पाटी वाचून मीआत शिरले.

वृद्धाश्रम चे नाव श्रीमंत.. मला आश्चर्यच वाटले. कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला.

आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही. पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता.माझी पाऊले वासाच्या दिशेने जाऊ लागली.वृद्धाश्रमाच्या स्वैपाक खोलीतून हसण्या खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला.आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच. दोन आज्या मोठ्या कढई मध्ये पोहे भाजत होत्या. दोघी जणी लाडू वळत होत्या तर दोन आज्या करंज्याना सुरेख आकार देत होत्या.आजोबा पण काही मागे नव्हते बरं का,चकली च्या सोर्यातून सुरेख चकल्या

त्या थरथरत्या हातातून पडत होत्या

कोणा आजोबांचे चिवड्या साठी मिरची कढीपत्ता खोबऱ्याचे काप करणे चालले होते. वातावरण कसे प्रफुल्लीत होते.कुठे ही माझ्या मनात कल्पिलेली मरगळ उदासिनता नव्हती.सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते.अहो आजी.. जर साखर कमी घाला पाकामध्ये तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात.तर आजी म्हणतात अहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू

देत हो.अहो साठे काकू चिवडा तुमच्या सारखा झणझणीत होऊ दे बर का.

कोणी बाहेर आलेय याची जर सुद्धा शुद्ध त्या तरुणांना नव्हती. मी अजून ही अवाक होते.निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अश्या उद्देशाने मी तिथे आलेली.एवढ्यात "श्रीमंत "चे व्यवस्थापक मागून आले.त्यानी माझी ओळख करून दिली.मी तिथेच त्यांच्या शेजारी फतकल मारून बसले व त्यांच्या गप्पात रममाण झाले.इतक्या मोठ्या प्रमाणात चिवड्या लाडू  हा काय प्रकार असेल? माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीनी सांगायला सुरुवात केली.सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हातानी बनवतो.आम्ही कधी ही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही.की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशा ही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेंशन आहे.काही जवळ थोडी माया ठेऊन आहेत.त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो.केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो.थोडा रस्त्या च्या कडेच्या गरिबांना वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो.अग नुसती दिवाळी नाही तर नाताळ चा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो.या नेने काकू आहेत ना त्या मस्त केक बनवतात. आणि हे अंतू काका मस्त सांता चा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत सुटतात.एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होतकरू विद्यार्थ्यांसाठी कितीतरी पेन पेंसिली कंपास आशा वस्तू त्यांच्या जादूच्या पोतडीतून बाहेर निघतात.संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो.इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते.आश्रमातले एक आजोबा गायक होते. पण अर्धांग वायू मुळे ते इथे विश्रांती घेतायत.न परवडणाऱ्या फीने उदयोन्मुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात. नात्यांचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात.इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात.मी जरा भीत भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला.इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले काम करते हात थबकले.

तितक्यात बाहेरून नानु मामा वयाला न शोभेल असे धावत आले.त्यांच्या हातात एक कंदील होता जो त्यांनी दोन दिवस बसून स्वतः तयार केला होता.सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्याच उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला  निघून पण गेले.व्यवस्थापक म्हणाले हे नानु मामा ..तरुण वयात दोन लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले.स्वतःच्या मुलींप्रमाणे नानु ने बहिणींना वाढवले.कधी आई च्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले.शिकवून सावरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही.दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेंव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले.आता वय झाले नानु ला एकटे राहावे ना.पण दोन्ही ही बहिणींनी एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला.एक म्हणे माझ्या हातात काही नाही .माझे घर सुनांच्या ईशाऱ्याने चालते.तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही याचे कोण करणार.भरीतभर म्हणजे राहती जागा नूतनिकरणा साठी पाडायची ठरली तेंव्हा दोघींनी आपला हक्क मागितला.निराश नानु मामाची पाऊले इकडे वळली ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्नसमारंभात व्यवस्थापकांना नखशिकांत दागिन्यांनी मढलेल्या दोघी बहिणी दिसल्या.आपापल्या सुनांची तक्रार करताना.अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती.मला नानुमामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला.प्रमिला ताईंचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला.कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ.कोणाकडे जागेची अडचण.वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने रहात होते.वत्सला ताई म्हणाल्या,हे गेले. पदरी मूळ बाळ नाही.मी स्वतःच कोणावर भर नको म्हणून इथे आले. एकच भाऊ मला. खूप श्रीमंत आहे पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण येत नाही.नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही काय उपयोग दिवाळी चा.असे नैराश्य आले असतानाच नानु मामांनी मला भाऊबिजेला बहीण मानले ओवाळायला लावले. आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले थंडी जवळ आलीय लवकर स्वेटर विणून ठेव.तेंव्हापासून मी स्वतःला त्या लोकारीच्या उबदार विणेत गुंतवून घेतलंय. आता एकच नाही अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे.

रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागले होते.बऱ्याचदा ही कातर वेळ जीवघेणी असते पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते.तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता.आकाशकंदीलाचेे तेज चंद्राला ही लाजवत होते.सगळे जण  ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते.थोड्याच वेळात नव गायक समूहाचे आगमन होणार होते.आपल्या गुरू ला गुरुदक्षिणा देण्यासाठी . सदाबहार  गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनादणार होता.

आरोह अवरोह,आलापा ने कोपरा कोपरा शब्दसुगंधी होणार होता.मी हळूच तिथून बाहेर आले.कुठे मी कवडीमोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते.पिशवीतले एव्हढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजिरवाणे करून गेले.मोठ्या दिमाखात "श्रीमंत वृद्धाश्रमाच्या" पाटी कडे माझे लक्ष गेले.आणि कळले स्वर्ग म्हणजे काय.त्या साठी "आभाळातच" जायला पाहिजे असे नाही. थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्यापाशीच  आहे.त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पाऊले घराकडे वळली .

मंजू काणे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
pratima

beautiful and heart touching story

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to बंध रेशमी


मृगजळ
खडका कोथिंबिरीची गोष्ट
ती लाल खोली
वाड्याचे रहस्य
ताऱ्याच्या शोधात
कल्पनारम्य कथा भाग २
आनंदयात्रा
गूढकथा भाग ३
गूढकथा भाग २
संगीता देवकर यांचे लेख
~ काव्यमय मधुरा ~
छोटे बच्चों  के लिए -अस्सी घाट की कविताएँ
आंतोन चेकॉव्ह कि कहानियाँ
फडणीसांच्या लेखणीतून
टीका आणि प्रशंसा - एक आढावा!