गौरी अभिषेक ठमके
'आमच्या वेळी बाबा असे काही नव्हते हं....' आपल्या आधीच्या पिढीच्या म्हणजे आपल्या आई वडील किंवा आजी आजोबांच्या तोंडातून घरोघरी ऐकिवात येणारा हा संवाद मग मुद्दा कोणताही असो, अगदी लग्न, घटस्फोट, संसार, किंवा शिक्षण. असो...बाकीच्या विषयांचं माहित नाही पण शिक्षण म्हणाल तर आजकालची शिक्षण पद्धत बघता हा संवाद नक्कीच सुयोग्य ठरेल.
काळानुसार शिक्षण पद्धत ही आता खूपच बदलली आहे. पण ही बदललेली शिक्षण पद्धत खरंच योग्य आहे का? हे एकदा तरी तपासून बघायला काय हरकत आहे. कदाचित आपले उत्तर आपल्यालाच मिळेल. आजकालची शिक्षण पद्धत म्हणाल तर मुलांना शैक्षणिक दडपण आणि पालकांना आर्थिक दडपण. सर्व गोष्टींप्रमाणे आज शिक्षणाचा सुद्धा बाजार झाला आहे आणि खाजगी शाळांनी तर हा बाजार चांगलाच उचलून धरला आहे. आणि याचा परिणाम( अर्थात दुष्परिणाम) म्हणावा कि काय? पण आजकाल पालक मुलांना शाळेत प्रवेश घेताना आपल्या मुलाच्या अभ्यासू क्षमतेपेक्षा कोणती शाळा branded आहे याचा जास्त विचार करतात किंवा स्पर्धेपोटी अमुक चा मुलगा याच शाळेत प्रवेश घेतोय मग मी पण याच शाळेत प्रवेश घेणार, याचा जास्त विचार करतात. पण हा विचार करताना त्या शाळेची गुणवत्ता काय आहे किंवा आपल्या मुलासाठी खरंच ती शाळा योग्य आहे का? हा विचार कोणी करतं का? आणि त्याचा परिणाम होतो तो त्या मुलावर. कारण त्याची आकलनक्षमता आणि त्या शाळेची शिक्षण पद्धत याचा त्याला कधी मेळच बसत नाही आणि परिणामी मुलांमध्ये निर्माण होतो न्यूनगंड. पण या गोष्टीला जसे पालक जबाबदार असतात तशीच शाळाही असतेच . खासकरून खाजगी शाळांकडून हे असे प्रकार होतच असतात. आज मुलाने शाळेची फी भरली नाही म्हणून मुलाला शाळेबाहेर उभे करण्यात आले किंवा आज काय तर काहीतरी क्षुल्लक कारणामुळे मुलाला शिक्षकाने केलेली मारहाण अशा घटना आपण वरचेवर एकत असतोच.
शाळेची अवास्तव फी हाही मुद्दा ऐरणीवर आहेच. खरंतर शाळेची फी वाढ ही पालक आणि शिक्षण संघटना यांमध्ये चर्चा करून ठरवण्याची गोष्ट आहे, पण आजकाल शाळा अवास्तव फी वाढ तर करतेच पण पालकांना विचारात न घेता त्यांना गृहीत धरते आणि फी वाढीचा निर्णय त्यांना सुनावला जातो. मग त्या फी वाढीविरोधी आंदोलने होतात ,मोर्चे निघतात मग त्या त्या मुलांना शाळेत प्रवेश निषिद्ध केला जातो वगैरे वगैरे... अरे पण या सर्व प्रकारांमध्ये मुलाचं शैक्षणिक नुकसान होतंय हे या शाळांना आणि पालकांना कधी कळणार...?
बरं...या खाजगी शाळा आपला बराचसा विद्यार्थी वर्ग हा मध्यमवर्गीय आहे याचा विचार कधी करणार आहे...? ज्यांना ही फी वाढच परवडत नाही त्यांच्यावर शाळेची सहल, स्नेहसंमेलन , विविध प्रोजेक्ट किंवा काहीच नाही तर शाळेचे गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य हे शाळेतूनच घेतले पाहिजेत याचं बंधन,या आणि अशा अनेक माध्यमातून उकळले जाणारे पैसे हे वेगळेच.
आपले आई वडील ही शिकलेच की...पण त्यांच्यावेळी खरेच असे काही नव्हते. तरीही आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेतच ना आणि त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात यशस्वी आहेतच ना. त्यांच्या वेळी मराठी माध्यम शिक्षण ही एकच पद्धत होती...पण आज मराठी माध्यम तर नसल्यासारखंच आहे पण इंग्रजी चा नको तितका बागुलबुवा केल्यामुळे नवीन अस्तित्वात आलेले हे इंग्रजी माध्यम, त्याच्या जोडीला सेमी इंग्रजी माध्यम, आणि त्यांच्याच हातात हात घालून आलेले किंडरगार्डन आणि प्लेस्कूल... आणि यांना खतपाणी देणारे लोक अर्थात पालक म्हणजे आपणच नाही का? आज वर्ष- दीड वर्षाच्या मुलांना ज्यांना बोट धरून सुद्धा नीट चालता येत नाही किंवा बोलता येत नाही त्यांना प्ले स्कूलच्या नावाखाली आपण थेट शाळेतच बसवण्याच्या गोष्टी करतो हे खरंच योग्य आहे का?? यावर प्ले स्कूलचं म्हणणं काय असतं? तर म्हणे त्यांना शाळेत बसण्याची सवय होईल ही सबब देऊन त्या मुलांच्या गणवेश आणि पुस्तकांच्या नावाने हे लोक पैसे उकळतात ही साधी गोष्ट आपल्या सुजाण पालकांच्या तरी लक्षात यायला हवीय. मूल बोलायला किंवा चार मुलांमध्ये बसायला तर घरात सुद्धा शिकू शकतोच ना. त्यासाठी खरच या प्ले स्कुल वगैरे ची गरज आहे का? जे वय त्यांच्या खेळण्याचे, मस्ती करण्याचे किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्याचे आहे आणि पालक या नात्याने आपणही त्यांच्याबरोबर लहान होण्याचे आहे त्या वयात आपण त्यांना या अशा प्ले स्कूलमध्ये बसवून त्यांच्यावर बंधन तर नाही आणत आहे ना? हे आपणच आपले पडताळून बघायला हवे.
अर्थात जर शिक्षणाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी पालकांनी आणि शाळांनी जर नीट पडताळून पाहिल्या तर आपल्या शिक्षण पद्धतीला नाव ठेवायला जागा उरणारच नाही. आणि जर असे नाही झाले तर आपली पुढची पिढी त्यांच्या मुलांना पाळण्यात टाकण्याऐवजी थेट प्ले स्कुल नावाच्या शाळेत टाकायचा विचार करू लागली तर आपण त्यात नवल नको मानायला.....बरोबर ना?. त्यावेळी आपण पण कदाचित असंच म्हणू .." आमच्यावेळी असं नव्हतं बरं कां...."