मला 'कन्फेशन बॉक्स' बद्दल एक सुप्त आकर्षण आहे. आपल्या चुका त्याच्यासमोर मान्य करून टाकल्यावर आपल्याला अनकंडीशनली माफ करून टाकणारा कन्फेशन बॉक्स ! त्याच्यासमोर सगळं मान्य केल्यावर एकदम कसं हलकं हलकं वाटत असेल नाही? आपल्या देवळात पण चर्चसारखाच कन्फेशन बॉक्स हवा होता !
---------------
मी नेहमीप्रमाणे आमच्या दोघांच्याही आवडीची कालिया आणि कृष्णबाप्पाची श्तोली शांगायला... सॉरी सांगायला सुरुवात करतो. कालियामर्दन होईहोईपर्यंत पापण्या वेटलिफ्टिंगची स्पर्धा हरलेल्या असतात. कोलाहल, कलकलाट, धिंगाणा या सगळ्यांना किमान दहा तासांची विश्रांती मिळणार असते ! त्याच्या शांत चेहऱ्याकडे बघून जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी याने माझा ओरडा खाल्लाय यावर माझा स्वतःचाही विश्वास बसत नाही.
छ्या.. उगाच ओरडलो त्याला.... अरे पण त्याच्या भल्यासाठीच ओरडलास ना?
पण तरी इतकं ओरडायला नको होतं..... अरे पण न खाता झोपला असता तर पुन्हा चिडचिड केली असती. नेहमीचं द्वंद्व सुरु होतं....
फोनवर बोलू देत नाही म्हणून खाल्लेला ओरडा... लॅपटॉपच्या कीजशी खेळ केला म्हणून रागावणं... टीव्हीच्य बटनांशी, रीमोटशी, आय-पॅड्शी मस्ती केली म्हणून, पसारा केला म्हणून, पाणी सांडलं म्हणून, जोरजोरात उड्या मारल्या म्हणून, आरडओरडा केला म्हणून, दणादण पाय आपटले म्हणून, खात नाहीस म्हणून, झोपत नाहीस म्हणून ........ म्हणून...... म्हणून........ म्हणून.... म्हणून..... .... म्हणून...
किती कारणांनी ओरडलो रे तुला.. किती कारणांनी ओरडतो रे तुला.. किती वेळा ओरडलो.. तुझी चूक असताना आणि माझी चूक असतानाही !!!
मी एकदम कळवळतो. स्वतःचाच राग येतो...
सॉरी राजा सॉरी.. प्लीज माफ कर मला. पुन्हा असं करणार नाही.. पुन्हा कधीच तुला ओरडणार नाही... !!
अॅण्ड दॅट्स इट.... मला जाणवून जातं. मला त्या चर्चमधल्या किंवा बाहरेच्या कुठल्याही कन्फेशन बॉक्सची गरजच नसते. माझा कन्फेशन बॉक्स माझ्या समोरच असतो. झोपलेलं पिल्लू हाच आपला कन्फेशन बॉक्स.. त्याच्यासमोर बिनदिक्कतपणे आपल्या सगळ्या चुकांची कबुली देता येते, सगळी जंत्री वाचता येते. पण तरीही अपराधीपणाचा गंड जाता जात नाही.
आणि अचानक तो खुदकन हसतो. झोपेतच.... झोपेत जणु तो सगळं बोलणं ऐकत असतो. आणि ऐकून घेतल्यावर हसत हसत म्हणत असतो "बाबा, अरे ठीके रे... एवढं काय त्यात. जाउदे. चुकून झालं ना."
मग मला कळतं की तो माझा कन्फेशन बॉक्सच नाही तर कन्सेशन बॉक्स आहे.. माझ्या एवढ्या सगळ्या चुका माफ करून मला शिक्षेत कन्सेशन देणारा कन्सेशन बॉक्स !!
.
.
.
.
.
पण राहून राहून एक विचार माझा पिच्छा सोडत नाही. ही सगळी कन्फेशन्स तो जागा असताना देऊ शकेन का मी? तेवढं धैर्य आहे माझ्यात?