सिंहगड म्हणजेच कोंढाणा. हा
किल्ला पुण्याच्या नेऋत्येला तीस कि. मी.वर आहे. या किल्ल्याचे चरित्र अध्यायवारीने सांगावे असे मोठे आहे. पण काही मोजक्या घटनासुद्धा या गडाचे वेगळेपण सांगणाऱ्या आहेत. सर्वात शेवटची लढाई प्रथम पाहूया. इ. १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशी पुणे शहर शनिवारवाड्यासकट कॅप्टन रॉबर्टसन या इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजाच्या कब्जात गेले. म्हणजेच पेशवेही गेले. पेशवाईही गेली. साताऱ्यास महाराज छत्रपती प्रतापसिंहराजे यांनाही इंग्रजांचे मांडलिकत्त्व स्वीकारावे लागले. म्हणजेच मराठी सत्ता संपली. पाठबळ देणारा धनी किंवा कोणी वाली उरला नाही.

तरीही या पुण्याशेजारचा हा डोंगरी सिंहगड इंग्रजांच्या सुसज्ज बंदुकधारी फौजेशी आणि चहुअंगाने गडावर मारा करणाऱ्या कुलपी गोळ्यांच्या इंग्रजी तोफखान्याशी झुंजत होता. इंग्रजांनाही याचे आश्चर्य वाटत होते , की हे मुठभर मराठे निराधार झालेले असूनही आपल्या विरुद्ध अहोरात्र का झुंजताहेत ? इंग्रजांनी एकूण गडावर तोफांचे मोठे गोळे धडकविले , त्या गोळ्यांची संख्या तीन हजाराहूनही अधिक होती , तरीही मराठे झुंजतच होते. या सिंहगडच्या शेवटच्या युद्धाचा आम्ही कधी सूक्ष्म विचार केला का ? तसे दिसत नाही. या लढणाऱ्या मराठ्यांच्या मनांत कोणती नेमकी भावना असेल ? विचार असेल ? इंग्रजी निशाण पुण्यावर लागल्यानंतर शेजारचा सिंहगड अजूनही रोज अहोरात्र इंग्रजांशी लढतोय याचा परिणाम पुण्यातील आणि एकूण मराठी राज्यातील जनतेच्या मनावर काही झाला का ? तसेही दिसत नाही. लढणारे आणि मरणारे मराठे झुंजतच होते. सारा देश गुलामगिरीत पडल्यानंतर सिंहगड , सोलापूरचा किल्ला राजधानी रायगड आणि असेच आणखी काही किल्ले इंग्रजांशी झुंजत होते. या त्यांच्या झुंजी म्हणजे व्यर्थ मृत्युच्या खाईत उड्या घालणेच होते. रायगड कॅप्टन प्रॉथरशी दहा दिवस झुंजला. (दि. १ मे ते १० मे १८१८ ) सोलापूरचा किल्लाही असाच आठापंधरा दिवसा इंग्रजांनी घेतला. सिंहगड मात्र झुंजतच होता. अखेर त्याचे तेच होणार होते. तेच झालं. किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. एखादे राष्ट्र दुर्दैवाने शत्रूच्या गुलामगिरीत पडत असताना ज्या अगदी शेवटच्या लढाया दिल्या जातात , त्या त्या राष्ट्राच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील खरोखर पहिल्या लढाया असतात. सिंहगडची ही लढाई म्हणजे भारताच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध नाही का ? ही लढाई इंग्रजांशी तीन महिन्यातून किंचित अधिक काळ चालली होती. अखेर गड पडला. सिंहही पडले.

या आधीच्या काळातला सिंहगडाचा इतिहास असाच धगधगीत ज्वालांनी लपेटलेला आहे. १ 33 ९ पासून ते इ. १६४७ पर्यंत हा गड सुलतानांच्या कब्जात होता. शेवटी आदिलशाही ठाणेदार म्हणून सिद्दी अंबर वाहब हा किल्लेदारी सांभाळत होता. नेमकी तारीख माहीत नाही. पण इ. १६४७ च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या योजनेने आणि कारस्थानाने बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे याने ‘ कारस्थाने ‘ करून कोंढाणा स्वराज्यात काबीज करून आणला. महाराज आणि जिजाऊसाहेब यांची मने सुखावली आणि बळावली. कारण सिंहगडसारखी अश्रफाची बलाढ्य जागा स्वराज्यात आली. या गडावर श्री काळभैरव आणि योगेश्वरी यांचे मंदिर आहे. या देवाळाला श्री अमृतेश्वर असेही नाव आहे. स्थानिक लोक याला अंबरीबुवा असे म्हणतात. या देवाच्या देवळांत बसून जिजाऊसाहेबांनी रयतेचे काही न्यायनिवाडे केल्याच्याही नोंदी आहेत. कोणालाही आवडावा असाच हा सह्यादीतील दागिना आहे. एक गोष्ट आत्ताच सांगून टाकू का ? पुढे (इ. १७० 3 एप्रिल) मध्ये औरंगजेबाने अगदी म्हातारपणी हा गड छत्रपती ताराबाईसाहेबांच्या कारकिदीर्त काबीज केला. त्याचा तपशील आत्ता नको. पण बादशाहाच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर तो स्वत: गडावर गेला. त्याने गड पाहिला. एक गाजलेला असामान्य मराठी किल्ला आपल्या ताब्यात आलेला पाहून औरंगजेब निहायत खूश झाला आणि त्याने या किल्ल्याला नाव दिले , ‘ बक्शींदा बक्श ‘ तो म्हणतो , ‘ यह तो खुदाकी करामत है! यह बक्शींदा बक्श है। आलमगीर के लिए है! बक्शींदा बक्श! ‘

बक्शींदा बक्श म्हणजे परमेश्वराची देणगी.

हा गड पुण्याच्या नजीक असल्यामुळे म्हणा , पण पुढच्या काळात बहुतेक सर्व थोर मंडळी या गडावर येऊन , राहून गेली आहेत. अगदी लो. टिळक , म. गांधी , स्वा. सावरकर , जयप्रकाश नारायण इतकेच नव्हे तर नेताजी सुभाषचंद बोससुद्धा.

गडावर लो. टिळकांनी स्वत:साठी छान घर बांधले. एक गंमत सांगू का ? म. गांधी यांचेही स्वत:च्या मालकीचे एक घर सिंहगडावर आहे. मोहनदास करमचंद गांधी हे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर आहे.

मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण हे औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर चालून आले. (इ. १६६५ मार्च) त्यावेळी मोगली फौजेने पुरंदरगडास आणि सिंहगडासही मोचेर् लावले. सिंहगडचा मोर्चा होता. सर्फराजखान याच्याकडे. तो शर्थ करीत होता , गड घेण्याची. पण गडाचा टवकाही उडाला नाही. गड जिद्दीने अखेरपर्यंत ( म्हणजे लढाई थांबेपर्यंत) झुंजतच राहिला. यावेळी गडावर महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या वास्तव्याला होत्या. त्यांचे ते वास्तव्य हेच प्रचंड प्रेरक सार्मथ्य होते. पण दि. ११ जून १६६५ या दिवशी मोगलांशी महाराजांचा तह पुरंदर गडाखाली झाला , अन् त्यात तेवीस किल्ले मोगलांना द्यावयाचे महाराजांनी मान्य केले. त्यात सिंहगड होता.

तहाप्रमाणे सिंहगड देणे भाग होते. सर्फराजखान आणि दिलेरखान याच्या निसबतीचा एक सरदार अन् प्रत्यक्ष महाराजांचाही एक मुतालिक यावेळी गडावर आले. गड मोगलांच्या ताब्यात देण्याचा सोहळा सुरू झाला. जिजाऊसाहेबांना आपल्या सर्व मराठ्यांनिशी आणि डंकेझेंड्यांनिशी गडावरून कल्याण दरवाज्याने उतरावे लागले. उतरल्या. पण गड उतरत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल , याची आपण कधी कल्पना केली का ? ज्यांच्या आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे ठरत होते. त्यांना आपल्या हातातलाच पराभूत न झालेला किल्ला शत्रूच्या ताब्यात देऊन उतरावे लागत होते. त्याकरिता ते गगन आणि ते मन आणि त्या मनाचा मनस्वी महाराजा तिळातिळाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे.

– बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel