सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते. अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो. शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते. भव्यदिव्य , उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता. पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला , ‘ महाराज , आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे , किल्ले , बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली. आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे ? आपण कुठे थांबणार आहोत ?

‘ या आशयाचा प्रश्ान् रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा , ‘ राहुजी , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलुख आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे. ‘

म्हणजे अवघा भारत मुक्त करावा , त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे , असा महाराजांचा मनोसंकल्प होता. शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण कधी विचारात घेतो का ? हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिक दप्तरखान्यातील एका पोर्तुगीज पत्रात डॉ. पांडुरंग पिसुलेर्कर यांच्या अभ्यासात आला. मला स्वत: डॉ. पिसुलेर्करांनीच हा सांगितला. अन् म्हणाले , ‘ शिवाजीराजाचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे.

‘ अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसणारे शिवचरित्र सूचक उपनिषदांसारखे आहे। आम्हाला त्यावर भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे. पुढे राजस्थानात रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता. वास्तविक तो महाराष्ट्रापासून त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस. पण दष्टा प्रतिभावंत. त्याने छत्रपती शिवाजीराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे. तो म्हणतो , हा शिवाजीराजा कसा ?

‘ दिल्लींदपदलिप्सव :’

म्हणजे हा शिवाजीराजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा ‘ आहे. उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही. ते सदैव जागे आणि सक्रिय असतात. महाराज तसेच होते.

असो. आता पुन्हा एकदा शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण डोकावू. शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६ 3. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६ 3 या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ‘ तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.

आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला.

याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ‘ बडफुकन ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ‘ शाहिस्तेखानकी बुरंजी ‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.

‘ अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?

शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती , याचे हे उदाहरण आहे.

आज मात्र या आसामातील जनतेला , किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितच नाही. पण रागावयाचे कशाकरिता आपण ? आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे ? पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का ? अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत ?

मित्रांनो , मी एक लहानसा प्रयत्न केला। ओरिसा म्हणजे उडिया. आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश. उडिया भाषेत शिवचरित्र मी चार वर्षांपूवीर् प्रसिद्ध केले. कटक येथे प्रकाशान झाले. गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीत. अधिक काय लिहावे ?

शाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लछितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांची आठवण करून दिली.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel