वारपाळ ऐकून ॥ मच्छिंद्रा करिते झाले नमन ॥ म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण ॥ श्रुत करुं सतीसी ॥७७॥

म्हणती महाराज मच्छिंद्रजती ॥ जालिंदरसहोदर म्हणवितो क्षितीं ॥ तो येऊनि ग्रामद्वाराप्रती ॥ तिष्ठत आहे महाराजा ॥७८॥

ऐसे ऐकूनि मैनावती ॥ म्हणे कैसी वृत्ति कैसी स्थिती ॥ कैसी आहे भूषण व्यक्ती ॥ अभ्यासानभ्यास दाक्षेतें ॥७९॥

येरी म्हने जी महाराजा ॥ कनककांति तेजःपुंजा ॥ बालार्ककिरणी विजयध्वजा ॥ आम्हालागीं दिसतसे ॥८०॥

माय वो आम्हां दिसतो ऐसा ॥ कीं न पावला योनिसंभवसा अवतारदीक्षे स्वर्गवासा ॥ करील जनां वाटतसे ॥८१॥

शैली कंथा लेवूनि भूषण ॥ शिंगी सारंगी समागम ॥ कुबडी फावडी करीं कवळून ॥ उभा द्वारीं असे तो ॥८२॥

आणिक एक सच्छिंष्य त्यासी ॥ संग्रही आहे सुखसेवेसी ॥ परी तो शिष्यासमान अभ्यासी ॥ आम्हालागीं भासतसे ॥८३॥

धृति वृत्ति दीक्षेलागून ॥ ज्ञानवैराग्यस्वरुपवान ॥ आम्हालागीं समसमान ॥ गुरुशिष्य वाटती ॥८४॥

त्याचि रीतीं स्वरुप अपार ॥ तान्हुलें एक असे किशोर ॥ परी त्रिवर्ग स्वरुपसागर ॥ नक्षत्रमणी भासती ॥८५॥

ऐसें सांगतां द्वाररक्षक ॥ मंत्रीं पाचारिला प्रत्योदक ॥ मग स्वयें घेऊनि सुखासन कटक ॥ सामोरी जातसे युवती ते ॥८६॥

कटकासवें द्वारीं येऊन ॥ वंदिती झाली मच्छिंद्रनंदन ॥ मग त्रिवर्गातें सुखासन ॥ ओपूनि नेतसे मंदिरा ॥८७॥

नेतांचि मंदिरा राजभुवनी ॥ भावें बैसविला कनकासनीं ॥ षोडशोपचारें पुजूनि मुनी ॥ नम्रवाणी गौरविलें ॥८८॥

हे महाराजा तपोसविता ॥ कोणीकडूनि येणें झालें आतां ॥ आम्हां आळशावरी सरिता ॥ प्रेमांबु लोटतसे ॥८९॥

कीं दरिद्र्याचें द्रव्यहरण ॥ करुं मांदुस धांवली आपण ॥ कीं चित्ता बोधी अंतःकरण ॥ बुडतां धांवे चिंतामणी ॥९०॥

कीं मृत्युसमयीं हस्तपादास ॥ ओढितां परम दुःखक्लेशास ॥ तें पाहूनियां अमरपीयूष ॥ धांव घेत कृपेनें ॥९१॥

कीं तृषासंकटीं प्राण ॥ तों गंगाओघ आला धांवून ॥ कीं क्षुधें पेटला जठाराग्न ॥ पयोब्धी तों पातला ॥९२॥

तन्न्यायें अभाग्य भागीं ॥ येथें पातलेत तुम्ही जोगी ॥ परी कोणाच्या वचनप्रसंगीं ॥ आम्हां दर्शंवा महाराजा ॥९३॥

येरी म्हणें वो माते ऐक ॥ उपरिचरवसू माझा जनक ॥ मच्छदेही देहादिक ॥ आम्हांलागी मिरवतसे ॥९४॥

यापरी श्रीगुरुज्ञानदृष्टी ॥ तो अनुसूयासुत शुक्तिकेपोटी ॥ तेणें कवळूनि मौळी मुष्टीं ॥ वरदपात्रीं मिरवला ॥९५॥

मज अनुग्रह प्राप्त झाला ॥ त्यावरी श्रीजालिंदराला ॥ प्राप्त होऊनि वैराग्याला ॥ भूषवीतसे जननीय ॥९६॥

धाकटा बंधु गुरुभक्त ॥ मज विराजला जालिन्दरनाथ ॥ परी या ग्रामीं पापी अवस्थेंत ॥ पावला हें ऐकिलें ॥९७॥

म्हणूनि उग्रता धरुनि पोटीं ॥ लंधीत आलों महीपाठीं ॥ परी उत्तम संग्रह ग्रामजेठी ॥ समस्तांनी सांगितले ॥९८॥

तेणें करुनि कोप कंदर्प ॥ झाला जननी सर्व लोप ॥ तरी तूं धान्य ज्ञानदीप ॥ महीवरी अससी वो ॥९९॥

आपुल्या हितासी गृहीं आणून ॥ शेवटीं परम प्राज्ञेकरुन ॥ तुवां मिळविला स्वानंदघन ॥ धन्य धन्य अससी तूं ॥१००॥

धन्य धन्य मही ऐक ॥ निवटूनि पूर्वजपातक दोंदिक ॥ सनाथपणाची घेऊनि भीक ॥ स्वर्गवासा मिरविशी ॥ ॥१॥

तरी तारक लोकां बेचाळीसां ॥ कुळा झालीस भवाब्धिरसा ॥ कीं भगीरथभूष पितृउद्देशा ॥ मिरवलासे त्रिभुवनीं ॥२॥

कीं विनतेचें दास्यपण ॥ गरुडें सांठविलें पीयूष देऊन ॥ तेवीं तूं कुळांत सकळांकारण ॥ तारक झालीस सर्व काळीं ॥३॥

ऐसें नाथ बोलतां युक्तीं ॥ चरणीं माथा ठेवी सती ॥ म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥ सदैव केलें तुम्हींच ॥४॥

तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू ॥ कृपापात्र वरिला मशकू ॥ मम प्रज्ञे मोहशठकू ॥ मिरवला हे महाराजा ॥५॥

अहा तुमचे पडिपाडें ॥ न येती कल्पतरु झाडें ॥ परीस वासनेसमान कोडे ॥ बरें वाईंट मिरवतसे ॥६॥

तैसी तुमची नव्हे स्थिती ॥ साधक कल्याण मिरवी मती ॥ कीं परीस देतां समानगती ॥ बरे वाईट मिरवतसे ॥७॥

परीस लोहाचे करी कनक ॥ परी स्वदीक्षेची न तुटे भीक ॥ तेवीं तुम्हीं नोहेत साधक ॥ आपुलेसमान करितां कीं ॥८॥

ऐशी उद्धारपूर्ण कोटी ॥ तुम्ही मिरवतां महीपाठीं ॥ उदार तरी समता होटीं ॥ मेघ अपूरा वाटतसे ॥९॥

मेघ उदार म्हणती लोक ॥ परी तो अपूरा ओसरे उदक ॥ तस्मात् तुमचें औदार्य दोंदिक ॥ समतापदासी मिरवेना ॥१०॥

तरी तुमची वर्णिता स्तुती ॥ अपूर्ण असे माझी मती ॥ ऐसें म्हणोनि मैनावती ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥११॥

मग आसन वसन भूषणासहित ॥ अन्नपानादि अन्य पदार्थ ॥ सिद्ध करुनि मनोरथ ॥ तुष्ट करीत नाथासी ॥१२॥

तीन रात्री वस्ती करुन ॥ सर्त्रा आशीर्वाद देऊन ॥ मग निघता झाला मच्छिंद्रनंदन ॥ गोरक्षनाथादिकरुनियां ॥१३॥

सकळ कटकासहित ॥ बाळवों निघाला चंद्रमुक्त ॥ मैनावती आणि ग्रामस्थ ॥ एक कोस बोळविती ॥१४॥

सकळी चरणावरी ठेवूनि माथा ॥ परतते झाले बोळवोनि नाथा ॥ मग आपुले सदनीं येऊनि तत्त्वतां ॥ धन्य नाथ म्हणतात ॥१५॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ त्रिवर्गादि गमन करीत ॥ ग्रामोग्राम मुक्काम साधीत ॥ जगन्नाथीं पातलें ॥१६॥

तेथें करुनि उदधिस्नान ॥ जगन्नाथाचें घेऊनि दर्शन ॥ तीन रात्रीं तेथें राहून ॥ तीर्थविधि सारिला तो ॥१७॥

तेथूनि निघोनि पुनः मार्गी ॥ गमन करीत मग योगी ॥ तों सौराष्ट्रग्राममुक्कामप्रसंगी ॥ जाऊनि तेथें राहिले ॥१८॥

रात्र क्रमोनि जैसी तैसी ॥ दुसरे दिनीं मित्रोदयासी ॥ गोरक्ष सांवरोनि भिक्षाझोळासी ॥ भिक्षेलागीं प्रवर्तला ॥१९॥

भिक्षा मागोनि सदनोसदनीं ॥ परम श्रमोनि आला सदनीं ॥ तों येरीकडे शिबिरस्थानीं ॥ शयनीं असे मीननाथ ॥१२०॥

तो मच्छिंद्रनाथानें उठवोन ॥ बैसविला शौचाकारण ॥ तों ते संधींत भिक्षा मागोन ॥ गोरक्षनाथ पातला ॥२१॥

ग्रामांत हिंडतां सदनोसदनीं ॥ श्रमे विटलासे मनीं ॥ तो येतांचि स्थानीं श्रमोनी ॥ मच्छिंद्रनाथ बोलतसे ॥२२॥

म्हणे गोरक्षा मीननाथ ॥ शौचास बैसविला आहे गल्लींत ॥ तरी तूं त्या तें प्रक्षाळूनि त्वरित ॥ घेऊनि येई पाडसा ॥२३॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ भिक्षाझोळी ठेवूनि तेथ ॥ लक्षूनि पातला मीननाथ ॥ गल्लीमाजी जाऊनियां ॥२४॥

तो मीननाथ परम अज्ञान ॥ हस्तपाद भरले विष्ठेनें ॥ अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन ॥ परम चित्ती विटलासे ॥२५॥

मनांत म्हणे मच्छिंद्रासी ॥ कीं परम असे विवसी ॥ विषय उपद्रव संन्याशासी ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥२६॥

कीं ----- भाराविण बोडकी ॥ कुंकूंखटाटोप हुडकी ॥ तेवीं मच्छिंद्रमनीं उपद्रव शेखीं ॥ काय आज ---- ॥२७॥

जन्मांधासी अवनीं ॥ तोचि संभार रक्षी कानीं ॥ निगडी मनुष्या षड्रसान्नीं खटाटोप कासया ॥२८॥

कीं परम भ्याड सोडी सदन ॥ शस्त्रसंभारापरी संगोपन ॥ ज्याचें काय आसन वसन ॥ त्या वस्त्रभूषण कासया ॥२९॥

कीं रानींचें रानसावज उन्मत्त ॥ द्रव्य देऊनि त्या करावें शांत ॥ तेवीं निस्पृहताविषय अत्यंत ॥ गोड कांहींच वाटेना ॥१३०॥

ऐसें बोलूनि गौरनंदन ॥ मीननाथ तें करीं कवळून ॥ दृष्ट करी मच्छिंद्राकारणें ॥ उचलोनिया तेधवां ॥३१॥

विष्ठेव्यक्त मीननाथ ॥ पाहोनि मच्छिंद्र बोलत ॥ म्हणे गोरक्षा सरितेआंत ॥ धुवोनि आणि बाळका ॥३२॥

अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ ॥ तैसाचि उठोनि सरिते जात ॥ संचार करितां सरितेंत ॥ तों उत्तम खडक देखिला ॥३३॥

देखिलें परी एकांतस्थान ॥ मनांत म्हणे न्यावें धूवोन ॥ परी अंतर्बाह्य मळी निवटवून ॥ नाथालागीं दाखवूं ॥३४॥

ऐसें विचारुनि चित्तांत ॥ पदी धरिला मीननाथ ॥ खडकावरी आपटोनि त्वरित ॥ गतप्राण पैं केला ॥३५॥
सरिते उदक असे अपार ॥ त्यांत प्रवेशते झालें रुधिर ॥ तें सर्व अपार जळचर ॥ भक्ष्य म्हणोनि धावले ॥३६॥

मच्छ मगरी कबंधदेही ॥ मग तळपती त्या प्रवाहीं ॥ तैं अपार जळचरें पाहूनि डोहीं ॥ मनांत म्हणतसे गोरक्ष ॥३७॥

म्हणे जीवें गेला मीननाथ ॥ तरी याचें घालों सदावर्त ॥ एक जीवावरी तृप्त होत ॥ आहेत जीव सकळ हे ॥३८॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ त्वचा घेतली काढुनि ॥ रतिरति मांस तुकडे करोनी ॥ जळचरांतें ओपीतसे ॥३९॥

उरल्या अस्थी त्या जळांत ॥ टाकूनि तेथूनि उठला नाथ ॥ परी त्या जळा नसे अंत ॥ अस्थी तळीं व्यक्त जाहूल्याती ॥१४०॥

ऐसे करिता गौरनंदन ॥ मांस तें सकळ गेलें आटून ॥ मांस सरल्या आतडें पूर्ण ॥ जळचरांतें भक्षविलें ॥४१॥

एक त्वचेरहित भाग ॥ कांहीं न ठेवी वरतें अव्यंग ॥ खडकीं पवित्र करुनि चांग ॥ त्वचा घेऊन चालला ॥४२॥

चालला परी तो सदनीं ॥ शिबिरीं नसे मच्छिंद्रमुनी ॥ शांभवीअर्था बाजारभुवनीं ॥ संचारलासे महाराजा ॥४३॥

तो येतांचि तेथें मच्छिंद्रनाथ ॥ मग तान्हा पसरी प्रावणी त्वचेत ॥ मित्ररश्मि पाहोनि वात ॥ सुकावया घातलें ॥४४॥

तों येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ शांभवी आलासे घेऊन ॥ कंदा कुत्का सिद्ध करुन ॥ असनावरी बैसला ॥४५॥

बैसला परी गोरक्षातें ॥ म्हणे बा रे कोठें मीननाथ ॥ येरी म्हणे धुवोनि त्यातें ॥ स्वच्छ आणिलें महाराजा ॥४६॥

मच्छिंद्र म्हणे आणिलें परी ॥ कोठें ठेविला न दिसे नेत्रीं ॥ येरी म्हणे तान्हा प्रावरीं ॥ सुकूं घातला महाराजा ॥४७॥

म्हणे मच्छिंद्र काय बोलसी ॥ घातला सुकूं ऐसें म्हणसी ॥ येरी म्हणे कीं असत्य तुम्हांसी ॥ भाषण माझें वाटतसे ॥४८॥

तरी बाहेर शीघ्र येवोन ॥ स्वचक्षूनें पहावा विलोकून ॥ ऐसें बोलता मच्छिंद्रनंदन ॥ तेचि क्षणीं बाहेर येतसे ॥४९॥

म्हणे कोठें रे मीननाथ ॥ परी पाहतां म्हणे तान्हा प्रावर्णातें ॥ न्याहाळोनि पाहतां देखे त्वचेतें ॥ मग धरणी आंग सांडीतसे ॥१५०॥

म्हणे अहा रे काय केलें ॥ बाळ माझें कैसें मारविलें ॥ अंग धरणीवरी टाकिलें ॥ वरी लोळे गडबडां ॥५१॥

अहा अहा म्हणूनी ॥ मृत्तिका उचलोनि घाली वदनीं ॥ आणि वक्षःस्थळा पिटूनी ॥ शोक करी आक्रोशें ॥५२॥

परम मोहें आरंबळत ॥ उठउठोनि त्वचा कळीत ॥ हदयीं लावूनि आठवीत ॥ बाळकाच्या गुणातें ॥५३॥

अहा तुझा मी असें जनक ॥ परम शत्रु होतो एक ॥ जननींचें तोठूनि बाळक ॥ तुज आणिलें कैसें म्यां ॥५४॥

म्हणे अहा रे मीननाथा ॥ मज सांडूनि कैसा गेलासी आतां ॥ एकटा परदेशी सोडूनि तत्त्वतां ॥ मार्ग मिळाला तुज केवीं ॥५५॥

आतां तूतें कीलोतळा ॥ कोठूनि पाहील मुखकमळा ॥ अहा तुझा कापिला गळा ॥ कैसा येथें आणूनी ॥५६॥

बाळका स्त्रियांचे राज्यांत ॥ भुभुःकारें पावशील मृत्यु ॥ म्हणोनि बा रे तुजसी येथें ॥ रक्षणातें आणिलें ॥५७॥

आणिलें परी तुज निश्वितीं ॥ कृत्तांत झाला गोरक्ष जती ॥ ऐसें म्हणोनि धरणीप्रती ॥ अंग टाकी घडाडून ॥५८॥

पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन ॥ त्वचा हदयी धरा कवळून ॥ म्हणे बाळा तुजसमान ॥ पुत्र कैंचा मज आतां ॥५९॥

अहा बाळाचें चांगुलपण ॥ मज भासतसे जैसा मदन ॥ अहा बाळाचे उत्तम गुण ॥ कोणा अर्थी वर्ण मी ॥१६०॥

बाळा लोटलीं वर्षे तीन ॥ परी काय सांगू मंजुळ बोलणें ॥ हा ताता ऐसें म्हणोन ॥ हाक मारीत होतासी तूं ॥६१॥

बा रे तनू असतां कोवळीं ॥ परी शयनीहून उठसी उषःकाळीं ॥ माथा ठेवूनि मम पदकमळीं ॥ अहो तात ऐसें म्हणसी ॥६२॥

बा तू वसत होतासी मम शेजारीं ॥ मर्यादा रक्षीत होतांसी अंतरीं ॥ अरे कठिण वागुत्तरीं ॥ शब्द वाहिला नाहीं म्यां ॥६३॥

बा रे भोजन करितां ताटीं ॥ चतुरपणाची परम हातवटी ॥ आपुल्या पुढें ठेवूनि दृष्टि ॥ ग्रास देसी बाळका ॥६४॥

अहा रे अहा मीननाथ बाळा ॥ परमज्ञानी वाचा रसाळा ॥ लिप्त कदा नव्हेसी मळा ॥ शुद्ध मुखकमळा मिरवीसी ॥६५॥

अहा बारे चक्षुघ्राण ॥ कधीं न पाहिलें तुझें मळिण ॥ आज तुझे अंग विष्ठावेष्ठन ॥ कैसें अमंगळ जावया ॥६६॥

बा रे कधीं मजवांचून ॥ न राहसी एकांत पण ॥ आजिचे दिनीं शयनीं मज सोडून ॥ कैसा परत गेलासी ॥६७॥

बा रे माय तुझी कीलोतळा ॥ तिचा कधीं न पाहसी लळा ॥ आसनीं शयनीं मजपासूनि बाळा ॥ पैल झाला नाहीस तूं ॥६८॥

तरी ऐसें असूनि तुझें मनीं ॥ आजि मज गेलासी सोडूनी ॥ अहा एकदां येऊनि अवनीं ॥ मुख दावीं मज बाळा ॥६९॥

ऐसें म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ हंबरडा गायीसमान फोडीत ॥ अहा माझा मीननाथ ॥ कोणीं दाखवा म्हणतसे ॥१७०॥

भूमीं लोळे अश्रु नयनीं ॥ नेत्रीं ढाळितां न समाये पाणी ॥ वक्षःस्थळादि पिटूनि अवनीं ॥ दाखवा म्हणे मीननाथ ॥७१॥

ऐसें म्हणोनि आक्रंदत ॥ ते पाहून गोरक्षनाथ ॥ मनांत म्हणे अद्यापि भ्रांत ॥ गेली नाहीं श्रीगुरुची ॥७२॥

मग पुढें गोरक्षनाथ होऊन ॥ म्हणे महाराजा कां घेतां अज्ञानपण ॥ कोण तुम्ही कोणाचा नंदन ॥ करितां रुदन त्यासाठी ॥७३॥

अहो पुरतें पाहतां कोण मेला ॥ अशाश्वताचा भार हरला ॥ शाश्वत अचळ आहे बोला ॥ कदा काळीं न मरे तो ॥७४॥

अहो तुमचा मीननाथ ॥ नामधारी असे त्यांत ॥ तो कदा न मरे योजिल्या घात ॥ आहे शाश्वत महाराजा ॥७५॥

तो कदा न मरे शस्त्रघातांनीं ॥ त्यातें न जाळी कदा वन्ही ॥ अनिळ न शोषी ना बुडवी पाणी ॥ शाश्वत चिन्ही नांदतसे ॥७६॥

ऐसें बोलता गोरक्षक ॥ परी कदा न सोडी शोक ॥ अहा अहा मीननाथ ॥ ऐसें म्हणोनि आक्रंदे ॥७७॥

ऐशिया आग्रहाचा अर्थ ॥ तें पाहूनियां गोरक्षाच्या ॥ मग संजीवनीमंत्राप्रत ॥ स्मरण करिता पैं झाला ॥७८॥

करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ संजीवनी मंत्र जपे ओठीं ॥ त्वचेप्रती सोडिता झाला मुष्टीं ॥ मीननाथ ऊउला ॥७९॥

उठतांचि मीननाथ ॥ मच्छिंद्राचे गळा पडत ॥ मच्छिंद्र पाहूनि हदयांत ॥ परम मोहें धरीतसे ॥१८०॥

चुंबन घेऊनि म्हणे बाळा ॥ कोठें गेला होतासी खेळा ॥ मज टाकूनि विनयस्थळा ॥ गमन केलें होतें कीं ॥८१॥

ऐसें म्हणोनि जैसे तैसे ॥ तोही अस्त पावला दिवस ॥ दुसरे दिनीं मीननाथास ॥ घेऊनि ते चालिले ॥८२॥
मार्गी चालतां त्रिवर्ग जाण ॥ गोरक्ष करितां झाला बोलणें ॥ हे महाराजा मच्छिंद्रनंदन ॥ चित्त द्यावें मम बोला ॥८३॥

तुमचा प्रताप पाहतां अवनीं ॥ निर्जीवा जीववाल वाटे मनीं ॥ ऐसें असूनि सुतालागुनी ॥ रुदन केलें हे काय ॥८४॥

तरी हें रुदन करावया कारण ॥ काय होतें बोला वचन ॥ ऐसे मीननाथ सहस्त्रावधीनें ॥ संजीवनीने निर्माल ॥८५॥

तरी हें आश्वर्य वाटे मनीं ॥ स्वामी पडेल शोकरुदनीं ॥ कीं चिंताहारक चिंतामणी ॥ तो चिंतेमाजी पडियेला ॥८६॥

ऐसे ऐकोनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे तुवां मारिलें किमर्थ ॥ येरु म्हणे मोहभावार्थ ॥ तो पाहावया तुमचा ॥८७॥

तुम्ही वेराग्यशील म्हणवितां ॥ तरी माया लंघुनि व्हावें परता ॥ आशा मनिषा तृष्णा ममता ॥ लिप्त नसावी शरीरातें ॥८८॥

ऐशा परीक्षा भावनेसीं ॥ म्यां मारिलें मीननाथासी ॥ परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञराशी ॥ रुदन कासया केलें जी ॥८९॥

येरु म्हणे वत्सा ऐक ॥ तूं शिष्य माझा अससी एक ॥ तरी म्यांही परीक्षेंचे कौतुकें ॥ तुझें बाळा पाहिले असे ॥१९०॥

बा रे आशा तृष्णा मनिषा कामना ॥ काम क्रोध मद मत्सर वासना ॥ हे मोहमांदुसी मायासदना ॥ नांदणुकी करितात ॥९१॥

तरी तुझे ठायीं मायालेश ॥ आहे कीं नाहीं महापुरुष ॥ हे पहावया रुदनास ॥ आरंभिलें म्यां पाडसा ॥९२॥

आम्ही अलक्षरुपी पाहणें ॥ आणि विज्ञानज्ञानानें विवरणें ॥ याच कौतुकें जाणपते ॥ पाहिलें म्यां पाडसा ॥९३॥

बा रे शाश्वत अशाश्वत ॥ तुज कळलें कीं नाहीं होतों यां भ्रांतीत ॥ तयाची परीक्षा रुदननिमित्त ॥ तुझी घेतली पाडसा ॥९४॥

आतां बा रे तुझे वयसपण ॥ समूळ आजि झालें हरण ॥ पयतोयाचेनि कारण ॥ हंसपुरुष मिरविशी ॥९५॥

ऐसें बोलतां गुरुनाथ ॥ गोरक्ष चरणीं माथा ठेवीत ॥ म्हणें महाराजा तुम्ही सनाथ ॥ या देहासी पैं केलें ॥९६॥

ऐसें बोलूनि वागुत्तर ॥ पुन्हां गमती मार्गापर ॥ मुक्काममुक्कामीं ज्ञानविचार ॥ गुरुशिष्य करिताती ॥९७॥

असो यापरी करितां गमन ॥ पुढें कथा येईल वर्तून ॥ नरहरीवशीं धुंडीनंदन ॥ श्रोतियांते सागेल ॥९८॥

तरी पुढील अध्यायीं कथाराशी ॥ पुण्यषर्वत पापनाशी ॥ श्रोते स्वीकारुनि मानसीं ॥ अवधानिया बैसावें ॥९९॥

तरी नरहरिवंशीं धुंडीसुत ॥ तुमचा आहे शरणागत ॥ मालू नाम ठेविलें सत्य ॥ तो कथा सांगेल तुम्हांसी ॥२००॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२०१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥२२॥ ओव्या ॥२०१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel