अनोखी भाऊबीज

      बाबांचा हात धरून खूप अधीर होऊन ती हॉस्पिटल च्या पायऱ्या चढत होती.

कधी एकदा बाळा ला पाहतेय असे तिला झाले होते. जेंव्हा पासून आई च्या पोटात बाळ आहे हे कळले तेंव्हा पासूनच ती खुप excite झाली होती. कधी एकदा बाळ आई च्या पोटातून आपल्या मांडीत येतेय असे तिला झाले होते. आणि आता तो क्षण आला होता. आत्ताच बाबांनी  गोड बातमी दिली होती की ती ताई झालीय. हॉस्पिटल मध्ये शिरताच ती धावत सुटली. आई च्या कुशीत झोपलेल्या इवल्या इवल्या गुलाबी रंगाच्या छोट्या बाहुल्या सारख्या आपल्या भावाकडे पाहून हरखून गेली .आई ने अगदी अलगद  पणे तिच्या मांडीत दिले आणि तिने पण हळुवार पणे आपल्या इवल्या हातांनी सांभाळत त्याला जवळ घेतले.त्या  दिवशी पासून  तीच्या छोट्याश्या भावविश्वाचा भाऊ अविभाज्य भाग झाला. आई बाळाला घरी घेऊन आल्यावर छोट्याश्या  ताई ने बाळा ची सगळी जबाबदारी आपल्या इवल्याश्या खांद्यावर घेतली.बाळाच्या दुपट्यांच्या घड्या घालणे,आंघोळीची तयारी करून देणे सगळी कामे अगदी तन्मयतेने करत असे. 

    पाहता पाहता बाळ मोठा होऊ लागला

व आपल्या ताई चे शेपुटच झाला. ताईम् वाक्यम प्रमाणं.आधी ताई नंतर आई बाबा. शाळेत जाताना ताई चा हात धरून जायचे. ताई ने सांगितले मस्ती नाही करायची तर मुकाट्याने राहायचे.ताई च्या जवळ अभ्यासाला बसायचे.बरे नसले तरी आई पेक्षा ताई च जवळ हवी वाटायची त्याला. हळू हळू ही जोडगोळी मोठी होऊ लागली. आपापल्या विश्वात रममाण होऊ लागली.तरी पण रात्रीच्या वेळी एकमेकांशी दिवसभरातल्या गोष्टी सांगितल्या शिवाय दोघांना झोप लागत नसे.भले बुरे जीवनाचे धडे ताई कडून घेत भाऊ मोठा होत होता.कशाची ही शंका आली तरी उत्तर म्हणून फक्त ताईच होती त्याच्यासाठी. प्रत्त्येक भाऊबीज प्रत्त्येक राखी पौर्णिमा दोघांचे प्रेमाचे नाते अजूनच उमलवत होते.ताईच पहिल्यापासून भावाला  गिफ्ट देत होती. आधी कधी खाऊ चे पैसे साठवून तर कधी शिकवण्या घेवून.  भावासाठी त्याची ताई खूप श्रीमंत होती. मनाने पण आणि पैशाने पण.ताई ला नुकतीच नोकरी लागली होती त्यामुळे तर भावाच्या इंजिनीरिंग ला सहजच ग्रीन सिग्नल मिळाला होता. आई बाबांच्या पाठीशी ताई भक्कम उभी होती.दोघा भावंडाना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे की ताईचे लग्न झाल्यावर काय होईल असा प्रश्न आई बाबांना नेहमी पडायचा.

   अन ती योग्य वेळ लवकरच आली.एक छान कर्तबगार राजपुत्र ताईच्या आयुष्यात आला.भाऊ सुरवातीला आपल्यातला वाटेकरी समजून नाराज झाला पण ताई ला खुश बघून आनंदला बिचारा.ताई ला चिडवण्यात तिच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त झाला. दिवस कसे भुर्रकन उडून जात होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम लाडक्या भाऊजीनी ओळखले होते.शक्य तेवढे ते त्यांच्या भावविश्वात ढवळाढवळ करत नसत.

       बघता बघता ताई आपल्या संसारात आणि भाऊ आपल्या अभ्यासात गुंतून गेले.पण रात्री फोन केल्या शिवाय  दोन मिनिटे बोलल्या शिवाय दोघांना चैन पडत नसे.एखादे पुस्तक विकत घ्यायचे आहे किंवा मित्रांबरोबर ट्रिप ला जायचे असेल  अजून ही त्याची ताई  त्याच्यासाठी श्रीमंतच होती. 

          बघता बघता भाऊ इंजिनिअर झाला.आई बाबा नोकरी कर म्हणून मागे लागले होते.पण भावा ची पुढे शिकायची इच्छा ताई च्या नजरेतून सुटली नव्हती. खर तर तिचा ही संसार वाढत होता, जबाबदाऱ्या वाढत होत्या. पण शेवटी  छोट्या छोट्या अडचणींना मात देत बहिणी चे प्रेम जिंकले होते. थोडे लोन घेऊन ,थोडे कर्ज काढून , थोड्या गरजा कमी करत सासरची नाराजी पत्करत ताई चा भाऊ आपले अवकाश गाठायला गेला सुद्धा.काही वर्षे जरा अडचणीची गेली. परदेशात राहून अतिशय तन्मयतेने भाऊ अभ्यास करत होता.अभ्यासाचे टेंशन कमी पण ताई पासून दूर राहायचे जास्त होते त्याच्यासाठी.बघत बघत दोन तीन वर्षे पार पडली. भावाला तिकडेच नोकरी लागली.काही वर्षात ग्रीन कार्ड पण मिळाले. एकदा इथे येऊन ताई च्या पसंती ने लग्न करून पत्नी सह तिकडेच  स्थिरावला. ताई भावाला आनंदी पाहून खुश होत होती. आता येणे जाणे जरा कमी झाले होते. तरीही भाऊबीज म्हणून अजूनही तिच्या हातचा दिवाळी चा फराळ  पार्सल होत होता.आई बाबांच्या शेवटच्या दिवसात 4 दिवसासाठी आला तिच्या मांडीत हामसून हामसून रडून गेला जसा लहान असताना रडायचा. तिने ठरवले होते आता सांगावे त्याला रहा इथेच .. जाऊ नकोस परत इतक्या लांब. मला तरी कोण आहे आता तुझ्याशिवाय. पण त्याच्या पत्नी च्या  नजरेतील कोरडे पणा पाहून तीे त्याला काही बोलली नाही.

       दिवस जात होते.अचानक  नवऱ्याचे आजारपण सुरू झाले.त्याच्या टेस्ट, त्याची सेवा शुश्रूषा यात ती बुडून गेली. गेली दोन वर्षे सतत किडनीच्या आजाराने नवरा त्रस्त होता.त्याचे आजारपण, घर संसार , मुलांची शिक्षण सगळे  करताना ओढाताण होऊ लागली.सासरचे आडून आडून चौकशी करत भाऊ परदेशात एवढा खोऱ्याने कमावतो , आतापर्यंत बहिणीच्या जीवावर एवढी मजल मारली आता कुठे आहे. बहिणी ची काहीच कशी काळजी नाही. भावाला त्रास नको म्हणून तिने त्याला काही कळवलेच नव्हते.

         एक दिवस डॉक्टरांनी निर्वाणी चे सांगितले की किडनी ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय नाही. ताई मटकन खालीच बसली.पैशाची कशीबशी सोय केली होती पण किडनी मिळत नव्हती. किडनी डोनर मिळण्यासाठी ताई  देवाचा धावा करत होती.तिच्या सौभाग्याशीवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ नव्हता. तिच्या नवऱ्याने तिच्यावरच्या हक्काच्या प्रेमात तिच्या भावाचा भाग  मनापासून स्वीकारला होता.भावासाठी काढलेले  कर्ज , केलेले कष्ट कशात कशात त्याने आडकाठी केली नव्हती. त्याच्या अबोल पाठिंब्यानेच तिने भावाची जबाबदारी निभावली होती.आता नवर्याशिवाय जगणे तिला असंभव वाटत होते.इकडे दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत होती आणि ताई ची कृश मूर्ती अजूनच कृश होत होती.

          एक दिवस तिला डॉक्टरांनी आनंदाने सांगितले की डोनर मिळालाय. ताबडतोब ऑपरेशन करायला हवे . डॉक्टरांची गडबड सुरू झाली. ताईला आशेचा किरण दिसू लागला.हा डोनर देवाच्या रूपाने आला असेच तिला वाटले. आपल्या कातड्याचे जोडे करून दिले तरी उपकार फाटणार नाहीत असे तिच्या मनात आले.ऑपरेशन चालू असताना ताई देवाजवळ बसून जप करत होती. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण पहाटे नर्स सांगायला आली की ऑपरेशन यशस्वी झाले आहे पण अजून दोन तीन दिवस धोका आहे.खूप काळजी घ्यायला हवी.आता हवी ती लढाई लढायला ताई सज्ज होती.नवऱ्याला पाहायला,त्याचा हात हातात घ्यायला ती अधिर झाली होती.

        एक क्षण आला की डॉक्टरांनी तिला आत बोलावले.तीच्या नवऱ्याजवळ नेले .त्याचा हात हातात घेऊन ती रडू लागली. दोघांनी देवाचे आभार मानले पण डॉक्टर म्हणाले देवाच्या आधी डोनर चे आभार माना. परदेशातून इतक्या लांब येऊन एका Nri ने आपली किडनी यांना डोनेट केली आहे.

         एक क्षण ताईने त्यांच्या कडे पाहिले  आणि तिरासारखी धावत त्या डोनरच्या खोलीत शिरली.आत जाताच थबकली. त्या खोलीत ताईचा  लाडका भाऊ आपली 'अनोखी भाऊबीज ' ताईच्या ओटीत घालून शांत पणे झोपला होता.

लेखन 

मंजू काणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel