सूर्‍या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, जुवेकर, पिंगळ्या, गायकवाड, आप्पा, बेन्द्रीण, मांजरेकर सर, राजगुरू सर, परांजपे बाई......... 

 

इ..  चि..  भ..  ना............ !!!  इचिभना इचिभना मला एकदम शाळेतच गेल्यासारखं वाटायला लागलं !!!

 

शाळा... अंदाजे '७६ सालच्या डोंबिवलीतल्या (संदर्भ डास : डासिवली, मुंब्रा इ. इ. उल्लेख) एका साध्या टिपिकल मराठी शाळेत शिकणार्‍या पौगंडावस्थेतल्या कथानायकाचं वर्णन आणि त्याच्या व अनेकदा त्याच्या ग्रुपमधल्या त्याच्या वयाच्या मुलांच्या नजरेतून घडणारं तत्कालीन समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं, साध्या सोप्या (वाटणार्‍या) शब्दांतलं चित्रण !!

 

मी मुद्दामच 'वाटणार्‍या' असं म्हणतोय. कारण अगदी साधे शब्द, सोपी वाक्यरचना वगैरे असली तरी वाचत असताना प्रचंड 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करावं लागतं. एकेका ओळीत, एकेका वाक्यात, एकेका शब्दांत त्या परिस्थितीला निरनिराळ्या कोनांतून बघणारे, त्यावर भाष्य करणारे कैक उल्लेख आहेत. जातीभेदावर आहेत, विषमतेवर आहेत, चंगळवादावर आहेत, दांभिकपणावर आहेत आणि अगदी म्हंटलं तर लहान मुलांच्या बाबतीत घेतल्या जाणार्‍या लैंगिक गैरफायद्यावरही आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या सगळ्यावर काही भाष्य केलं जातोय याचा पुसटसा आभासही यातल्या एकाही वाक्यात नाहीये. वाचताना वाटत राहतं की आपण मराठी शाळेतल्या एका साध्यासुध्या मुलाची वर्षभराची गोष्ट वाचतोय ज्यात त्याचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत आणि त्याला 'लाईन' देणारी (वाचा आवडणारी, प्रेम करणारी इ. इ.) त्याची एक मैत्रीण आहे. पण प्रत्यक्षात मात्र या सार्‍या लेखनाचा आवाका समोर दिसतो त्यापेक्षा फारच विस्तृत आहे !!!

 

 इचिभना... शाळा !!

 

या संपूर्ण पुस्तकात मला सगळ्यात आवडलेला किस्सा म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा. देववादी, दैववादी, अंधश्रद्धाळू, पूर्णतः नवसावर विसंबून राहणारे वगैरे लोकांवर अत्यंत साध्या शब्दांत पण एकदम खणखणीत, सट्टाकदिशी लागणारा असा एक जबरदस्त फटकारा लेखकाने ओढलेला आहे. आणि त्यातल्याच एका छोट्याशा ओळीत जातीपातींवरही एक खणखणीत फटका ओढलेला आहे. कितीही झालं तरी तो परिच्छेद इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये.

 

================

 

(आईसाहेबांनी मला सांगितलं होतं की) गणपतीला म्हण की स्कॉलरशिप मिळाली तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. मला त्यावेळी जाम हसायला आलं होतं. गणपतीला पण आलं असणार. गणपती कशाला असलं काही ऐकतोय ? कारण त्याला माहित असणार की, आईसाहेब उकडीच्या मोदकांऐवजी कणकेच्या तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. आणि तोसुद्धा सुक्या खोबर्‍याच्या खुळखुळ्या मोदकांचा.... आमच्या वर्गात फक्त बिबीकरला ती स्कॉलरशिप मिळाली..... नंतर आईसाहेब म्हणाल्या की, गणपतीला नवस करून काही उपयोग नाही. कुलस्वामिनीलाच करायला हवा होता. आता मी दहावीला गेल्यावर तसा त्या करतील.

 

मला तसं अथर्वशीर्ष येतं म्हणा. आमच्या बिल्डिंगीत पोंक्षेकाकांकडे वर्षातून एकदा सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते झाडून सगळ्यांकडचे पाट आणि माणसं गोळा करतात. निकमांकडचे फक्त पाट (ही ओळ म्हणजे तर तीन शब्दांत अक्षरशः उघडं करण्याचा सर्वोत्तम नमुना आहे !!! सलाम बोकीलसाहेब सलाम). पोंक्षेकाकांचा किरण तेव्हा आम्हाला आदल्या दिवशी सांगतो की उद्या आमच्याकडे गणपतीला गंडवायचा कार्यक्रम आहे म्हणून.कारण ते दहापंधरा लोक गोळा करतात. त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि केळी देतात आणि त्यातल्या एकानं ते अथर्वशीर्ष म्हटलं तरी सगळ्यांनी म्हटलं असं समजतात आणि आकडा वाढवतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम दोनतीन तासांत आवरतो. गणपतीला काय हे कळत नसणार? पण ह्यांचं चालूच..."    

 

================

 

जातीपातींवर दबकत दबकत पण तेवढेच खणखणीत वार केल्याचे अजूनही छोटे छोटे अनेक नमुने आहेत. नरूमामासाठी देशमुखांच्या मुलीचं स्थळ आलेलं ऐकून मुकुंदाच्या आईने "आपल्यातल्या मुली काय मेल्या आहेत का?" या एका वाक्यातच त्या स्थळाची वासलात लावणे.. 

 

किंवा मग नरूमामाच्या लग्नात भेटलेल्या आशक्याबरोबरचा एक संवाद. मुकुंदाची आशक्या गायकवाडबरोबर छान गट्टी जमल्यानंतर मुकुंदा जेव्हा त्याला एकदा त्याच्या 'लाईन' बद्दल विचारतो आणि गायकवाड आणि त्याची 'लाईन' चं एकत्र भेटणं, बोलणं, फिरणं वगैरे चालू आहे हे पाहून आशक्या किती भाग्यवान आहे आणि त्याचं सगळं एकदम मस्त जमून गेलंय याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. तेव्हा गायकवाड जे उत्तर देतो ते ऐकून तर एकदम चरकायलाच होतं. गायकवाड म्हणतो "जमलंय कसलं रे..? काही नाही जमलंय. कारण आम्ही 'बीशी' आहोत ना" !!!!!!! 

 

किंवा मग नरुमामाच्या लग्नाविषयी शिरोडकरशी बोलताना मुकुंदाने मुद्दाम आईसाहेबांना कशी 'आपल्यातली'च मामी हवी होती हे सांगताना 'आपल्यातली'च वर विशेष भर देणे वगैरे सगळे प्रसंग अगदी नकळत आलेले पण अगदी लहान लहान मुलामुलींच्याही मनात अजाणतेपणी का होईना खोलवर रुजलेले तत्कालीन समाजातले जातीभेदाचे संस्कार अगदी ठळकपणे अधोरेखित करतात. (आताही यातलं काहीही फारसं बदललेलं आहे असा माझा मुळीच दावा नाही.)

 

मुकुंदाच्या मनात जो एक सतत वैचारिक गोंधळ चालू असतो तो आवरायला थेट अशी मदत होते ती फक्त नरुमामाचीच. तो मामा कमी आणि मित्र जास्त असल्याने त्याच्याबरोबर इंग्रजी पिक्चर बघणे, बिनधास्त गप्पा मारणे, त्याच्याशी मुलींविषयी बोलणे, त्याला शाळेतल्या मुलींचे किस्से सांगणे असे प्रकार दर भेटीत होत असतातच. अनेक प्रसंगांत नरूमामाच मुकुंदाचं चुकीचं पडलेलं किंवा पडू पाहणारं पाउल जागेवर आणताना दिसतो. उदा 'सुकडी'ला चिडवण्याचा प्रसंग किंवा धीर करून 'शिरोडकर'शी बोलण्याचा प्रसंग. किंबहुना मुकुंदाच्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर, वागण्याबोलण्यावर नरूमामाचाच प्रचंड पगडा आहे, फार मोठा प्रभाव आहे आणि पुस्तकातल्या वाक्यावाक्यात तो जाणवतो. पानोपानी नरुमामाचे दाखले सापडतात. मुकुंदाच्या प्रत्येक वाक्यात, विचारात, कृतीत, कृतीच्या पुष्ठ्यर्थ नरूमामाची उदाहरणं आहेत. अर्थातच नरूमामा हा त्या काळाच्या तुलनेत विचारांनी अधिक सुधारित असणार्‍या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतो. 

 

असं सगळंच जगावेगळं करणार्‍या नरुमामाने आधी (गंमतीतच) सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न न करता आईसाहेबांना आवडलेल्या 'आपल्यातल्याच' मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळ्यात जस्त हिरमोड होतो तो मुकुंदाचा. सामाजिक, वैचारिक जोखडं भिरकावून देऊन वेगळं काहीतरी करणार्‍या नरूमामाने प्रत्यक्षात मात्र एवढा मोठा निर्णय घेताना मळलेली वाटच चोखाळावी हे नरूमामाकडे एक ग्रेट मित्र, आदर्श माणूस म्हणून बघाणार्‍या, स्वप्नील आयुष्यात वावरणार्‍या मुकुंदाला पचवायला जड जातं. 

 

पुस्तकात पानोपानी येणारे आणीबाणी उर्फ अनुशासनाचे उल्लेख आणि त्या अनुषंगाने येणारे प्रसंग हे तर निव्वळ अप्रतिम. १४-१५ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीकोनातून आणीबाणीकडे बघून त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती, लोकांची मतं, विचार मांडण्याची कल्पनाच कसली बेफाट आहे !! त्याकाळची परिस्थिती, आणीबाणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन, त्यांची मतं, आणीबाणीला ठाम विरोध करणारे ग्रुप्स आणि आणीबाणीला अनुशासन म्हणवून त्यापायी येणार्‍या शिस्तीचं कौतुक करणारे लोक आणि आणीबाणीच्या वेळी लोकांना आलेले अनुभव इत्यादी गोष्टी दहा अग्रलेख वाचून कळणार नाही एवढ्या चांगल्या रीतीने या पुस्तकातून कळतील कदाचित !!

 

मुकुंदाच्या मनातले गोंधळ शमवू शकणारी किंवा त्याच्या विचारांना चालना देणारी, मदत करणारी अजून दोन पात्रं म्हणजे बाबा आणि चित्र्या. बाबांची थेट अशी मदत फारच कमी होते. परंतु बुद्धिबळाविषयीची आवड वाढीला लावणे किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींशी गैरवर्तणूकीच्या कथित आरोपावरून शाळेतून अगदी नाव काढायची पाळी आलेल्या मुकुंदाला विश्वासात घेऊन, प्रसंग समजावून घेऊन आणि आपल्या मुलाची काहीच चूक नाहीये हे कळल्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत व संयमित आवाजात मुकुंदाची बाजू थेट मुख्याध्यापक आणि तक्रारकर्ते यांना पटवून देण्याची त्यांची हातोटी दाखवणारा प्रसंग वाचून तर त्यांचा मोठेपणा अगदी थेट पोचतोच.

 

चाळीत टीव्ही आल्याने बुद्धिबळ संपल्यामुळे विषण्ण झालेले बाबा, मोकळ्या जागेत बुद्धिबळ खेळले न गेल्याने आणि टीव्हीपायी लोकं न जमल्याने आजुबाजुच्यांनी अंगणात कचरा टाकायला लागणे यांसारख्या अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांत चंगळवादावर अतिशय संयत आणि जवळपास शून्य शब्दांत लेखकाने ओढलेला कोरडा चांगलाच लागतो. चंगळवादावर ओढलेला असाच एक आसूड म्हणजे मुकुंदाच्या शाळा ते घर या मार्गावरचं पूर्ण पुस्तकभर डोकावणारं शेत पुस्तकाच्या शेवटच्या पानात एकाएकी नाहीसं होण्याच्या मार्गावर येतं तो प्रसंग..  तिकडे शेती करण्याऐवजी चाळी बांधायचं ठरवलं असल्याचं शंकर्‍याचे बाबा मुकुंदाला सहज सांगितल्याप्रमाणे सांगतात तेव्हा तर अगदी विषण्णच व्हायला होतं. पुस्तकातल्या निर्जीव पात्रांशीही आपण एवढे एकरूप होऊन गेलेलो असतो हे तोवर आपल्याला जाणवलेलंच नसतं.

 

मुकुंदाला आवरणारं आणि सावरणारं दुसरं एक महत्वाचं पात्र म्हणजे चित्र्या !! हा चित्र्या म्हणजे एक अवली कार्ट आहे. अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू, समजूतदार, परिस्थितीची चांगली जाण असणारं, आईबाबांमधल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या प्रेमाला पारखा झालेलं, 'देवकी' पासून येणार्‍या कटु अनुभवांनी कंटाळून गेलेलं आणि घरातल्या या विचित्र परिस्थितीला कंटाळून जास्तीत जास्त वेळ त्याच्या आवडत्या वैज्ञानिक प्रयोगांत आणि ग्रुपचा नाका असलेल्या सुर्‍याच्या बिल्डिंगीत घालवणारं असं हे एक अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे. तो मुकुंदाला वेळोवेळी समजावतो, काही महत्वाची गुपितं फक्त मुकुंदाशीच शेअर करतो, आपल्या शांत आणि संयमित वागण्याने, गोड बोलण्याने आणि (मुकुंदाच्या भाषेत) गोर्‍यागोमट्या चेहर्‍याचा वापर करून ग्रुपला कित्येकदा मोठ्या संकटांतूनही वाचवतो. थोडक्यात नरूमामाला नियमित भेटता येत नसल्याने आणि त्याच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन (!!!) मिळवता येत नसल्याने नरूमामानंतर चित्र्या हाच मुकुंदाचा एकमेव आधार असतो.  


'शिरोडकर'बद्दल न लिहिता लेख संपवला तर मुकुंदा मला कधीही माफ करणार नाही. ('शाळे'त सर्वस्वी गुंतून गेल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा देता येणार नाही :) ) .. कारण पुस्तकाचा निम्मा भाग हा शिरोडकरने व्यापलेला आहे. निम्म्या पानात प्रत्यक्षात आणि उरलेल्या निम्म्या पानात मुकुंदाच्या विचारांत, बोलण्यात, गप्पांत सगळीकडे. ही एक अतिशय गोड मुलगी आहे हा आपला विचार प्रत्येक पानागणिक अधिकाधिक पक्का होत जातो. तिचं मुकुंदाशी ओळख करणं, बोलणं, चोरून भेटायला जाणं वगैरे सगळं सगळं एकदम पटून जातं आपल्याला. आणि मुकुंदाची तिच्याबद्दलची इन्टेन्सिटी शाळेतल्या गाण्याच्या भेंड्यांचा प्रसंग, मुकुंदाने तिच्यासाठी मार खाण्याचा प्रसंग, स्काउट कॅम्पचा प्रसंग, तिच्यासाठी लांबचा क्लास लावण्याचा प्रकार इत्यादीमधून अधिकच ठळकपणे समोर येते. तिच्यासाठी चेसची स्पर्धा जिंकणं, तिच्यासाठी जीव खाउन अभ्यास करून निव्वळ शेवटच्या काही महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं वगैरे वगैरे प्रकार प्रचंड आवडतातच आणि पटूनही जातात. किंवा नाईट कॉलेज शोधणं, मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याची कल्पना करणं वगैरे प्रकार तर पटत नसूनही मुकुंदाच्या विचारांची भरारी आणि त्याची तयारी पाहून मनोमन हसायला आल्याशिवाय राहत नाही..  

 

अर्थात हे पुस्तक नववीच्या एका टारगट ग्रुपविषयीचं असल्याने मुली, त्यांच्याबद्दलचे बिनधास्त उल्लेख, कट्ट्यावरची भाषा, नवीननवीन शब्द, शिव्या, 'ढिंगच्याक' गाणी, वात्रटपणा, आगाऊपणा या सगळ्याचा पुरेपूर वापर पुस्तकात आहे पण तो क्वचित कधीतरीच आक्षेपार्ह वाटतो किंवा बरेचदा वाटतही नाही. कारण सुरुवातीपासूनच आपण या पुस्तकात आणि विशेषतः मुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्‍याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला,  केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतोच कुठे !!!!

 

थोडक्यात पुस्तकभर एवढे चढ-उतार येऊन, टक्केटोणपे खाऊन अचानक शेवटच्या काही पानांमध्ये मुकुंदाची आणि त्याच्या प्रेमाची घडी अगदी सुरळीतपणे बसणार आणि अगदी गोड गोड सुखांत शेवट वाचायला मिळणार असं वाटायला लागतं. आणि तेव्हा ते थोडंसं टिपिकल पुस्तकी वाटतंय की काय असं म्हणेम्हणेस्तोवर शेवटचं पान आलेलं असतं आणि तेवढ्यात.......... काही कळायच्या आत आपल्या पायाखालची चादर सर्रकन ओढली जाते. एकदम चटका बसून आपण वास्तवात येतो. स्वप्न संपल्यागत वाटतं... तसं म्हटलं तर पुस्तकाचा शेवट रूढार्थाने तितकासा काही ग्रेट किंवा जगावेगळा वगैरे नाहीये पण वर म्हटल्याप्रमाणे आपण मुकुंदामध्ये एवढे गुंतून गेलेले असतो की शेवटी मुकुंदाच्या मनावर जेवढा प्रचंड आघात होतो तेवढाच जोरदार धक्का आपल्यालाही बसतो. अगदी वेड्यागत होतं.

 

वपुंचं पार्टनर वाचताना त्यात शेवटी एके ठिकाणी "पार्टनर हा खराच होता की आपल्याला जसं व्हावंसं, वागावंसं वाटत होतं तसं वागणारी एक काल्पनिक व्यक्ती होती" अशा काहीश्या अर्थाचा एक उल्लेख आहे. त्याचप्रमाणे शाळा वाचताना आणि वाचून संपल्यावरही कित्येकांना अगदी स्वतःच्या शाळेविषयी वाचल्यासारखं, आपल्या त्यावेळच्या आयुष्याविषयी, त्यावेळी केलेल्या मस्ती, धम्माल, दंग्याविषयी आणि खोड्यांविषयी आठवतं, काही जणांना अगदी तसंच्या तसं नाही पण अनेक प्रसंग आपल्या शालेय जीवनाच्या जवळ जाणारे वाटतात किंवा कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं.

पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्‍या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel