कवितासागर प्रकाशनप्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य हे एक सिध्दहस्त लेखक तथा उत्तम कथाकार आहेत. त्यांचे वडील डॉ. हेमचंद्र वैद्य हे 'सन्मति' या बाहुबली-गुरुकुल मुखपत्रातून, 'उद् बोधन' या सदराद्वारे उद् बोधनपर लेखन करीत होते. घराण्याचा लेखनाचा वारसा समर्थपणे चालवणारे आमचे सन्मित्र, प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांचा 'उद् बोधन' हा पहिला कथासंग्रह, दिनांक ७ ऑगस्ट २०१६ रोजी, गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी (नागपंचमी) दिवशी, बाहुबलीला प्रकाशित झाला. त्याच महिन्यात 'सुबोधन' या नावाचा त्यांचा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि आता समाधीसम्राट १०८ आचार्यश्री शांतीसागर महाराजांच्या ६१ व्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे दिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी 'प्रबोधन' या नावाचा प्रवीणकुमारांचा तिसरा कथासंग्रह, अब्दुल लाट येथे प्रकाशित होत आहे.

विशेष म्हणजे प्रवीण यांनी अल्पावधीत, 'तीन' साहित्य अपत्यांना जन्म दिला. ख-या अर्थानं त्यांना 'सद् बोधनाचं तिळं' झालं, याचा मला मनस्वी आनंद झाला. म्हणून मी त्यांचे 'त्रिवारअभिनंदन' करतो. 'कवितासागर' च्या डॉ. सुनील दादा पाटील यांनी कथासंग्रह प्रकाशनाची 'हॅटट्रिक' मारली व वेळेत सुबक छपाई करून दिल्याबद्दल खास अभिनंदन.

 'प्रबोधन' या कथासंग्रहामध्ये नावाप्रमाणेच वाचकांचे आणि समाजाचेही 'प्रबोधन' करणा-या एकूण १४ कथा आहेत. 'अजिंक्यपद' या कथेतून ते 'पद'वादविवादातून मिळविणा-या विवेक शास्त्रींना माहित होते की, 'विद्वत्ता ही प्रथम आत्महितार्थाभिमुख असावी आणि ज्ञानदान हा तिचा दुय्यम उपयोग असावा.'नाहीतर गोपाळ शास्त्रीसारखा अपमानास्पद पराभव होतो.

'केल्याने देशाटन (तीर्थाटन) पंडित मैत्री, सभेत संचार |
शास्त्र ग्रंथ विलोकुन मनुजा चातुर्य येतसे फार ||'

क्रोध, मान, माया, लोभादि काषायांनी भरलेल्या व भारलेल्या मनाने,  कितीही 'तीर्थाटने' केली तरी; त्या कडू भोपळ्याच्या कमंडलुमधल्या गुणधर्माप्रमाणे कडूच! म्हणून 'बाह्यांगशुद्धिपेक्षा अंतरंग शुद्धीच इष्टसिध्दीसाठी उपयुक्त ठरते.' 'मन चंगा तो कठौतीमें गंगा |' म्हणतात ते अगदी खरे आहे. 'मन एवं  मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो: |' याची साक्ष पटते.

'वक्ता दशसहस्त्रेषु....' असा अंजन आणि त्याचा जीवश्च कंठश्च मित्र रंजन, या तस्करप्रमुखांना सुद्धा 'टोपी घालणारं' 'शेराला सव्वाशेर' असं कुणीतरी भेटतं त्यामुळं अंजनला त्याचा 'संताप रास्त' वाटला, तरी कथाकारांनी वाचकांचं मनोरंजन मात्र, कथेला शेवटी कलाटणी देऊन छान केलं आहे.

सद्गुरूंच्या सदुपदेशाने एका सम्राटाने, सिंहासन सोडून संन्यास घेतला आणि त्याला सुखद अनुभव आला. राज्यकारभाराची चिंता नसल्याने निश्चिंत झोप लागली. तत्त्वजिज्ञासा आणि तत्त्व चिंतनासाठी सर्व वेळ मिळाल्याने अध्यात्मजागृती होऊन आत्मोन्नतीचा सन्मार्ग सापडला. हितशत्रू अन्नात विष कालवून आपला प्राण घेतील, ही भीती नसल्याने नि:शंक मनाने संन्याशी सम्राटाने पंच पक्वांन्नाचा आस्वाद घेतला. आकुलता, विवंचना आणि विकल्प नसल्याने सम्राटपदी असतांना जे 'सुख' मिळाले नाही, ते संन्याशी असतांना वनवासात मिळाले. 'अहाहा, सुखच सुख...'

'दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् |' हे जसं महारथी कर्णाच्या जीवनाचं 'रहस्य' होतं; तसं 'कोण होतास तू, काय झालास तू?' या प्रमाणे 'वाया न जाता, उतला नाही - मातला नाही; पण त्यामुळेच राजपदाला कसा पातला' (पोहोचला), हे एका चर्मकाराच्या यशाचं 'रहस्य' वाचकांनी जाणूनच घ्यावं, असं मला वाटतं.

'Swiss' बँकेपर्यंत 'द्रव्यसंचय' करणा-या, धनोंन्मत्तांपासून आपला बचाव कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ही रूपक कथा होय! 'सर्वे (दुर्) गुणा: कांचनमाश्रयन्ते |' हा संदेशच इथे मिळतो. 'कार्यसिद्धि' करून घ्यायची असेल तर 'जसा देव तसा नैवेद्य' द्यावा लागतो. त्याप्रमाणे चांभाराच्या देवाला खेटराची पूजा म्हणतात, ते काही खोटं नाही याची साक्ष या कथेवरून पटते.

प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांची 'रामफळ' प्रतिबिंबित कथा वाचतांना मला 'शटलेश्यां'चा तथा 'मधुबिंदू दृष्टांत' आठवला संसारी जीवाचे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं | जननी जठरे, उदरे शयनम् || असे अनादिकाळापासून चतुर्गती भ्रमण सुरु आहे. त्या जीवाला सुखाच्या क्षुधेसाठी, 'सम्यग्दर्शनरूप रामफळ'हवे आहे; पण ते सहजासहजी शक्य नाही; कारण अनंतानुबंधी कषायांचे भुजंग, इंद्रियजन्य विषयसुखाच्या मधमाशांचे चावे, अनंत क्लेश इत्यादी आपत्ती शतकांवर मात केल्यानंतर 'सम्यग्दर्शनाचे हे गोड रामफळ हाती लागते, ही या कथेची फलश्रुती आहे.'

अशिक्षित व असंस्कृत पण रूपवान पत्नीपेक्षा, सुशिक्षित व सुसंस्कृत परंतु सर्व सामान्य पत्नी केव्हाही चांगली! कारण की, 'शारिरीक बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक आत्मसौंदर्य श्रेष्ठ व सुखदायी असते.' यह 'अंदर की बात' केवल 'रामही क्यों जाने?' 'हम भी जाने |'

मानवी जीवनात पती व पत्नी सर्वार्थाने सर्वत्र परस्परांना अगदी अनुरूपच असतात असे नाही; तथापि त्यांचे संसार सुरूच असतात. कारण 'पुरुष हा एक व्यवहारी अपूर्णांक असतो, स्त्रीची जोड मिळाली की, तो पूर्णांक होतो' (नंतर 'अंक' वाढतात, ही गोष्ट वेगळी) 'अतिचार - अनतीचार' याचा विवेक सांभाळणे हे सुज्ञांचे कर्तव्य आहे. कारण एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी करुणेपोटी केवळ कर्तव्य म्हणून, ज्यांच्या हातून अनवधानाने अतिचार घडतो तो क्षम्य असतो. उदाहरणार्थ एखाद्या शिका-याशी आपण थोडं खोटं बोलून एखाद्या प्राण्याचा जीव वाचवला, तर पाप न लागता पुण्यच मिळेल; म्हणजेच अहिंसा अणुव्रताचे पालन केल्यासारखे होईल.

'जित्याची खोड, रामबाणउपाय, महत्वाकांक्षा' अशा कथांद्वारेही प्रवीणकुमारांनी प्रभावी प्रबोधन केलेलं आहे. त्यांची भाषा शैली कथानुरूप अबालसुबोध, सचित्र आहे. कथांची शीर्षके आणि मुखपृष्ठ सूचक तथा अर्थपूर्ण आहेत. मराठी काव्यपंक्ती / ओव्या, हिंदी दोहे, संस्कृत वचने इत्यादी शब्दरत्नांचा योग्य ठिकाणी वापर केल्यामुळे बहुश्रुतत्त्व व व्यंजकत्व आले आहे.

वैद्य यांचे 'प्रबोधन गुणकारी' झाल्याशिवाय राहणार नाही; म्हणून त्यांना धन्यवाद आणि यापुढील त्यांच्या लेखन वाटचालीस मनापासून शुभेच्छा!  

- प्राचार्य श्रीधर हेरवाडे
ज्येष्ठ संपादक व समीक्षक
Ph: 09422581967

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to आरंभ : मार्च २०१८