कुरियरने आलेला मोठ्ठा खोका हातात घेऊन मी दार बंद केलं. सपासप वार करून सेलोटेप्स कापून टाकून खोका उघडला. भारतातून आलेल्या खोक्यात एक प्रकारची मायेची ऊब असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यात चिवडा असतो. भरपूर चिवडा.. ताजा, खमंग, चविष्ट चिवडा !! पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच ! तर यावेळीही अशाच चार पिशव्या होत्या. तीन लहान, झिपलॉक वाल्या पिशव्या आणि एक भली मोठी पिशवी. सगळं घर चिवडामय झालं !!
झिपलॉकवाल्या छोट्या पिशव्या ऑफिसला न्यायला बऱ्या पडतील म्हणून वरती शेल्फात टाकून दिल्या. मोठी पिशवी खोक्यातून बाहेर काढली. ती मोठी म्हणजे खरंच खुपच मोठी होती. अवाढव्य.. एकदम ढब्बू. तिला लावलेले दोन रबर काढले आणि पिशवी उघडायला गेलो तर ती उघडेना. दोन्ही टोकं एकदम घट्ट चिकटून बसली होती. पुन्हा प्रयत्न केला तरी उघडेना. यावेळी मोठी पिशवी पण झिपलॉक आहे की काय अशा विचाराने त्याप्रमाणे उघडायचा प्रयत्न केला. पण इल्ला. कुठे सेलोटेप लावलाय का म्हणून शोधलं तर तसंही काही नव्हतं. कदाचित स्टेपल केलं असावं म्हणून बघितलं तर ते ही नाही. समोर एवढा चिवडा दिसतोय पण खाता येत नाहीये या विचाराने मी कासावीस झालो.
पुन्हा एकदा शांतपणे नीट लक्ष देऊन पिशवी नक्की का उघडत नाहीये ते बघायचं ठरवलं. नीट चेक केलं तर लक्षात आलं की पिशवीची दोन्ही टोकं अगदी घट्ट चिकटून बसली आहेत. म्हणजे अगदी सराईत, अगदी प्रोफेशनल काम असावं तसं, स्टेपल नाही, सेलोटेप नाही, झिपलॉक नाही तरी पिशवी का उघडत नाहीये? पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने? कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती? आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग? माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग? आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा? खरं म्हणजे एव्हाना चिवड्याचे दोन-चार बकाणे भरून व्हायला हवे होते तर आमचं गाडं पिशवीमध्येच अडकलं होतं !
मी वैतागून मोठी कात्री काढली. हे म्हणजे मधमाशी मारण्यासाठी एके-४७ वापरण्यासारखं होतं. पण काही इलाज नव्हता कारण मधासाठी आपलं ते चिवड्यासाठी एके-४७ काय तोफ, रणगाडा काहीही वापरायला मी मागेपुढे पाहिलं नसतं. कात्रीने मी पिशवीचं वरचं टोक कापून टाकलं. यकश्चित पिशवी उघडण्यासाठी कात्री वापरण्याचा प्रसंग कित्येक वर्षांनंतर आला होता. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करून पिशवीत हात घातला आणि बकाणा भरला. अहाहाहा.. काय तो ठसका, काय ती चव. बेस्ट एकदम. एवढ्या चविष्ट, खमंग, खुसखुशीत चिवड्याबद्दल मी आईला मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याचा गुन्हा माफ करून टाकला. नंतर थोडा चिवडा डिशमध्ये काढून घ्यावा म्हणून पिशवी उचलली आणि..................
...
..
.
.
.
.
..
...
आणि सगळं घर चिवडामय झालं !!!!!!!! माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती !! स्टेपलच्या पिनांचा त्रास होऊ नये किंवा पिशवी उघडताना सेलोटेप चिकटू नये यासाठी आईने पिशवीचं तोंड चांगलं ४-५ वेळा फोल्ड करून त्यावर चांगले दोन मोठे रबर लावून दिले होते (जे मी पोस्टच्या सुरुवातीलाच काढले होते). थोडक्यात मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो !!
ती रास बघून 'छोटा चेतन' मधली मुलं आईस्क्रीमच्या डोंगरात उड्या मारता मारता एकीकडे आईस्क्रीम खातात किंवा अंकल स्क्रुज (ज जेवणातला, जहाजातला नव्हे) त्याच्या पैशाच्या राशीत यथेच्छ डुबक्या मारतो तद्वत चिवड्याच्या राशीत अगदी डुबक्या मारल्या नाहीत तरी निदान तोंड तरी घालावं असं मला वाटून गेलं. पण तरीही तो मोह टाळून मी सगळा चिवडा पुन्हा त्या पिशवीत भरून ती पिशवी मस्त हवाबंद डब्यात भरून टाकली.
हल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो !!!