पहाटे नेहमी प्रमाणेच दिवस माझा सुरू झाला
उबदार पांघरूणातून तुझ्याविनाच बाहेर पडला
तिकडे तुझा ही सुरू झाला असेल ना रे माझ्या विना
फोटोतल्या मला चुंबताना स्पर्श जाणवे इथे मला
आईबाबांसाठी केलेल्या चहा ने कप भरला
युद्धाच्या बातम्यांनी भरलेला पेपर दारी येऊन पडला
कुणी पहायच्या आत आधाशासारखा वाचून टाकला
मग निश्चिन्त मनाने चार आसुसलेल्या डोळ्यांहाती सोपवला
आंघोळ करून आरशासमोर कुंकवाचा करंडा हाती धरला
एक दिवस अजून तुझ्या सोबतीचा शाश्वत मला लाभला
तुही निश्चिन्त मनाने जा आता शत्रूवर चढाई करायला
इथे मी आहे घरदाराच्या साऱ्या लढाया लढायला
असशील सज्ज खांद्यावरल्या बंदुकीने वार करायला
मी ही सुसज्ज इथले सारे वार अंगावर झेलायला
अडचणींचा पाढा वाचून नको चित्त तुझे ढळायला
सारे आलबेल चे पत्र तरी मिळेल का तुला वाचायला
असतात शेजारी पाजारी ओ देतात माझ्या हाकेला
तूही सुख दुःखाची वाट मोकळी कर तुझ्या दोस्ताला
कुठे ही गेले तरी मान मिळतो सैनिकाच्या पत्नीला
उर अभिमानाने भरुन येतो असतोस सदैव संगतीला
राणा, शिवाजी च्या गोष्टी सांगते मी तुझ्या लेकाला
शूरते च्या तुझ्या गोष्टी ऐकताना गहिवरते आईबापाला
लेक होऊन घेईन काळजी त्यांची सांभाळ तू स्वतःला
दूर शरीराने तरी एकपणाचा वचननामा
निभावू आपला
मंजू काणे ©