ब्रह्मदेवकृत सृष्टीची उत्पत्ति

 (गीति)

ऐकुनि कथा विधीची, आनंदें भूप तो पुसे मुनितें ।

चतुरानन वरदानें, सृष्टी रचिली कशी मला कथि तें ॥१॥

भृगु भूपतीस सांगति, चतुरानन लागला स्वकार्यास ।

मानसपुत्रां सातां, निर्मुन सांगे स्वकर्म कार्यास ॥२॥

तेव्हां मानसपुत्रीं, आधीं केलें तपास मुक्‍त्यर्थ ।

कमलोद्भवें विलोकुन पुनरपि निर्मी कुमारकार्यार्थ ॥३॥

त्या पुत्रांना सांगे निर्मा तुम्ही प्रजेस इत्यर्थ ।

त्या पुत्रांनीं कैसें वर्तन केलें कथा मला अर्थ ॥४॥

त्यांनीं तप तें केलें, ज्ञानी झाले म्हणोन विस्मरले ।

हें पाहुनी विधीनें, आपण अपुलें स्वकार्य पतकरिलें ॥५॥

स्वमुखापासुन त्यानें विप्राग्नीसी अधीं जनित केलें ।

बाहू जंघांपासुन योद्धे वाणी असेहि निर्मियले ॥६॥

चरणांपासुन केलें, क्षुद्रांनाही तसेंच निर्माण ।

यापरि चारी वर्णां, निर्मुनि भू ही पदींच निर्माण ॥७॥

हृदयापासुन शशिला, सूर्याचें जनन नेत्र हें स्थान ।

कर्ण तयाचे भूपा, प्राण तसा वायुही जन-स्थान ॥८॥

नाभीपासुन ख जनीं, शीर्षिं तसा स्वर्ग तो असे निर्मी ।

निरलस असा विधी हा, रतला भूपा चतूर त्या कर्मी ॥९॥

यापरि जगता जनिलें, तदुपरि सागर तशाच सरिताही ।

तैसेंच पर्वतादी, निर्मियल्या तरुलतादि सहिता ही ॥१०॥

कांहीं अवधी जातां, निद्रित विष्णू असून कर्णी त्या ।

कैटभ मधू असे हे, पिशिताशन दोन दुष्ट निर्मुनि त्या ॥११॥

विष्णुसुतासी त्यांनीं पीडा दिधली असह्य ती फार ।

तैसेंच निंदिलेंही, देव, मुनी, साधु शास्त्रवेद वर ॥१२॥

दैत्यें पीडित केली, सृष्टि तशी ती वसुंधरा राया ।

शेषहि कांपे तेव्हां, राक्षस हे धावले विधी खाया ॥१३॥

विष्णूला मोहोनी, निद्रादेवीं तयास वश केलें ।

कमलासनें तियेचें, स्व-भयास्तव कीं स्तवास बहु केलें ॥१४॥

प्रार्थुन म्हणे तियेला, सावध करि हा हरी महा-मायें ।

मधु-कैटभ नाशाया साठीं मोहित करी तया मायें ॥१५॥

या दोघांनीं माझी, पूर्वीच्या जन्मकाल अवधींत ।

तपसा बहूत केली, दिधले वर मीं अनेक हे त्यांत ॥१६॥

माझे वरप्रदानें राक्षस हे मातले बहू देवी ।

त्यांच्या वधार्थ हरिला, मुक्त करीं गे म्हणें तुला देवी ॥१७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel