शेणाच्या डागाचे लुगडे रात्री स्वच्छ धुतले होते . उद्याच्या दिवसाची मोठया आतुरतेने वाट पहात होते. रात्रभर मनाशी छान छान स्वप्नांची माळ ओवत होते.

उद्या माझा जन्मदिवस.... अख्खा महाराष्ट्र साजरा करेल. सकाळ पासून शाळेमध्ये लगबग चालू होईल. इवल्या इवल्या सावित्री माझ्या वेशात नटून येतील. माझ्या जीवन गाथे च्या नाट्यछटा रंगवतील. छोटे 'फुले'आमच्यावर गौरव गीत गात मुग्ध करतील. प्रबोधनपर भाषण करत सारे शिक्षक स्त्री शिक्षणाचे महत्त्व कथन करतील. नवे संकल्प , नव्या संकल्पना राबवल्या जातील. माझ्या जयंती निमित्त खेडोपाडी मुलींच्या

शाळा स्थापन केल्या जातील. वृत्तपत्रातील बातम्या,मथळे, रकाने भरूनगौरव गीत माझे गातील. जागोजागी , गल्लोगल्ली माझ्या स्मृतीला अभिवादन करून कर्तृत्ववान स्त्रियांना मानवंदना दिली जाईल. माझ्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक सावित्री स्फुरण घेतील.

पण आज असे काय होत होते...

सगळीकडे शुकशुकाट , स्मशान शांतता का होती!

सुरक्षेच्या कारणास्तव विद्यालये बंद , गल्ल्याबोळ ओसाड. जीव धोक्यात घालून घेतलेला शिक्षणाचा वसा आज

विलक्षण केविलवाणा झाला होता. अनेक शिकलेली लोकं आज पाटी ऐवजी काठी घेऊन फिरत होते. माझी शिक्षणाची पेटती मशाल घेऊन रस्ते , दुकान, वाहनेे पेटवत होते. शिक्षणाने शहाणपण येते पशुत्व हारते हे मीच दीडशे वर्षांपूर्वी बोललेले सर्वमान्य झाले होते ना..मग हे शिक्षित पशुत्व कुठून आले परत?

पुन्हा एकदा दगड धोंड्यांचे आघात सोसत मी पायवाट तूडवत होते. पुन्हा एकदा द्वेषाचे शेणगोळे माझे लुगडे झेलत होते.

पण ....पण.... या सावित्री ला हार माहीत नाही.या सावित्रीला थांबणे माहीत नाही. ज्योतिबांनी दिलेला वसा त्यांची शिष्या कधीही सोडणार नाही. ती पुन्हा चालेल , हातात पाटी घेऊन ,  पदरात शक्ती घेऊन, डोळ्यात तेज सूर्याचा अंगार घेऊन , बोटात लेखणी ची धार घेऊन

'शहाणे कराया सकल जन' ती चालत राहील. उद्या शाळा उघडेल..गल्ल्या बोळ मोकळे होतील.कालचे अधुरे स्वप्न सावित्री च्या लेकी आपल्या नजरेतील ठिणगीने सारे ब्रह्मान्ड तळपवतील. सारे ब्रह्मान्ड तळपवतील.

© मंजू काणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel