विष्णूचें गंधर्वरुप
(दिंडी)
सोमकांताला सांगती च्यवनतात ।
मधू कैटभ हे त्रैलोक्य पीडितात ॥
इंद्रचंद्रादी देव तयां भ्याले ।
स्थान अपुलेंहि सोडुनी पळाले ॥१॥
पुढें झोपेंतुन विष्णु तयी मात ।
कळे राक्षस हे पीडिती बहूत ॥
तयां सांगुनियां विष्णु करी युद्ध ।
देव झाले साह्यार्थ तदा सिद्ध ॥२॥
(गीति)
युद्धास सिद्ध होतां, विष्णूनें शंख फुंकिला आधीं ।
हा शंखनाद ऐकुनी, मधु-कैटभ पावले भया आधीं ॥३॥
म्हणती एकमतें कीं, जिंकियलें त्रिभुवनास आजवरी ।
हा शंखनाद ज्याचा, तो योद्धा धीर वीर बहु भारी ॥४॥
त्याच्या संगें लढतां, मरण जरी पावलों अम्ही साचे ।
युद्ध करुनियां त्यासी, जय मिळवूं बोलती असे वाचें ॥५॥
असुर सुरांना म्हणती, जरि तुम्हां वाटतोच अभिमान ।
आम्हांपुढें तुम्हां हा, न चले देवां वृथाच अभिमान ॥६॥
युद्धास सिद्ध व्हावें मधु-कैटभ हे हरीस सुचवीत ।
सूचित वाणी परिसुन, विष्णु म्हणे तें नृपास मुनि कथित ॥७॥
विष्णूनें दैत्यांसी, युद्ध करायास सिद्ध मी आहें ।
तुम्हीं तयार व्हावें, युद्धालागीं समर्थ मी आहें ॥८॥
असुर हरीसी वदती, तुजला आहेत हात हे चार ।
म्हणुनी सामर्थ्याचा, गर्व असे कीं तुला खचित फार ॥९॥
अंगीं बळ जरि असलें, तरि तूं आम्हांसवें भुजा-युद्ध ।
करण्यास सिद्ध व्हावें, ऐसें वदतों तुला अम्ही सिद्ध ॥१०॥
(शिखरिणी)
भृगू भूपा सांगे असुर वदतां ऐकुन हरी ।
त्यजी तेव्हां शस्त्रें उभय असुरां धाउन धरी ॥
भुजा-युद्धाला तो समर-अवनी पाहुन करीं ।
कशी त्या दोघांची लगट बरवी ती श्रुत करीं ॥११॥
शिरांलागीं शीर्षे जघन जघनींसी झगटती ।
करालागीं तेव्हां सकल कर हे एकवटती ॥
तशीं नाकां नाकां सम सम अशीं तीं लगटती ।
तसे स्कंधां स्कंधां मिळत मिळई ते अवचितीं ॥१२॥
भुजा-युद्धामध्यें करित असती ते चतुरता ।
तसे ते अन्योन्यां बुकलबुकलीती उभयतां ॥
असें केलें युद्धा उभय असुरां एकचि हरी ।
अशा त्या युद्धाला बहुत अवधी हा हरि करी ॥१३॥
परी ते दोघेही असुर असती एकच हरी ।
म्हणूनी दैत्यांना अपयश न देतो मुर-हरी ॥
पुढें युद्धाला तो रहित करुनी गानचतुर ।
असें गंधर्वाचें स्वरुप धरितो अंबुज-धर ॥१४॥
(शार्दूलविक्रीडित)
वीणा वाजवि श्रीहरी मधुरसा ऐकून त्याचा स्वर ।
रानींचीं हरिणें तशीं वनचरें गुंगून झालीं स्थिर ।
होती तल्लिन देवदानव तिथें आश्चर्य कैसें असें ।
जे जे ऐकति ते स्वकार्य त्यजिती मोहून गेले तसे ॥१५॥
ऐसें गायन ऐकिलें बसुनियां कैलासनाथें गिरीं ।
आले गायक न्यावयास गण ते ऐके नृपा हें तरी ।
पुष्पीदंत निकुंभ त्यास वदती गाया चला सत्वर ।
शंभूंनीं अणण्यास हो उभयतां आलों चला लौकर ॥१६॥
शीर्षीं चंद्र तशी उमा जघनिं ही शोभे कशी सुंदर ।
कंठीं शोभत रुंड-माल करिंचें घेईच चर्मांवर ।
ऐसा शंभु तयास गायक नमी निःसीम भावें पदां ।
विष्णूसी शिव दे उठून असना जाणून प्रेमें तदा ॥१७॥
(स्त्रग्धरा)
धर्मार्थादी मला तो सहज मिळतो लाभ या दर्शनाचा ।
झालों मी धन्य देवा वदत हरि तया मोद दे गायनाचा ।
या गानानें भवानी सुर गणपतिही तोषले स्कंद तोषें ।
ऋष्यांदी श्रावकांना प्रमुदित करि तो विष्णु गंधर्ववेषें ॥१८॥
ऐकूनी गायनाला अतितर शिव हा तोषला विष्णुपाशीं ।
सोडूनी आसनाला बहुत लगबगें भेटला प्रेमपाशीं ।
झालों मी तृप्त आतां वरद वर तुवां मागणें इष्ट साचें ।
सांगे विष्णू शिवाला सकल कथन तें दोनही राक्षसांचें ॥१९॥
शंभूला हें विचारी हनन करुं कसें सांगणें राक्षसांचें ।
सांगे विष्णूस तेव्हां प्रथम गणपती पूजणें आधिं साचें ।
होतें तें तूं न केलें म्हणुन तुज तदा राक्षसांना वधाया ।
नाहीं सामर्थ्य झालें यजन अधिं करी सांगतों या उपाया ॥२०॥
(ओवी)
विष्णू म्हणे शिवासी । कैसें पूजूं गणेशासी ।
हें सांगणें मजसी इष्ट कार्य साधावया ॥२१॥
(गीति)
सांगे हरीस शंभू, पावायास्तव भजें गणेशास ।
आहेत सात कोटी, मंत्रांतून श्रेष्ठ जो जपायास ॥२२॥
मंत्रांमध्यें दोनच, एकाक्षर व षडक्षरी मंत्र ।
आहेत मुख्य त्यांतिल, देतों तुजला षडक्षरी मंत्र ॥२३॥
मंत्रोपदेश शिव दे, विष्णू घेई अनन्यभावानें ।
प्रार्थुन निघे शिवाला, सिद्ध क्षेत्रीं प्रविष्ट होत मनें ॥२४॥