सदाचरणानें व सुनीतीनें वागण्याचा उपदेश
(ओवी)
सूत सांगे शौनकांदिकां । सोमकांत वदे पुत्रांदिकां ।
गोपुरावरी एकांतिका । नेलें पुत्रासी उपदेशा ॥१॥
सोमकांत वदे पुत्रास । अनेक नीतीच्या बोधांस ।
शांत करुनियां चित्तास । हेमकंठ ऐके ता ॥२॥
सुप्रभातीं उठावें । शुद्धस्थानीं बैसावें ।
देवादिकाम स्मरावें । अपराधाच्या क्षमेसी ॥३॥
भूमीची प्रार्थना करणें । गणपतिपंचायतन स्तवणें ।
येणेंपरी प्रातःस्मरणें । नित्यनेमें करावीं ॥४॥
उपास्यदेवता भक्तीपूर्वक । मानसपूजा ध्यानपूर्वक ।
क्षमस्व क्षमस्व विधीपूर्वक । म्हणूनियाम उठावें ॥५॥
प्रातर्विधि नैऋत्य दिशेस । जाऊन करणें अवश्य ।
क्षीरवृंक्षादि कंटक वृक्ष । दंतधावनिं योजावे ॥६॥
काष्ठ आणितां वनस्पतींस । बल ओज तेज यशास ।
बुद्धि, द्रव्य, पश्चांदिकांस । प्रार्थनापूर्वक मागावीं ॥७॥
सीतोदकाचें मुख्य स्थान । संध्यापूजादि औपासन ।
अधिकारपरत्वें करुन । ब्राह्मणासह जेवावें ॥८॥
मग करावें पुराणश्रवण । नंतर करावें तांबूलभक्षण ।
पुढें विश्रांती घेऊन । येणेंपरी वर्तावें ॥९॥
(गीति)
परनिंदा, परपीडा, आत्मस्तुति ही कधीं न यो वदना ।
गुरुद्रोह वेदनिंदा, ऐशीं कर्मे कधीं न यो ध्याना ॥१०॥
परपत्नीसेवनादिक, तैसें भक्षण अभक्ष्य वर्जावें ।
असत्य भाषण करणें, ऐशां कर्मांस नित्य वर्जावें ॥११॥
दीन दरिद्री अंधां, अन्न समर्पी तसेंच वस्त्रांस ।
संतांचें पालन हें, भक्तिपुरस्सर करीत जा वत्स ॥१२॥
दुष्टांना दंडावें, अपराध्यांना तसेंच शत्रूला ।
शासन करणें बा हा, राजाचा मुख्य धर्म जो कथिला ॥१३॥
शत्रू आणिक घातक, यांना जाणुन ठेवीं विश्वास ।
ज्ञाते पुरुष जाणुन, विचार घेणेंचि योग्य समयास ॥१४॥
नीतीशास्त्रांमाजी राजाला मुख्य मुख्य षड्गुण ।
तैशाच तीन शक्ती, साह्य अशा मुख्य मुख्य साधून ॥१५॥
राजानें राज्याचा, करणें जो कारभार तो भारी ।
त्यामाजी ठेवावें, दाक्षिण्यचि वर्म हेंच स्वीकारीं ॥१६॥
दान करावें ऐसें, अपुली शक्ति असेल त्यापरि हें ।
त्यामध्यें दात्यानें, न करावें न्यून अधिक अंतर हें ॥१७॥
(स्वागता)
हेर हे असति राजकुमारा । नेत्र रुप करिती चहुं-बारा ।
दूत हे असति राजकुमारा । वक्त्ररुप करिती श्रुत हेरा ॥१८॥
योग्य दंड करणेंच ही नीती । सोडितांच घडते ही अनीती ।
शासनास भिउनी जन सारे । धर्म आचणिं ते रत सारे ॥१९॥
कोणि जे करिति हे जन स्तौत्य । कोणि मानिति असें जन वंद्य ।
हर्षरोष धरणेंच अयोग्य । वागणें समसमानच योग्य ॥२०॥
सर्वही मसलती करि गुह्य । काम राग असे षड्रिपु साह्य ।
ज्यास हे असति साध्य कुमारा । जिंकितो इतर शत्रुच हेरा ॥२१॥
(गीति)
ज्या ज्या वस्तू असती, उपजीवन चालण्यास त्या योग्य ।
नाश करुं नये त्यांचा, हेंचि असें वागणें तुला योग्य ॥२२॥
देवालय, उद्यानें, चैत्य तशा ज्या अनेक कार्यांस ।
दिधल्या उत्पन्नासी, परतहि घेणें अनिष्ट भूपास ॥२३॥
(दिंडी)
स्त्रियांपाशीं जी गुह्य अशी गोष्ट । नको बोलूं तूं होति सदा कष्ट ।
लहान मोठयाही सेवकांसि वागे । मनोवृत्ती ही वेधती प्रेमभावें ॥२४॥
(गीति)
विद्याधिश मुख्य असे, क्षेमंकर ज्ञानवंत हे तीन ।
असती प्रधान त्यासी, पाचारी भूप त्या त्वरें करुन ॥२५॥
पुत्रास राज्य द्यावें, आयती करणें अशी दिली आज्ञा ।
यास्तव याज्ञिक कर्ते, आणिले ब्राह्मण करावया यज्ञा ॥२६॥
कौटुंबिक आप्त सखे, नगरांतील मुख्य जन सारे ।
आमंत्रुनी तयांना, आणविले त्वरित त्यांस सत्कारें ॥२७॥
गणपतिपूजन करुनी, धार्मिक विधियुक्त हेमकंठास ।
राज्याभिषेक करणें, आज्ञापी नगरवासि लोकांस ॥२८॥
राजा मंत्र्यांसि म्हणे, मत्पुत्रासी तुम्हांस अर्पियलें ।
तुमचा पुत्र म्हणुनियां, पालन करणें तुम्हांकडे दिधलें ॥२९॥
आजवरि तुम्ही सर्वहि, माझ्या आज्ञेस पूज्य मानियलें ।
आतां तसेंच वर्तुनि, मत्पुत्रा पाहिजेच तोषविलें ॥३०॥