सिद्धि-क्षेत्र माहात्म्य
(दिंडी)
भृगू सांगति कथन असे रम्य ।
नृपा ऐके हें सुरस असें काम्य ।
मधू-कैटभ या राक्षसां वधाया ।
तपा योजी हें विष्णु तया ठायां ॥१॥
विधीपूर्वक तो मंत्र जपायासी ।
स्थान केलें तें बाण-यंत्र वासी ।
स्थान केलें तें भूतशुद्धि युक्त ।
विधी केला तो जपा आगमोक्त ॥२॥
विधीपूर्वक हें तीव्र तपा केलें ।
वरद गणपतिसी साध्य असे केले ।
नित्यनियमानें चालवी तपासी ।
असे निरहारी आब्द शतें ऐशीं ॥३॥
(उपजाति)
गणेश बोले गरुडध्वजास । संतुष्ट झालों तुझिया तपास ।
वरास घेईं मिळवीं यशास । पूर्वींच मातें स्मरतांच खास ॥४॥
खगध्वजानें स्तविलें गणेशा । मागून घेई असुरांस नाशा ।
तैसेंच द्यावें असुरां वधार्थ । मागे वरासी यशसाधनार्थ ॥५॥
(यूथिका)
भूपतीस वदले भृगुराज जें । विष्णुला वर दिला गिरिजात्मजें ।
स्थान तें परम पावन जाहलें । स्थापिलें म्हणुनि मंदिर चांगलें ॥६॥
गंडकि गणपती करितो हरी । स्थापना भवनिं त्या करुनी सुरीं ।
विष्णुला यशद हा गणनायक । स्थान हें वदति सिद्धविनायक ॥७॥
(गीति)
मधु-कैटभासि पुनरपी, आरंभीं युद्ध फार तुंबळ तें ।
करितां बहूत वरुषें, विष्णु वदे राक्षसांस भृगु कथितें ॥८॥
माझे प्रहार सोसुन, शौर्यें निभलां म्हणून आनंद ।
तुम्हांसम आजवरी, नाहीं दिसले विशेष आनंद ॥९॥
यास्तव वर मागावा, व्हावा वर तो तुम्हांस मी देईं ।
राक्षस हंसून वदले, आम्ही देतों तुलाच वर घेईं ॥१०॥
तुजसम युद्धामाजी, निपुण असा धीर-वीर नाढळला ।
मायें मोहित झाले, म्हणती घेईं वरास तूं हरिला ॥११॥
विष्णु म्हणे राक्षस हो, माझ्या हस्तें मरा तुम्ही दोघे ।
ऐसा वर देउनियां, धन्य करा हो मला तुम्ही दोघे ॥१२॥
ऐसें भाषण ऐकुन, राक्षस बघती चहूंकडे जेव्हां ।
सृष्टी जलमय झाली, पाहुन वदती हरीस ते तेव्हां ॥१३॥
गरुडध्वजा तुझा बा, आम्हांला हा प्रताप माहीत ।
मरण अम्हांला यावें, हस्तें तुझिया असेंच इच्छीत ॥१४॥
यास्तव वधीं अम्हांला, जलही नाहीं अशाच त्या स्थानीं ।
ऐकुन हरिनें त्यांना, उचलुनि स्वकरेंच घेतलें जघनीं ॥१५॥
मधुकैटभासि तेथें हातांतिल काढिलें सुदर्शन हें ।
तेणें बघून त्यांना, दिधलें अपुलें करीं सुदर्शन हें ॥१६॥